आपल्या अष्टपैलू अभिनयामुळे वाहवा मिळवणारा अभिनेता रणवीर सिंह, आपल्या फॅशन सेन्समुळेही सदैव चर्चेत असतो. मात्र काही दिवसांपूर्वी एका अमेरिकी मासिकासाठी त्याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. २३ जुलैला रणवीरने ‘पेपर’ या मासिकासाठी केलेल्या फोटोशूटचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. यानंतर मात्र एकच वादळ उठले. रणवीरच्या या फोटोवरून अनेक मीम्स तयार झाले, त्याची खिल्ली उडवण्यात आली, त्याच्यावर सर्वच स्तरातून टीकाही करण्यात आली. राजकीय वर्तुळातही याचे पडसाद पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नाही तर त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेने आणि ठाण्यातील एक वकील वेदिका चौबे यांनी याप्रकरणी रणवीर विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. भारतीय संस्कृतीची पंरपरा लक्षात घेता अशा छायाचित्रामुळे महिलांसह सर्वाच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप एका तक्रारदात्याने केला आहे. तर दुसऱ्या तक्रारदाराने म्हटले की, रणवीर हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चित्रपट पाहून तरुण पिढी प्रोत्साहित होते. मात्र त्याने पोस्ट केलेले हे फोटो फार अश्लील आहेत आणि केवळ पैशाच्या लालसेपोटी त्यांनी हे केल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी रणवीर सिंहविरोधात अश्लीलता पसरवल्या प्रकरणी तक्रार दाखल केली असून भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर, तसेच, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी रणवीरच्या या फोटोशूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जर लोकांसमोर न्यूड होणं ही कला आणि स्वतंत्र्य असेल तर मग बुरखा परिधान करणं ही महिलांवर जबरस्ती का आहे?” असा सवाल त्यांनी केला होता.

दरम्यान, अनेक मंडळींनी रणवीरच्या या कृतीवर त्याचे समर्थन केले आणि उघडपणे त्याला पाठिंबा दर्शवला. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रणवीरच्या फोटोशूटचं कौतुकही केलं आहे. रणवीरवर त्याच्या कपड्यांवरून टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याच्या ड्रेसिंग सेन्सवरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र रणवीरने याकडे कधीही लक्ष दिले नाही. ‘लोक माझ्याबद्दल किंवा माझ्या कपड्यांबद्दल काय बोलतात यामुळे मला अजिबात फरक पडत नाही. मला जे आवडतं ते मी घालतो, ते मी खातो. मात्र जर ही गोष्ट एखाद्याला आवडत नसेल त्यासाठी मी काहीही करू शकत नाही.’ असं स्पष्ट मत त्याने व्यक्त केलं होतं.

एका घटनेमुळे इतका मोठा गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्यांवर आणि मॉडेलवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पूजा भट्ट, विद्या बालन, ट्विंकल खन्ना, मल्लिका शेरावत, शिल्पा शेट्टी, रीमा सेन, मधू सप्रे आणि मिलिंद सोमन यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र या गोष्टीकडे कितपत गांभीर्याने पाहावं हे बघणेही महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : विश्लेषण : न्यूड फोटोशूटबद्दल शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? जाणून घ्या

मुळात परदेशातील अभिनेते-अभिनेत्रींसाठी ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. न्यूड फोटोशूट किंवा चित्रपटातील इंटिमेट सीनचे चित्रीकरण करणे हा अभिनयाचाच एक भाग असल्याने याबाबत आता सर्वसाधारण एकमत झाले आहे. जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपण नग्नावस्थेतील मूर्ती आणि अनेक चित्र पाहतो. त्यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच नवल वाटले असेल. मात्र या मूर्तीच्या मागील गोष्टही अतिशय रंजक आहे. प्रसिद्ध इटालियन चित्रकार मायकेल एंजेलो यांनी बनवलेला एका नग्नावस्थेतील व्यक्तीचा पुतळा पुनर्जागरण काळातील सर्वात प्रसिद्ध काम मानले जाते. एवढेच नाही तर ही मूर्ती बायबलमधील डेव्हिड या पात्राच्या रूपात दाखवण्यात आली आहे.

परदेशातच नाही तर बॉलीवूडमध्येही यापूर्वी न्यूड चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून असे चित्रीकरण करण्यात आले होते. यामध्ये ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘राम ‘तेरी गंगा मैली’, यासारख्या चित्रपटांमधील अभिनेत्रींनी अर्धनग्न अवस्थेत चित्रीकरण केले आहे. मात्र त्यावरून एवढा मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं नाही. सध्या प्रत्येक गोष्टीला एका विशिष्ट चौकटीत मोजण्याचे आणि तिच्याविरुद्ध बंड करण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. त्यामुळेच एखाद्या गोष्टीने खरंच कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत का किंवा कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यावे हे एक समाज म्हणून आपण तपासायला हवे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nude statues and photos on the occasion of ranveer singh photo shoot let us know the historical culture around the world pvp