सागरी नियम क्षेत्राचे उल्लंघन करत आणि मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभारून गेल्या काही वर्षांत भिवंडीत प्रचंड असे गोदाम क्षेत्र विस्तारले आहे. भिवंडी तालुक्यातील गोदामांच्या विस्तारामुळे एक मोठे आर्थिक केंद्र येथे स्थिरावले आहे. हातमाग ते यंत्रमाग असा प्रवास करत भारतातले मँचेस्टर म्हणून काल-परवापर्यंत भिवंडी ओळखले जात असे. आता या संपूर्ण तालुक्याने पुन्हा कात टाकली आहे. भारतातले सर्वांत मोठे गोदाम क्षेत्र ( वेअर हाऊस) या ठिकाणी उभे राहिले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील ई-कॅामर्स कंपन्यांची सर्वाधिक गोदामे येथे सुरू आहेत. साधारणपणे २० कोटी चौरस फुट क्षेत्रफळाची दहा हजारांहून अधिक अधिकृत, अनधिकृत गोदामे या भागात असावीत असा साधारणपणे अंदाज आहे. शहरांना खेटून उभ्या असलेल्या मात्र आपला ग्रामीण बाज टिकवून ठेवलेल्या या गावांमध्ये व्यापारी बेटच गेल्या काही दशकांत उभे राहिले आहे. हा इतका मोठा व्यापार-उदीम या भागात उभा राहात असताना सरकारी पातळीवर पायाभूत सुविधांचे कोणतेही ठोस नियोजन अनेक वर्षांत पाहायला मिळालेले नाही. याचे भयावह परिणाम आता दिसू लागले असून अमेरिकेमधील नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनाॅमिक रिसर्च या एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भिवंडी जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत संथ वाहतुकीचे शहर बनले आहे. गुगल नकाशाच्या आधारावर या संस्थेने जगभरात सर्वेक्षण केल्यानंतर भिवंडीचा संथ शहरांमध्ये पाचवा क्रमांक लागला. त्यामुळे भिवंडीतील वाहतूक व्यवस्थेविषयीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडीचे व्यापारी बेट कसे बनले?

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २००७ मध्ये भिवंडी आणि आसपासच्या भागातील गोदामांचे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात या गावांमधील ६५१ हेक्टर जागा गोदामांनी व्यापल्याचे लक्षात आले. खाडी किनाऱ्याचा भाग, पाणथळ जागा, सीआरझेड क्षेत्रात बेकायदा भराव टाकून रातोरात गोदामे उभी करणारी एक मोठी साखळी सन २००० च्या दशकात भिवंडीत कार्यरत झाली होती. महापालिकांच्या हद्दीत सुरू असलेल्या ‘जकात राज’ला व्यापारी मंडळी कंटाळली होती. मुंबईतील गोदामे आर्थिकदृष्ट्या परवडणारी नव्हती. यातूनच मुंबई, ठाण्याला लागूनच भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात या गोदाम क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे अशा प्रमुख शहरांच्या केंद्रस्थानी आणि उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरापासून काही मिनिटांच्या अंतरावर स्थानिक भूमाफिया, राजकीय नेते, प्रशासकीय संगनमताने शेकडो हेक्टरच्या जागा बळकाविल्या गेल्या आणि तेथे हा बेकायदा गोदामांचा उद्योग सुरू झाला. हा उद्योग आता इतका विस्तारला आहे की राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून या गोदामांना अधिकृत मान्यता देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?

मोठ्या उद्योगांच्या साठवणुकीचे शहर कसे बनले?

मुंबई-नाशिक महामार्गामुळे भिवंडी परिसरात सुरुवातीपासूनच दळणवळणाच्या सुविधांची वानवा नव्हती. येथील जमीनही स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे व्यापाऱ्यांनी येथे गोदामे थाटण्यास सुरुवात केली. मिठापासून इमिटेशन ज्वेलरीपर्यंत, धान्यापासून एलसीडी टिव्हीपर्यंत आणि सायकलींपासून आलिशान गाड्यांपर्यत अनेक वस्तूंचा साठा करणारी गोदामे येथे आहेत. ई-काॅमर्सचे जाळे जगभर विस्तारत असताना भिवंडीतील या गोदाम केंद्राला अधिकच मागणी आली. सेफ एक्सप्रेस या कंपनीचे अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित भारतातले पहिले अडीच लाख लाख चौरस फूट जागेवरील गोदाम या पट्ट्यात २००४ च्या सुमारास उभे राहिले आणि अनेकांचे डोळे विस्फारले. पुढे ॲमेझाॅनपासून अनेक मोठ्या कंपन्यांची गोदामे येथे उभी राहू लागली. जमीन वापराला मर्यादा येथे असल्याने या गोदामांची बांधणी पुढे बहुमजली होऊ लागली. सुरुवातीला दोन ते तीन हजार चौरस फुटांची गोदामे आता ५० लाख चौरस फुटांपर्यंत झेपावली आहेत. यंत्रमाग नगरीला खेटून उभी असलेली कशेळी, काल्हेर, पूर्णा, कोपर, राहनाळ, वळ, गुंदवडी, दापोडा, वळपाडा, ओवळी, खारबाव अशी एकापाठोपाठ अनेक गावे आता गोदामांची केंद्र बनली आहेत.

हेही वाचा : ‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?

येथील वाहतूक कशी होते?

यंत्रमागाचे शहर म्हणून भिवंडीची सुरुवातीची ओळख आहे. येथे कापड निर्मितीचे प्रमाण आजही मोठे आहे. येथे तयार केले जाणारे कापड देश-विदेशात विक्रीसाठी जाते. तसेच इतर वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे कारखाने, गोदामे या शहरात आहे. शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग आणि कशेळी-भिवंडी मार्ग हे दोन रस्ते जातात. या दोन्ही मार्गांवरून जड-अवजड वाहनांची वाहतूक भिवंडीत होत असते. तर मुंबई, ठाणे येथून नाशिक, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. शहराच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. भिवंडी वळणरस्ता भागात मोठी गृहसंकुले तयार झाली आहेत. त्या तुलनेत या भागात वाहतुकीची सुविधा तसेच पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. गोदाम परिसरातील रस्त्यांची दैना झाली आहे. खारफुटी नष्ट करून काही ठिकाणी गोदामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खाडीचे पाणी रस्त्यावर येत असते. अरुंद रस्ते, पावसाळ्यात पडलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडीचा ताप नागरिकांना नकोसा झाला आहे.

हेही वाचा : इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?

कोंडीचा त्रास लगतच्या नगरांना कसा होतो?

मुंबई-नाशिक हा महामार्ग असतानाही खारेगाव टोलनाका ते वडपे या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे. तर काही ठिकाणी मार्गिकेची अवस्था वाईट आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतुकीला मुभा आहे. अवजड वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत असते. अनेकदा अवेळी अवजड वाहनांची वाहतूक होते. अवजड वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक जड वस्तूंची वाहतूक होते. तसेच नादुरुस्त वाहनेही रस्त्यावरून धावतात. ही वाहने बंद पडल्याने कोंडी होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हा रस्ता असताना त्यांच्याकडून रस्त्याची नियमित दुरुस्ती होत नव्हती. त्यामुळे भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास लगतच्या नगरांनाही होऊ लागला आहे.

हेही वाचा : विश्लेषण: फक्त कर्नाटकच्या गुलाबी कांद्यालाच निर्यात शुल्कमाफी का?

भविष्यात महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढेल?

नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग तयार होत असल्याने भविष्यात समृद्धी महामार्गावरील वाहनांचा भार मुंबई-नाशिक महामार्गावर वाढणार आहे. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून वडपे ते माजिवडा येथे आठपदरी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. रस्ता तयार झाला तरी समृद्धी महामार्गाचा भार वाढल्याने कोंडीची शक्यता कायम राहू शकते. माजिवडा ते वडपे भागात रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. एकूण आठ पदरी रस्ता केला जाणार आहे. तर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन सेवा रस्ते तयार केले जातील. या महामार्गावरील काँक्रिटीकरण सध्या ३५ टक्के पूर्ण झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why traffic jams in bhiwandi due to large number of warehouses print exp css