चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) हा अहवाल नुकताच जाहीर केला. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून माहिती संकलित करून आकडेवारी जाहीर केली जाते. या आकडेवारीतून देशातील उच्च शिक्षणाचे चित्र स्पष्ट होते. त्यानुसार २०२०-२१ मध्ये देशात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी पहिल्यांदाच चार कोटींवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुलींच्या प्रवेशातही वाढ झाली. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा घेतलेला वेध…

देशातील विद्यार्थ्यांची संख्या किती?

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ४ कोटी १३ लाख ८० हजार ७१३ विद्यार्थी होते. त्यात ५१.३ टक्के मुले, तर ४८.०७ टक्के मुली आहेत. २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत एकूण विद्यार्थिसंख्येत ७.४ टक्क्यांनी वाढ झाली. २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत २०२०-२१मध्ये २१ टक्क्यांनी विद्यार्थिसंख्येत वाढ झाली. ४.१३ कोटी विद्यार्थ्यांपैकी १४.२ टक्के अनुसूचित जाती, ५.८ टक्के अनुसूचित जमाती, तर ३५.८ टक्के इतर मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. २०१४-१५च्या तुलनेत या तिन्ही प्रवर्गांतील विद्यार्थिसंख्या अनुक्रमे २७.९६ टक्के, ४७ टक्के आणि ३१.६७ टक्क्यांनी वाढली. २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१मध्ये विद्यार्थी प्रवेशाचे गुणोत्तर (जीईआर) १.९ने वाढले. विद्यार्थी प्रवेश गुणोत्तरात मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण मुलांच्या प्रवेशाच्या तुलनेत अधिक आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान ही सहा राज्ये विद्यार्थी पटनोंदणीत देशात आघाडीवर आहेत.

देशात एकूण विद्यापीठे किती?

देशात एकूण १ हजार ११३ विद्यापीठे आहेत. २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ७० विद्यापीठे वाढली. यामध्ये ६५७ विद्यापीठे सरकारी आहेत. त्यांपैकी २३५ केंद्रीय विद्यापीठे, ४२२ राज्य विद्यापीठे आहेत, तर ४४६ खासगी विद्यापीठे खासगी आहेत. १७ महिला विद्यापीठे, १७ मुक्त विद्यापीठे, ११ हजार २९६ एकल संस्था आहेत. ६१५ विद्यापीठे पारंपरिक म्हणजे बहुविद्याशाखीय आहेत. १८८ तंत्रज्ञान विद्यापीठे, ६३ कृषी विद्यापीठे, ७१ वैद्यकीय विद्यापीठे, २६ विधि विद्यापीठे आहेत. तर संस्कृत भाषेसाठीची १९ विद्यापीठे आहेत. सर्वाधिक विद्यापीठे राजस्थान (९२), उत्तर प्रदेश (८४), गुजरात (८३) या राज्यांत आहेत.

विश्लेषण : फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?

देशात महाविद्यालये किती?

२०२०-२१ मध्ये १ हजार ४५३ महाविद्यालये वाढली. त्यामुळे देशात एकूण महाविद्यालये ४३ हजार ७९६ झाली. उच्च शिक्षण घेण्यायोग्य १८ ते २३ वर्षे या वयोगटातील एक लाख लोकसंख्येमागे देशात ३१ महाविद्यालये आहेत. २०१४-१५ मध्ये हे प्रमाण २७ होते. एकूण महाविद्यालयांपैकी २१.४ टक्के सरकारी, १३.६ टक्के खासगी अनुदानित आणि ६५ टक्के खासगी महाविद्यालये आहेत. ४३ टक्के विद्यापीठे आणि ६१.४ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. २०२०-२१ मध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स) दुप्पट झाल्या. २०१४-१५ मध्ये या संस्था ७५ होत्या, त्या २०२०-२१ मध्ये १४९ झाल्या.

उच्च शिक्षणाचे चित्र काय?

देशातील ५९ टक्के सरकारी विद्यापीठांमध्ये ७३.१ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर ३४.५ टक्के विद्यार्थ्यांनी २१.४ टक्के सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. खासगी विद्यापीठांचे शुल्क जास्त असल्याने खासगी विद्यापीठांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. २०२०-२१ मध्ये झालेल्या एकूण प्रवेशांपैकी ७९.६ टक्के प्रवेश पदवीपूर्व स्तरावर, तर ११.५ टक्के प्रवेश पदव्युत्तर स्तरावर झाले. सर्वाधिक ३३.५ टक्के विद्यार्थ्यांनी कला शाखेत, १५.५ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत, १३.९ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत आणि ११.९ टक्के विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. देशात एकूण १७ विद्यापीठे मुलींसाठी आहेत. त्यातील १४ राज्य सार्वजनिक विद्यापीठे आहेत. ४ हजार ३७५ महाविद्यालये मुलींसाठी आहेत. २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले. एकूण ४५.७१ लाख विद्यार्थ्यांनी दूरस्थ शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यात २०.९ लाख मुली आहेत. एकूण प्रवेशांमध्ये मुलींचे प्रवेश दोन कोटींवर गेले आहेत. २०१९-२०च्या तुलनेत मुलींचे प्रवेश तेरा लाखांनी वाढले. २०१४-१५च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये संरक्षण, संस्कृत, जैवतंत्रज्ञान, फॉरेन्सिक, डिझाइन, क्रीडा अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ झाली.

परदेशी विद्यार्थ्यांची स्थिती काय?

२०२०-२१ मध्ये ४८ हजार ३५ परदेशी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतला. हे विद्यार्थी १६३ देशांतील होते. सर्वाधिक २८.२६ टक्के विद्यार्थी नेपाळचे होते. त्याखालोखाल अफगाणिस्तानचे ८.४९ टक्के, बांगलादेशचे ५.७२ टक्के, भूतानचे ३.८ टक्के, सुदानचे ३.३३ टक्के आणि अमेरिकेचे ५.१२ टक्के विद्यार्थी होते. परदेशी विद्यार्थ्यांपैकी ७५.९ टक्के विद्यार्थ्यांनी पदवी, तर १६.२ टक्के विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यात सर्वाधिक प्रवेश बी.टेक. अभ्यासक्रमाला झाले. त्यानंतर विज्ञान पदवी, व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए), अभियांत्रिकी पदवी (बी.ई.), औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्म) आदी अभ्यासक्रमांचा क्रमांक लागतो. २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात घटली.

विश्लेषण: पदवीदान समारंभात आता काळ्या गाऊनची जागा घेणार अंगवस्त्रम! पण या पोशाखाची सुरुवात नेमकी झाली कुठून?

उच्च शिक्षणात महाराष्ट्र कुठे आहे?

विद्यार्थिसंख्येनुसार देशातील १०.९८ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात होते. विद्यार्थी संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. १६.७ टक्क्यांसह उत्तर प्रदेश अग्रस्थानी आहे. सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे (४६६) चौथ्या स्थानी आहे. महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ३४ महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ७३४ तंत्रनिकेतन संस्था आहेत. परदेशी विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher education status in india where does maharashtra stands print exp pmw
First published on: 09-02-2023 at 10:02 IST