Ganesh Utsav 2023:  ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चित्रपटातील अनोख्या कथेने आणि कलाकुसरीने लोकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतासह जगभरात या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले आहे. या चित्रपटाने प्रचंड यशाने एक बेंचमार्क सेट केला नाही तर भारतासह जागतिक स्तरावर एक वेगळी क्रेझ निर्माण केली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास एक वर्ष उलटले, परंतु चित्रपटाबद्दल उत्साह आणि क्रेझ मात्र तसूभरही कमी झालेली नाही. कारण यंदाही अनेक गणेश मंडळांचे देखावे कांतारा पॅटर्नने सजवण्यात आले आहेत. या सुंदर देखाव्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका ठिकाणी कांतारा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पांजुर्ली देवतेच्या रुपात बाप्पा विराजमान झाले आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी पांजुर्ली देवतेबरोबर गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या दोन वेगवेगळ्या देखाव्यांचे व्हिडीओ सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पहिल्या देखाव्याच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गणपती बाप्पाच्या मूर्ती कांतारा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पांजुर्ली देवतेच्या रुपात आहे. गणरायाची ही मूर्ती अगदी हुबेहूब पांजुर्ली देवतेच्या रुपात साकारली आहे; तर आजूबाजूला घनदाट जंगलाचे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले आहे. कांतारा थीमवर आधारित ही मूर्ती छत्तीसगढ रायपूरमधील राठौर चौक, गंजपारा या ठिकाणी साकारण्यात आली आहे, जी पाहण्यासाठी भाविकही मोठी गर्दी करत आहेत.

कांतारा थीमवर आधारित गणेश मुर्ती

यानंतर दुसऱ्या एका देखाव्याच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कांतारा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पांजुर्ली देवतेसह गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. शिवाय या बाप्पाचे पंडाल कांतारामधील लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या थीमवर सजवण्यात आले आहे. यात घनदाट जंगल आणि त्यात कांतारामधील व्यक्तिरेखांचे प्रतिकात्मक पुतळे बसवण्यात आले आहेत. गणपती बाप्पाच्या पंडालमधील हे दृश्य भाविकांना कांतारासारख्या वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे.

यावरून कांताराविषयी संपूर्ण भारतात आजही टिकून असलेली क्रेझ, प्रेम यानिमित्ताने दिसून आले. इतक्या वर्षात अनेक चित्रपट आले, पण या चित्रपटासारखी क्रेझ आजपर्यंत कधीच पाहायला मिळाली नाही.

ऋषभ शेट्टी यांनी कांतारासह दिलेला दैवी अनुभव हा चित्रपटाचा यूएसपी आहे. यामुळे प्रेक्षकांना तो अधिक दिव्य आणि समृद्ध करणारा अनुभव देतो. ऋषभ सध्या त्याच्या ग्लोबल ब्लॉकबस्टर कांताराच्या सीक्वलवर काम करत आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे, त्यामुळे लवकरच कांताराचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kantara fever panjurli daiva seen in ganesh pandals during ganesh chaturthi 2023 kantara themed ganesha murti 2023 in india sjr