नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत आपले महत्त्व अधोरेखित केले. भारतातील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल मानल्या जातात. मात्र, त्यावरही वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे बुमराने दाखवून दिले. भारतासाठी बुमरा इतका महत्त्वाचा का, तो इतरांपेक्षा वेगळा कसा ठरतो, याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या कसोटीत बुमराचे योगदान निर्णायक कसे?

भारत दौऱ्यावर आलेला इंग्लंडचा संघ ‘बॅझबॉल’ रणनीतीनुसार खेळतो. त्यांच्या आक्रमक फलंदाजीला वेसण घालण्याचे काम हे बुमराने केले. त्याने दुसऱ्या सामन्यात नऊ गडी बाद करीत निर्णायक भूमिका पार पाडली. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असतानाही बुमराने आपली छाप पाडली. पहिल्या डावात ४५ धावांत ६ गडी बाद केले. तर, दुसऱ्या डावात त्याने ४६ धावांत ३ फलंदाजांना माघारी धाडले. आपल्या या कामगिरीदरम्यान त्याने अनेक अप्रतिम चेंडू टाकले. याचा फायदा संघाला झाला.

हेही वाचा : इन्फोसिसमुळे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक अडचणीत? नारायण मूर्तींच्या कंपनीला ब्रिटनमध्ये ‘व्हीआयपी प्रवेश’ देण्याचे प्रकरण काय आहे?

दुसऱ्या कसोटीतील कामगिरीनंतर बुमरा काय म्हणाला?

दुसऱ्या कसोटीत निर्णायक भूमिका पार पाडल्यानंतर आपण भारतीय संघात जुन्या व नवीन गोलंदाजांमध्ये दुवा म्हणून काम करीत आहे, असे बुमरा म्हणाला. भारतीय संघात सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. माझ्या परीने सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मी आकड्यांकडे पाहत नाही. युवा असताना मला आकडे महत्त्वाचे वाटायचे. आता मात्र संघाने यश मिळवले तरी मी समाधानी असतो, असे बुमराने सांगितले. बुमराने ऑली पोपला बाद करताना टाकलेल्या ‘यॉर्करची’ सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बुमरा म्हणाला, ‘‘मी युवा असताना सर्वप्रथम ‘यॉर्कर’ चेंडू टाकण्यास शिकलो. गडी बाद करण्यासाठी तोच योग्य चेंडू असल्याचे मला वाटायचे. मी वकार युनुस, वसिम अक्रम व झहीर खान या दिग्गजांना गोलंदाजी करताना पाहिले होते. त्यांचे अनुकरण करण्याचा माझा प्रयत्न असायचा,’’ असे बुमरा म्हणाला.

बुमराच्या गोलंदाजीत वेगळेपण काय आहे?

बुमराचे वेगळेपण हे त्याच्या गोलंदाजी शैलीत (ॲक्शन) आहेत. त्याचा गोलंदाजीचा सामना करणे अनेक आघाडीच्या फलंदाजांना जमत नाही. बुमराचा ‘रन अप’ जरी फारसा नसला तरीही, आपल्या अचूक गोलंदाजीमुळे बुमराने छाप पाडली आहे. त्याच्या भात्यात ‘स्लोवर बॉल’, ‘याॅर्कर’ आणि ‘बाऊन्सर’ सारखे चेंडू आहेत. डावखुऱ्या फलंदाजांसाठी तर बुमरा आणखी घातक ठरतो. सध्या क्रिकेटच्या सर्वच प्रारूपांत बुमराने भारतासाठी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. तसेच नवीन व जुन्या अशा दोन्ही चेंडूने बुमरा गोलंदाजी करण्यास सक्षम असल्याने कसोटी सामन्याच्या कोणत्याही सत्रात कर्णधारचा तो हक्काचा गोलंदाज ठरतो.

हेही वाचा : ‘चारशेपार’च्या रणनीतीसाठी भाजप नव्या ‘मित्रां’च्या शोधात? पूर्वेपासून उत्तरेपर्यंत मोहीम….

बुमराची क्रिकेटच्या सर्व प्रारूपांतील कामगिरी कशी आहे?

बुमराने आजवर खेळलेल्या ३४ कसोटी सामन्यांत १५५ फलंदाजांना बाद केले आहेत. यामधील ८६ धावांवर ९ गडी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर, त्याने तब्बल दहा वेळा पाच गडी बाद केले आहेत. बुमराने ८९ एकदिवसीय सामन्यांत १४९ बळी मिळवले आहेत. तर, त्याने दोन वेळा पाच गडी बाद करण्याची किमया साधली. ट्वेन्टी-२० प्रारुपातही बुमरा मागे नाही. त्याने खेळलेल्या ६२ सामन्यांत ७४ गडी बाद केले आहे. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याची भूमिका ही निर्णायक राहणार आहे.

हेही वाचा : कर्नाटकात ‘मंकी फिव्हर’चा वाढता कहर : मानवासाठी धोकादायक ठरत असलेला हा आजार काय आहे?

बुमराच्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली?

इतर खेळाडूंप्रमाणे बुमरानेही लहान वयातच खेळण्यास सुरुवात केली. आपली कामगिरी उंचावताना त्याने गुजरातच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. यानंतर बुमराची निवड ही सय्यद मुश्ताक अली या स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेत झाली. त्याने गुजरात संघाच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली. या स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सचे तत्कालीन प्रशिक्षक जॉन राइट ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. त्यांचे लक्ष बुमराकडे गेले आणि त्यांनी मुंबई इंडियन्स संघासोबत त्याला करारबद्ध केले. मुंबईसाठी ‘आयपीएल’मध्ये त्याने निर्णायक कामगिरी केली. यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. मुंबईमध्ये असताना त्याने श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाचेही मार्गदर्शन त्याला लाभले. २०१६ मध्ये भारताच्या ट्वेन्टी-२० संघात त्याची वर्णी लागली. त्यानंतर एकदिवसीय व मग कसोटी संघात त्याला स्थान मिळाले. तेथून त्याने कामगिरी उंचावली आणि सध्या तो भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why jasprit bumrah is important for indian cricket team how he is different from other players print exp css
First published on: 08-02-2024 at 08:14 IST