scorecardresearch

विश्लेषण : फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?

NISAR मुळे पृथ्वीच्या कवचाची हालचाल, बर्फाची स्थिती याबद्दलची ताजी माहिती मिळण्यास मदत होणार आहे

NISAR satellite mission, ISRO, NASA, India, US
फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे? ( Photo Courtesy – NASA )

अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration – NASA) आणि भारताची इस्रो ( Indian Space Research Organisation -ISRO) यांनी संयुक्तरित्या NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar. बहुदा पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिम हाती घेतली आहे.

या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील प्रसिद्ध Jet Propulsion Laboratory (JPL) या प्रयोगशाळेत झाली. या उपग्रहाचा आराखड तयार करणे आणि प्रत्यक्षात आणणे यामध्ये अर्थात इस्त्रोनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आता हा उपग्रह लवकरच भारताकडे रवाना केला जाणार आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे.

NISAR उपग्रह नेमका कसा आहे?

एका SUV च्या आकाराच्या या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहामध्ये मुख्यतः synthetic aperture radar (SAR)चा वापर केला गेला आहे. तसंच १२ मीटर ( ३९ फूट ) व्यासाची एक जाळीदार अँटिना या उपग्रहाला असणार आहे. यामुळे ढगाला भेदत, कोणत्याही वातावरणात जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे.

NISAR मोहिमेची उद्दीष्ट्ये काय आहेत?

विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या १२ दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. विशेषतः पृथ्वीच्या कवचामध्ये होणार बदल, त्याच्या हालचालीची अचूक नोंद करणे शक्य होणार आहे. यामुळे भूकंप, भूस्खलन किंवा जमिनीवरील अन्य घटनांची नोंद ठेवणे शक्य होणार आहे. तसंच भूजल पातळी, बर्फाची जाडी, बर्फाची हालचाल, हिमनदीचा प्रवाह यांच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार आहे. यामुळे पर्यावरणातील बदलांची नोंद, अभ्यास करणे आणि त्यावरुन अचूक अनुमान काढण्यास मदत होणार आहे.

या उपग्रहाचा कार्यकाल हा ३ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नासाबरोबर संयुक्त उपग्रह निर्मिती, वापर आणि अभ्यास करण्याची संधी इस्त्रोला नव्याने मिळाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:56 IST