राज ठाकरेंनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते प्रचारसभाही घेणार आहेत. शिवतीर्थावर १७ मे रोजी सभा घेण्यासाठी मनसेने अर्ज केला आहे. शिवतीर्थावर ही सभा होणार आहे. त्यात राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर असतील अशी चर्चा आहे. अशात मनसे आणि राज ठाकरे कुणाच्या लग्नाच्या वरातीत नाचणार आहेत? असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे. तसंच रविंद्र वायकरांवरही टीका केली आहे.
रविंद्र वायकरांना खरी शिवसेना कुठली हे समजेल
रविंद्र वायकरांना जर हे वाटत असेल की एकनाथ शिंदेबरोबर ते गेले कारण ते म्हणत आहेत ती खरी शिवसेना आहे. वायकरांना जर ती खरी शिवसेना वाटत असेल तर हरकत नाही निकालानंतर त्यांना खरी शिवसेना कुठली ते समजेल. ईडी नोटीस आल्यावर जे रडत चौकशीला जात होते त्यांनी आम्हाला सांगू नये असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वायकरांना उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा- राज ठाकरेंनी लाडक्या रीलस्टारबरोबर बनवलं पहिलं इन्स्टाग्राम रील, महाराष्ट्राला दिला खास संदेश
किरीट सोमय्यांना स्टार प्रचारक करा
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईतून उमेदवारी मिळाली आहे. तसंच भाजपाला माझी विनंती आहे की, रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावं अशी खोचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.
राज ठाकरे कुणाचं पोर खेळवणार?
“निवडणूक जाहीर झाली तेव्हाच आम्ही शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी अर्ज दिला होता. शिवाजी पार्कसाठी राज ठाकरेंनी पत्र दिलं आहे. त्यांनी तर सांगितलं होतं की दुसऱ्या कुणाची पोरं माझ्या खांद्यावर खेळवणार नाही. आता जर राज ठाकरे सभा घेणार असतील तर कुणाचं पोर खांद्यावर खेळवणार? हे बघावं लागेल. कुणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे नाचणार आहेत?” असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. राज ठाकरेंना त्यांनी टोला लगावला आहे. यावर राज ठाकरे किंवा मनसेकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.