महायुतीची जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना ठाण्यासोबत पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढाही अद्याप कायम आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजकारणात हा मतदारसंघ नेमका कोणाकडे असेल याविषयी उत्सुकता आहे. वसई-विरारच्या राजकारणातील बडे प्रस्थ हितेंद्र ठाकूर या घडामोडींमध्ये नेमकी कोणती भूमिका घेतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात आणि केंद्रात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाशी ठाकूर नेहमीच सलगी करतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला तर ठाकुरांची भूमिका काय असेल याविषयी उत्सुकता कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील लाटेचा परिणाम नाही?

१९९०पासून वसई-विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. या पक्षाकडे ३ आमदार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना ठाकुरांच्या कलाने घ्यावे लागते. देशात काँग्रेसची हवा असो वा हिंदुत्वाची लाट, अगदी नरेंद्र मोदी यांच्या करिष्मा असलेल्या काळातही वसई-विरारमधील ठाकुरांचा बालेकिल्ला अभेद्य राहिला. आधी भाजपने, मग शिवसेनेने ठाकुरांना शह देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वसई-विरारच्या राजकारण आणि समाजकारणात ठाकुरांचा दबदबा कायम आहे. पूर्वी वसई-विरारचा भाग उत्तर मुंबई लोकसभेत यायचा. याठिकाणी भाजपचे बडे नेते राम नाईक यांचा गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर पराभव केला होता. गोविंदाच्या विजयात हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निर्णायक ठरली होती. तेव्हापासून वसई-विरारमधील ठाकुरांचा दबदबा अधिक चर्चेत आला.

हेही वाचा… मतदानाला जाण्याआधी काढल्या चपला, मतपेटीला केला नमस्कार- विदेशी माध्यमांनी टिपलं पहिल्या निवडणुकीचं चित्र

हितेंद्र ठाकूर यांचा उदय कसा झाला?

पूर्वी वसई हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. हितेंद्र ठाकूर यांचे काका काँग्रेसमध्ये होते. त्यांचे बोट धरून ठाकुरांनी राजकारणात प्रवेश केला. तरुण नेतृत्व असल्याने १९९० मध्ये त्यांना कॉंग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. ती संधी साधून ठाकूर यांनी विक्रमी मतांनी जनता दलाचे डॉमनिक घोन्साल्विस यांचा पराभव केला. वसई-विरारच्या राजकारणात ठाकुरांचा दबदबा तेव्हापासून दिसून आला. तो अजूनही कायम आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही लोकप्रियता का?

९० च्या दशकात वसई-विरारमध्ये गुंडगिरी आणि दहशत टोकाला पोहचली होती. वसईच्या ठाकूर बंधूंचे नाव यामध्ये सतत घेतले जात असे. एका प्रकरणात टाडा कायद्याखाली अटक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने ठाकुरांची पक्षातून हकालपट्टी केली. १९९५ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकून आले. राज्यातील एका बड्या राजकारण्याशी त्यांची असलेली सलगी तेव्हा वादाचा विषय ठरला होता. राज्याच्या विधान परिषदेत महत्त्वाच्या पदावर असणारा ठाण्यातील एका बड्या नेत्याशी ठाकुरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून येताना ठाकुरांची वसई-विरारमधील मते या नेत्यासाठी निर्णायक ठरत असत. साम, दाम, दंड, भेद या राजकारणासाठी चर्चेत राहिलेल्या ठाकुरांना ठाण्यातील या नेत्याचे नेहमीच पाठबळ राहिले. पुढे टाडातून त्यांची निर्दोष सुटका झाली. यानंतर कुठल्याही पक्षात जायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला. सुरवातीला वसई विकास मंडळाची आणि नंतर बहुजन विकास आघाडी पक्षाची स्थापना केली.

हेही वाचा… बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?

‘सोशल इंजिनियरिंग’चा यशस्वी प्रयोग?

ठाकुरांनी बहुजन विकास आघाडी हा पक्ष एक जात किंवा धर्मापुरता मर्यादित ठेवला नाही. या पक्षाकडून सातत्याने सोशल इंजिनियअरिंगचे प्रयोग होत राहिले. सर्वसामान्य मुस्लिम, ख्रिस्ती, आदिवासी, दलित, महिला आदींना या पक्षाने प्रतिनिधित्व दिले. सगीर डांगे, प्रकाश रॉड्रीक्स उपमहापौरपदी, बौद्ध समाजातील रुपेश जाधव महापौरपदी बसवले. वसई-विरारचे नागरिकरण वेगात असताना महापालिकेतीेल सत्तेमधून ठाकुरांनी वेगवेगळ्या जाती, धर्मातील नगरसेवकांना पुढे आणत वेगळा प्रयोग केला. हे या पक्षाचे महत्त्वाचे यश ठरले. वसई-विरारपुरते मर्यादित न रहाता आपला पक्ष पालघरच्या वाड्या, वस्त्यांपर्यत नेण्याची रणनीती ठाकुरांनी आखली. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना होताच पालघर मतदारसंघातून ठाकुरांचा पक्षाच्या पहिला खासदार निवडून आला. तीन आमदार, एक खासदार आणि शहरातील महापालिकेची सत्ता, शिवाय जिल्हा परिषदेत सदस्य अशी मोठी ताकद ठाकुरांनी अल्पावधीत निर्माण केली. २००१ साली काँग्रेस सरकार अल्पमतात आले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यंमत्री विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकाला पाठिंबा देताना वसई-विरारचा पाणी प्रकल्प ठाकुरांनी मंजूर करवून घेतला. त्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावली आणि लोकप्रियता कमालीची वाढली.

सत्ताधार्‍यांसोबत भूमिका काय होती?

अपक्ष असल्याने ठाकुरांना आपल्या मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे त्यांनी वरच्या पातळीवर सत्ताधाऱ्यांशी कधी संघर्ष केला नाही. सत्ताधारी कुणीही असला तरी त्याला ते समर्थन देत राहिले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत ठाकुरांच्या ३ आमदारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली. यापूर्वी ते कधी काँग्रेससोबत, कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहिले. शिवसेनेसोबत त्यांचे फारसे कधी जमले नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्या निकट असलेल्या एका नेत्यासोबत त्यांनी जुळवून घेतल्याची चर्चा नेहमीच राहिली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकुरांचे फारसे कधीच सख्य दिसले नाही. मात्र पालघर लोकसभेची गणिते लक्षात घेऊन शिंदे यांनी मध्यंतरी वसईत येत ठाकुरांवर स्तुतिसुमने उधळली. पालघर जिल्ह्याच्या राजकारणात ठाकुरांचे महत्त्व त्यामुळे पुन्हा अधोरेखित झाले.

हेही वाचा… सुरतेतल्या डायमंड बोर्सच्या झळाळीला काजळी; हिरे व्यापाऱ्यांची मुंबईत घरवापसी

नकारात्मक टीकेचा फायदा?

कुख्यात गुंड भाई ठाकूर हे हितेंद्र ठाकुरांचे मोठे बंधू. ९० च्या दशकात वसई-विरारमध्ये त्यांची दहशत होती. त्यामुळे ठाकुरांवर सतत गुंडगिरी, दहशतीचे आरोप होत राहिले. हे आरोप अनेकदा ठाकुरांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी ठाकुरांना गोळ्या घालणार असल्याचे वक्तव्य केले होते. प्रदीप शर्मा हे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शर्मा यांना ठाकुरांच्या विरोधात रिंगणात उतरविण्याची खेळी शिंदे यांचीच होती. मात्र शर्मा यांच्या वक्तव्याचा उलट परिणाम दिसून आला. ठाकुरांना सहानभूती मिळाली. परिणामी बविआच्या क्षितिज ठाकुरांनी शर्मा यांचा दणदणीत पराभव केला होता.

आगामी लोकसभेत भूमिका काय?

मागील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांचा बविआला पाठिंबा होता. या पाठिंब्याच्या बळावर ठाकूर यांच्या उमेदवाराला लक्षवेधी मते मिळतात हा इतिहास आहे. यंदा मात्र परिस्थितीत बदलली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि डाव्या पक्षांची एकी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांना मानणारा राष्ट्रवादी पक्षही ठाकरे यांच्यासोबत आहे. डाव्या पक्षांची एक मोठी व्होटबँक पालघर मतदारसंघात आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना हे दोन्ही पक्ष हे जाणून आहेत. त्यामुळे ठाकुरांनी पाठिंबा द्यावा असा या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. ठाकुरांनी मात्र याच पक्षांकडे पाठिंबा मागून त्यांची कोंडी केली आहे. पालघरची निवडणूक तिरंगी झाली तर पक्षाला चांगली संधी आहे हे ठाकूर जाणून आहेत. त्यामुळे बविआने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहे. मागील निवडणुकीत बविआला सुमारे ५ लाख मते मिळाली होती. बविआकडे निकाल फिरविण्याची क्षमता असल्याने सारेच पक्ष चिंतातुर झाले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained article about hitendra thakur and politics in vasai palghar area print exp asj
First published on: 16-04-2024 at 15:48 IST