Heavy Rainfall in Mumbai and Maharashtra 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. सलग पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. गेल्या २४ तासांत मुंबई शहरातील अनेक भागांत तब्बल ३०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. विशेष बाब म्हणजे- ऑगस्टमध्ये अवघ्या एका आठवड्याच्या आत शहरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. तसं पाहता यंदा जुलै महिना हा मुंबईत सर्वाधिक पावसाचा ठरला होता; पण चालू आठवड्यातील पाऊस त्यापेक्षाही जास्त असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईत इतका विक्रमी पाऊस कशामुळे पडतोय? त्यामागची कारणं कोणती? आणखी किती दिवस असाच पाऊस सुरू राहणार? त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…
जुलैमध्ये मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत ७९८ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर मागील चार दिवसांत शहरात ७९१ मिमी नोंदवला गेला. पावसामुळे वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प झाली. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यातील एका झाडाखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यभरात पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले असून, मागील दोन दिवसांत १२ ते १४ लाख हेक्टरवरील पिकांवर परिणाम झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या ढगफुटीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कशामुळे पडतोय?
- मुंबई आणि आसपासच्या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामागे अनेक हवामान प्रणाली कारणीभूत असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं स्पष्ट केलं.
- हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या मान्सून ट्रफ सक्रिय असून तो दीव, सूरत, नंदुरबार आणि अमरावती या भागांतून जात आहे.
- हा एक लांबट कमी दाबाचा पट्टा असून, पाकिस्तानवरील उष्णतेच्या कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे.
- मान्सून ट्रफने दक्षिणेकडे केलेल्या हालचालीमुळे सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे.
- याशिवाय, ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर खोल दाबाचे क्षेत्र (depression) तयार झालं आहे.
- हे क्षेत्र पुढे उत्तरेकडे सरकत जाऊन कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- तसेच, ईशान्य अरबी समुद्र आणि गुजरातलगतच्या भागात उच्चस्तरीय चक्रीय वारे निर्माण झाले आहेत.
- याशिवाय, देशाच्या काही भागात शीअर झोन हा एक अरुंद पट्टा तयार झाल्याने ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडत आहे. निर्माण होऊन पावसाला सुरुवात होते.
- त्याचबरोबर, समुद्रकिनारी ट्रफ हा आणखी एक प्रणाली सक्रिय असून तो दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळ किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे.
- या सर्व प्रणाली एकत्रितपणे मान्सून प्रवाहांना अधिक बळकट करीत असून आर्द्रता खेचून घेत आहेत.
- ओडिशातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाल्यानंतरच पावसाची तीव्रता कमी होईल, असं आयएमडीच्या एका शास्त्रज्ञानं सांगितलं.
आणखी वाचा : अमेरिकेकडून ६,००० विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द; कारण काय? डोनाल्ड ट्रम्प कठोर का झाले?
मुसळधार पावसाचा मुंबईकरांचे मोठे हाल
मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.रस्ते तसेच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. मुंबईबरोबरच ठाणे नवी मुंबईतही पावसाचा दिवसभर पाऊस पडत होता. अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, दादर, परळ, वरळी, वांद्रे या भागात पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सकाळी मिठी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली होती,ज्यामुळे नदीकाठच्या क्रांती नगर परिसरात गुडघाभर पाणी साचले आणि हा परिसर पूर्णपणे जलमय झाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने मिठी नदीजवळील झोपडपट्ट्यांमधून ३५० हून अधिक लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलं.
पावसामुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम
मुंबईतील पावसाचा रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. मंगळवारी सकाळी हार्बर लाईन तसेच मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे दरम्यानची वाहतूक पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने मंगळवारी दुपारी सांगितले की, मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे रुळांवर साचलेले पाणी बाहेर काढणे अशक्य होत आहे. रेल्वे स्थानके आणि रुळांवरील पाणी लवकर कमी करून सेवा पूर्ववत करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पूरसदृश परिस्थितीमुळे मुंबई महानगरपालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली.
हेही वाचा : अमेरिकेच्या आयात शुल्काला चीनने खरंच चकवलंय का? अर्थव्यवस्थेची स्थिती काय सांगते?
गेल्या पाच दिवसांत मुंबईत किती पाऊस झाला?
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवार आणि मंगळवारच्या सकाळी संपलेल्या २४ तासांत, सांताक्रूझ वेधशाळेत २२३ मिमी तर कुलाबा वेधशाळेत ११० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदीनुसार याच काळात मुंबईतील काही भागांत ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. गेल्या २४ तासांत, पश्चिम उपनगरातील चिंचोली येथे ३६९ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला, त्यानंतर कांदिवलीमध्ये ३३७ मिमी आणि दिंडोशी येथे ३०५ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई शहराच्या भागातील दादर येथे ३०० मिमी पाऊस पडला. याशिवाय, चेंबूरमध्ये २९७ मिमी, विक्रोळीत २९३ मिमी आणि पवईमध्ये २९० मिमी पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील हा सर्वात जास्त पाऊस आहे. यापूर्वी २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात सांताक्रूझ वेधशाळेत १,२४० मिमी पावसाची नोंद झाली होती.
मुंबईतील मुसळधार पाऊस कधीपर्यंत सुरू राहील?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पूर्वेकडील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाल्यावरच पावसाची तीव्रता कमी होईल. गेल्या दोन दिवसांपासून असलेला रेड अलर्ट बुधवारी सकाळी संपेल, तरीही शुक्रवारपर्यंत अतिवृष्टी कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुरुवारसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ तर रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी शुक्रवारी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाच्या रौद्ररूपामुळे अनेकांना ‘२६ जुलै’चे स्मरण झाले.