इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) साखळी फेरीचे सामने झाले असून गुरुवारपासून ‘प्ले-ऑफ’ला सुरुवात होईल. ‘क्वालिफायर-१’ सामन्यात पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. तर, ३० मे रोजी एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स व मुंबई इंडियन्स संघांमध्ये पार पडेल. साखळी फेरीत चमकदार कामगिरी करणारे सर्वोत्तम चार संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. गुजरात व मुंबई यांनी यापूर्वीही जेतेपदाची चव चाखली आहे. मात्र, पंजाब व बंगळूरु हे संघ अजूनही पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा ‘आयपीएल’ला नवीन विजेता मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल. कोणता संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, तसेच त्यांचे कच्चे दुवे व बलस्थाने काय आहेत याचा घेतलेला हा आढावा.
पंजाब किंग्ज
पंजाबचा संघ हा ‘आयपीएल’च्या सर्व १८ हंगामांमध्ये सहभागी होती. पंजाबने आपल्या पहिल्या हंगामात युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पहिल्या हंगामानंतर पंजाबची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पुढील पाच हंगामात संघ साखळीतच गारद झाला. २०१४मध्ये जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील पंजाबने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्यांना पराभूत केले. २०१४ नंतर प्रथमच पंजाबने ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले आहे. या हंगामात संघाने सुरुवातीचे दोन सामने जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, घरच्या मैदानावर राजस्थानकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. यानंतर कोलकाता संघाविरुद्ध त्यांनी १११ धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. मग झालेल्या सात सामन्यांत संघाने केवळ दोन सामने गमावले. दिल्लीकडून सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर संघाची चिंता वाढली होती. मात्र, मुंबईविरुद्ध अखेरच्या लढतीत एकतर्फी विजय नोंदवत ‘क्वालिफायर-१’मधील आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे संघाची लय पाहता त्यांना आपले पहिले जेतेपद मिळवण्याची संधी आहे.
बलस्थाने
– पंजाबच्या फलंदाजांनी या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे सलामीवीर प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्यने या हंगामात ९२३ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व सहा अर्धशतकांचा समावेश आहे. सुरुवातीच्या तीन फलंदाजांनी मिळून १४१८ धावांचे योगदान दिले आहे. तर, नेहल वढेरा व शशांक सिंह यांनीही काही निर्णायक खेळी केल्या.
– श्रेयस अय्यर व रिकी पॉन्टिंग या जोडीने संघाचे या हंगामात रुपडे पालटले. गेल्या वर्षी अय्यरने कोलकाता नाइट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिले होते. ‘प्ले-ऑफ’चे दोन सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होणार असल्याने त्यांचे पारडे जड दिसत आहे. अय्यरने या हंगामात ५१४ धावांचे योगदान दिले आहे.
कच्चे दुुवे
– मार्को यान्सन मायदेशी परतल्याने अर्शदीप सिंगसह कोण गोलंदाजी करणारा, याचा प्रश्न पंजाबसमोर असेल. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याकरिता त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. यान्सनने हंगामात १६ बळी मिळवले होते.
– अखेरच्या षटकातील गोलंदाजीसाठी पंजाबकडे पुरेसे पर्याय नाही. आतापर्यंत ओमरझाईला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. तर, लॉकी फर्ग्युसनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या काइल जेमिसनला यश मिळालेले नाही. चहलची दुखापत संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा संघही ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. २००९ मध्ये त्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले होते. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघाने २०११ व २०१६ मध्येही अंतिम फेरी गाठली. पुन्हा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज व २०१६मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. बंगळूरुने १८ हंगामात दहा वेळा ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. बंगळूरुची सुरुवातही काहीशी पंजाबप्रमाणे झाली. त्यांनी घरच्या बाहेर सुरुवातीच्या दोन सामन्यात कोलकाता व चेन्नईला पराभूत केले. मात्र, घरच्या मैदानात गुजरातकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लीगच्या मध्यांतरापर्यंत बंगळूरुच्या नावे चारच विजय होते. यानंतर संघ सलग पाच सामने अपराजित राहिला. बंगळूरुने सलग दुसऱ्या हंगामात ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. लखनऊविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना २२५ हून अधिक धावांचा पाठलाग करताना अव्वल दोन संघातील स्थान निश्चित केले.
बलस्थाने
– आघाडीचा फलंदाज विराट कोहली हा संघासाठी चांगल्या लयीत आहे. त्याने आतापर्यंत आठ अर्धशतकांची नोंद केली असून तो चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने सध्याच्या हंगामात १३ सामन्यांत ६०२ धावा केल्या आहेत. फिल सॉल्टही कोहलीची चांगली साथ देत आहे. साॅल्टच्या नावे ३३१ धावा आहेत. लखनऊविरुद्धच्या सामन्यात जितेश शर्माने नाबाद ८५ धावांची खेळी करीत योगदान दिले होते.
– परदेशी खेळाडू मायदेशी परतत असताना वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने खेळण्याचा निर्णय घेतल्याने बंगळूरुची ताकद वाढली आहे. त्याने हंगामात आतापर्यंत १८ बळी मिळवले आहेत. त्यामुळे त्यांची गोलंदाजी भक्कम दिसत आहे. त्यातच यश दयाल, नुवान तुषारा यांचीही साथ त्याला मिळेल. फिरकीची धुरा कृणाल पंड्यावर असेल.
कच्चे दुवे
– बंगळूरुचा कर्णधार रजत पाटीदार दुखापतीमुळे क्षेत्ररक्षण करताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीची लयही खराब झाली आहे. तो जायबंदी झाल्याने इतर खेळाडूंवर दबाव वाढला आहे. टिम डेव्हिडच्या तंदुरुस्तीबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही. मात्र, तो खेळल्यास बंगळूरुला त्याचा फायदा मिळू शकतो.
– बंगळूरुकडे चांगल्या फिरकीपटूंचा अभाव आहे. गेल्या दोन सामन्यांत कृणाल पंड्या व सुयश शर्मा यांनी धावा दिल्या आहेत. त्याच्या डावाच्या मधल्या षटकांमध्ये धावा रोखता आलेल्या नाही. यासह भुवनेश्वर कुमार व रोमारियो शेफर्ड यांनीही प्रभाव पाडता आलेला नाही.
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये प्रथमच ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्याच हंगामात विजेता ठरला. २०२३ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला. मात्र, यावेळी चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. २०२४ मध्ये गुजरातने शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली. मात्र, संघाने गेल्या हंगामात निराशा केली. ते आठव्या स्थानी राहिली. यावेळी त्यांनी चमकदार कामगिरी करताना ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. गुजरातची यंदाच्या हंगामाची सुरुवात पराभवाने झाली. यानंतर गुजरातने सलग चार सामने जिंकत जोरदार पुनरागमन केले. मग, संघाने पुढील पाच सामन्यांपैकी पाचमध्ये विजय नोंदवला. अखेरचे दोन सामने गमावल्याने त्यांना अव्वल दोन संघांत स्थान मिळवता आले नाही.
बलस्थाने
– सध्याच्या हंगामात गुजरातची शीर्ष फळी प्रभावी राहिलेली आहे. त्यांच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी मिळून १४ सामन्यांत १८६६ धावा केल्या आहे. यामध्ये एक शतक व १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
– गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा व फिरकीपटू साई किशोर यांनी संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांत त्यांनी ४० गडी बाद केले. कृष्णा २३ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत अव्वल दोन स्थानी आहे. तर, १७ बळींसह साई किशोर सहाव्या स्थानावर आहे.
कच्चे दुवे
– गुजरातला ‘प्ले-ऑफ’मध्ये जोस बटलरशिवाय उतरावे लागले. साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल यांना गेल्या दोन सामन्यांत अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे सलामीवीर लवकर बाद झाल्यास मध्यक्रमावर दबाव येऊ शकतो.
– गुजरातच्या मध्यक्रमाला या हंगामात धावा करता आलेल्या नाही. चार ते सातव्या क्रमांकावरील एकाही फलंदाजाने अर्धशतकाची नोंद केली नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीत गुजरातच्या मध्यक्रमाचा कस लागेल.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स ‘आयपीएल’मधील यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी आतापर्यंत पाच जेतेपद मिळवली आहेत. त्यांनी अखेरचे जेतेपद २०२० मध्ये पटकावले होते. मुंबईने २०१० मध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठली. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुंबईने २०१३ मध्ये पहिले जेतेपद मिळवले. यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० हंगामात मुंबईने जेतेपदाची चव चाखली. सध्याच्या हंगामात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीच्या पाचपैकी चार सामने त्यांनी गमावले. मग, मुंबईने सलग सहा सामने जिंकत दमदार पुनरागमन केले. गुजरातने त्यांचा विजयरथ रोखला. मुंबईला अखेरच्या दोन सामन्यांत एका विजयाची आवश्यकता होती. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करीत ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना पंजाबकडून पराभूत व्हावे लागले.
बलस्थाने
– मुंबईची फलंदाजी नेहमीच त्यांची ताकद राहिलेली आहे. सलामीवीर रोहित शर्मा व रायन रिकल्टन वेगवान सुरुवात देत आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स व नमन धीर मध्यक्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर, हार्दिक पंड्या विजयवीराची भूमिका पार पाडत आहे. सूर्यकुमारने पाच अर्धशतकांसह हंगामात ६४० धावा केल्या आहेत.
– मुंबईकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. जसप्रीत बुमरा व ट्रेंट बोल्ट शिवाय दीपक चाहर आणि हार्दिकच्या रुपाने संघाकडे पर्याय आहेत. बोल्ट नव्या चेंडूने फलंदाजांना अडचणीत आणतो. तर, हंगामात १७ बळी मिळवणारा बुमरा कोणत्याही संघाची डोकेदुखी वाढवू शकतो. चाहर व हार्दिक यांनी मिळून १० गडी बाद केले आहेत.
कच्चे दुवे
– ‘प्ले-ऑफ’ सामन्यात फिरकी गोलंदाज मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. संघाकडे मिचेल सँटनरशिवाय चांगल्या दर्जाचा फिरकीपटू नाही. सँटनरने सात गडी बाद केले आहेत. संघातील फिरकीपटूंनी हंगामात २७ बळी मिळवले आहेत. तर, वेगवान गोलंदाजांच्या नावे ६९ बळी आहेत.
– सध्याच्या हंगामात मुंबईने १८०हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. या हंगामात मुंबईने आतापर्यंत १७६ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पूर्ण केले होते. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची वेळ मुंबईवर आल्यास त्यांना रणनिती आखून खेळावे लागेल.