रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर आठवड्याभरातच आघाडीचा फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी संघाच्या निवडीसाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा कस लागणार आहे. रोहित व विराटसारखे दोन दिग्गज खेळाडू या प्रारूपातून बाहेर पडल्याने त्या जागी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल, तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याचा आढावा.
विराट कोहलीची निवृत्ती का?
दोनच दिवसांपूर्वी कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ‘मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे आहे’, अशा आशयाचे पत्र लिहिले होते. तेव्हा ‘बीसीसीआय’ आणि निवड समितीकडून कोहलीला फेरविचार करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, कोहलीने सोमवारी समाज माध्यमावरून निवृत्तीची घोषणा करीत आपली निवृत्ती ही जाहीर केली. निवृत्तीच्या निर्णयाविषयी कोहली गेल्या महिन्याभरापासून ‘बीसीसीआय’ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, तसेच कुटुंबासाठी वेळ देण्याला कोहलीकडून पसंती होती, अशी माहिती मिळत आहे. गेल्या काही काळात विराट कसोटीमध्ये चांगल्या लयीत दिसत नव्हता. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्याने झळकावलेले शतक हे त्याचे अखेरचे ठरले. कोहलीचे तंत्र आणि तंदुरुस्ती पाहता तो आणखी काही वर्षे खेळू शकेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, क्रिकेटच्या पारंपरिक प्रारूपातील त्याच्या निवृत्तीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता विराट केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे.
विराटनंतर कोण?
येत्या काही दिवसांतच भारताच्या कसोटी संघाची घोषणा निवड समितीकडून करण्यात येईल. भारतीय संघ २० जूनला इंग्लंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यासह भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) नवी सत्राला सुरुवात होणार आहे. इंग्लंडचे वातावरण नेहमीच स्विंग गोलंदाजांना पूरक असते. त्यामुळे चौथ्या स्थानी फलंदाजी करणाऱ्या विराटच्या जागी एक तांत्रिकदृष्ट्या सक्षम पर्याय शोधण्याचे आव्हान निवड समितीसमोर असेल. विराटने आपल्या कारकीर्दीत ३० कसोटी शतके झळकावली. तसेच, नऊ हजारहून अधिक धावा केल्या. विराटसारख्या खेळाडूची जागा भरून काढणे कठीण आहे. मात्र, तरीही काही फलंदाजांचा यासाठी विचार केला जाऊ शकते.
श्रेयस अय्यर –
विराटच्या जागी सर्वाधिक पसंती श्रेयस अय्यरला मिळू शकते. भारतासाठी त्याने तिन्ही प्रारूपात सहभाग घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, कसोटीतील कामगिरीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १४ कसोटी सामन्यांत एक शतक व पाच अर्धशतक झळकावले आहे. श्रेयसच्या नावे १५ प्रथम श्रेणी शतके आहेत.
ध्रुव जुरेल –
यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलही या जागेसाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. या २४ वर्षीय फलंदाजाने भारताकडून चार कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या तंत्राने निवड समितीचे लक्ष वेधले. त्याच्या यष्टिरक्षणाचा दर्जाही चांगला आहे.
रजत पाटीदार –
इंग्लंडविरुद्ध झालेल्या गेल्या कसोटी मालिकेत रजत पाटीदारला कोहलीच्या जागी संघात स्थान मिळाले होते. त्यावेळी कोहली वैयक्तिक कारणामुळे मालिकेत सहभागी झाली नव्हता. मात्र, पाटीदारने तीन सामन्यांत एकच अर्धशतकी खेळी केली. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावे १३ प्रथम श्रेणी शतक आहेत. त्यामुळे त्याच्या नावावरही चर्चा होऊ शकते.
करुण नायर –
स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या करुण नायरलाही इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. कोहलीसाठी तो चांगला पर्याय असू शकतो. त्याने भारताकडून त्रिशतकही झळकावले आहे. यासह त्याचे २३ प्रथम श्रेणी शतके आहेत.
निवड समितीची भूमिका काय?
भारतीय कसोटी संघाची अलीकडच्या काळात कामगिरी चांगली राहिलेली नाही. गौतम गंभीर यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर कसोटीमध्ये भारताने निराशा केली. भारताच्या घरच्या मालिकेत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला. तिथेही भारताच्या पदरी निराशा पडली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीमुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. फलंदाजीतही रोहित लयीत दिसला नाही. यानंतर तो प्रारूपातून निवृत्ती घेण्याची चर्चा होती. त्याने तसा निर्णय घेतला. विराट कोहलीनेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवले. मात्र, एकाच आठवड्यात रोहित व विराट यांच्या निवृत्तीमध्ये निवड समितीने प्रमुख भूमिका पार पाडल्याची चर्चा आहे. याबाबत गंभीर यांनाही माहिती दिली असल्याचेही बोलले जात आहे. ‘‘इंग्लंड दौऱ्यासाठी नवा कर्णधार निवडणार असल्याचे रोहित शर्माला निवड समितीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर निवृत्ती घेण्याच्या कोहलीच्या विनंतीचाही आदर केला,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘डब्ल्यूटीसी’च्या नव्या सत्राला इंग्लंडच्या मालिकेने सुरुवात होत असल्याने भविष्याकडे पाहता नव्या संघबांधणीचा प्रयत्न निवड समिती करीत असल्याचे समोर येत आहे. निवड समिती शुभमन गिलवर नेतृत्वाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे. तर, परदेशात चांगली कामगिरी करणारा ऋषभ पंत उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडू शकतो.
अनुभवाची कमतरता?
रोहित आणि कोहली यांच्या निवृत्तीनंतर कसोटी संघात रवींद्र जडेजा हा एकमेव वरिष्ठ खेळाडू शिल्लक आहे. त्याला १२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. जडेजादेखील एक ते दोन वर्षांत या प्रारूपातून निवृत्त झाला नाही, तर अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजाराप्रमाणे त्यालाही संघाबाहेर केले जाऊ शकते. ईशांत शर्मा, उमेश यादव व वृद्धिमान साहा या खेळाडूंनाही निवृत्तीपूर्वीच संघाबाहेर करण्यात आले होते. निवड समितीने युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित केल्याने जडेजालाही संघातून वगळण्याची शक्यता वाढली आहे. जडेजाशिवाय कसोटी संघात जसप्रीत बुमरा व केएल राहुल यांना अनुभव आहे. दोघांनीही ४५हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. बुमरा सध्या ३१ व राहुल ३३ वर्षांचा आहे. दुखापतीमुळे बुमराची कारकीर्द किती काळ चालेल हे सांगता येणार नाही. राहुल तीन ते चार वर्षे अजून कसोटी क्रिकेट खेळू शकतो. मोहम्मद शमीही दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. त्यामुळे तोही इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज गेल्या इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यामुळे तिकडच्या परिस्थितीची जाणीव त्याला आहे. त्यामुळे निवड समिती संघाची संतुलन कसे राखते याकडे लक्ष राहील.
हार्दिक, शार्दूल, साई सुदर्शन?
रोहित व विराटच्या निवृत्तीनंतर संघात दोन जागा झाल्या आहेत. त्यातच रोहितच्या सलामीला पर्याय म्हणून सध्या लयीत असलेल्या साई सुदर्शनकडे पाहिले जात आहे. सुदर्शनने भारताकडून तीन एकदिवसीय व एक ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. त्याचे फलंदाजी तंत्र पाहता तो कसोटी क्रिकेट खेळण्यात सक्षम असल्याचे अनेक क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. सुदर्शनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सात शतके झळकावली आहेत. यासह इंग्लंड कौंटी क्रिकेटचा अनुभव त्याला असल्याने ती त्याची जमेची बाजू ठरू शकते. कसोटीतील सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा सलामीला येणे निश्चित आहे. संघ शार्दूल ठाकूर व हार्दिक पंड्या यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. शार्दूलला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यातच चांगली फलंदाजी करत असल्याचा फायदाही संघाला मिळू शकतो. हार्दिक हा भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यातील निर्णायक खेळाडू आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला फारसे योगदान देता आले नाही. त्याने आतापर्यंत केवळ ११ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने अखेरचा कसोटी सामना हा २०१८मध्ये खेळला होता.
© The Indian Express (P) Ltd