हर्षद कशाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अतिशय कमी वेळात भूसंपादन आणि रस्त्याचे काम कसे पूर्ण होऊ शकते याची प्रचिती या निमित्ताने आले. दर्जेदार महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या महामार्गामुळे आसपासच्या परिसरात सुबत्ता येईल यात शंका नाही. मात्र त्याच वेळी कोकणात समृद्धी आणू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे काम गेली चार दशके रखडले आहे. ते मार्गी लावणेही गरजेचे आहे.

सागरी महामार्गाची संकल्पना नेमकी काय आहे?

कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा महामार्ग असावा, ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल, मुंबईतून तळकोकणात जाण्याचे अंतर कमी होईल, मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरू शकेल, अशा विविध उद्दिष्टांसाठी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर सागरी मार्गाची निर्मिती केली जाणार होती. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८०च्या आसपास पहिल्यांदा या मार्गाची संकल्पना मांडली.

सागरी मार्ग कुठून जाणार?

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे. १९८०च्या दशकात या मार्गाचे काम सुरूही करण्यात आले होते. या मार्गावरील रस्त्याची कामे पूर्णही करण्यात आली होती. मात्र खाड्यांवरील पुलांची कामे रखडल्याने पुढे हे काम रखडले. रायगड जिल्ह्यातील दिघी-आगरदांडा, बागमांडला-बाणकोट, करंजा-रेवस या प्रमुख पुलांची कामे होऊ शकली नाहीत. तर दाभोळ, केळशी आणि जयगड येथील मोठे पूल होणे बाकी आहेत. काही ठिकाणी पुलांच्या जोडरस्त्याची कामे राहिली आहेत.

विश्लेषण : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोम्मईंनी नेमकं काय ट्वीट केलं? वाचा दावे-प्रतिदावे आणि संपूर्ण वाद…

सागरी महामार्गाची आजवरची वाटचाल कशी?

सागरी मार्गाची संकल्पना बॅरिस्टर अंतुले यांची. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी या दृष्टीने पावले उचलली. मात्र पुलांची कामे पूर्ण न झाल्याने मार्ग रखडला. त्यानंतर सुनील तटकरे यांनी वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार संभाळताना या पुलांना गती देण्याचा प्रयत्न केला. बाणकोट खाडीवरील पुलाचे काम सुरू करून घेतले. मात्र त्यांचे मंत्रिपद गेले आणि सागरी मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला. मध्यंतरी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही या सागरी मार्गाला गती देण्याचा मानस बोलून दाखवला होता. तसा आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी एका आंतराष्ट्रीय संस्थेला दिले होते. पण नंतर मात्र फारशी हालचाल झाली नाही. नंतर महाविकास आघाडी सरकारने स्वनिधीतून हा मार्ग करण्याचा निर्णय घेतला होता.

सुधारित आराखडा कसा आहे?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला १६ मे २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या ५४० किलोमीटर लांबीच्या आराखड्यात १६५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित मार्ग हा दुपदरी असणार आहे. त्यामुळे भूसंपादन मोठ्या प्रमाणात करावे लागणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. अत्याधुनिक पद्धतीच्या पुलांची उभारणी या मार्गावर केली जाणार आहे. या मार्गासाठी नऊ हजार कोटींची तरतूद महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कालखंडात करण्यात आली होती. पण सत्तासंघर्षानंतर हे काम पुन्हा एकदा बाजूला पडले आहे.

समृद्धी महामार्गावर तुम्हाला किती टोल भरावा लागणार? दरांबाबत अधिकृत माहिती आली समोर!

सागरी मार्ग का व्हायला हवा?

या सागरी महामार्गामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. कोकण किनारपट्टीवरील ९६ पर्यटन स्थळे या सागरी मार्गाला जोडली जाणार आहेत. कोकणातील अंतर्गत भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटन व्यवसाय हा रोजगारक्षम व्यवसाय आहे. त्याचा फायदा येथील कोकणवासियांना होऊ शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सागरी मार्गामुळे मुंबई ते गोवा हे अंतर तीन ते चार तासांनी कमी होणार आहे. यामुळे वाहतूक खर्चही कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे. त्यामुळे ज्या नेटाने समृद्धी महामार्गाचे काम झाले त्याच नेटाने सागरी महामार्गाच्या कामाला गती देणे गरजेचे आहे.

harshad.kashalkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revas reddy sea way pending samruddhi mahamarg transportation print exp pmw