कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी भाजपात इच्छुकांचे रांग लागलेली असताना त्यात पुन्हा दोन माजी उपनगराध्यक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव यांच्यासह इच्छुकांचे मोठी फौज प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दाखल झाली. आताच्या इच्छुकांच्या रांगेतून कोणाला उमेदवारी द्यायची याचा पेच भाजपात निर्माण झाला असताना नव्याने दाखल झालेल्या इच्छुकांना संधी देण्यावरून स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी महायुतीत कमालीचा उत्साह दिसत आहे. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे दोन वेळा आमदार झाल्याने त्यांनी येथे भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह आवाडे परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची लक्षणीय ताकद वाढली. आवाडे घराण्यातील तिसरा प्रतिनिधी राहुल आवाडे हे भाजपचे आमदार झाले आहेत. यामुळे एकूणच इचलकरंजी मध्ये भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्यांची तोबा गर्दी झाली आहे.
ही गर्दी पाहता एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळतील का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी समाधानकारक तोडगा न निघाल्यास वेगळी वाट चोखाळण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, राहुल आवडे – एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्यात झालेली चर्चा समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते. पण अजितदादा राष्ट्रवादी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
याचवेळी भाजपने आणखी एक ते पाऊल पुढे टाकत नवी कुमक पक्षात दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकी वेळी सुरेश हाळवणकर यांना भाजपने उमेदवारी डावल्याने माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारात झोकून दिले होते. आता त्यांची घरवापसी झाली आहे. आता ते हाळवणकर यांच्यासोबत नव्याने काम करणार असल्याचे दिसत आहे. जाधव यांनी पूर्वी पालिका राजकारणात आवडे यांच्यासमवेत एकत्रित काम केले होते. मधल्या काळात दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. ते पाहता आता त्यांच्याच पुन्हा नव्याने किती सख्य जमणार असा याचे कुतूहल असणार आहे.
याशिवाय, एकनाथ शिंदे शिवशसेनेचे शहर समन्वयक माजी नगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यासह सहकाऱ्यांनीही भाजपत प्रवेश केल्याने हा शिंदे गटाला धक्का आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे यांनी शहर उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस, चार संघटक, चार सचिवसह विविध आघाड्यांचे प्रमुख असा मोठा गट घेऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यातून हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला शह मानला जात आहे.
आधीच भाजपची इच्छुकांची संख्या वाढली असताना ही नवी कुमक दाखल झाल्याने महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपाचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे. त्यातून मार्ग काढणे ही स्थानिक नेतृत्वाची अग्निपरीक्षा ठरणार आहे.
तिसऱ्या धक्क्यांची तयारी
महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना पक्षाने , नेतृत्वाने उमेदवारीसाठी पक्का शब्द दिलेला नाही. सर्वसाधारण, महिल, ओबीसी, मागासवर्गीय आदी जागांचे आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर काही जण उमेदवारीची आशा धरून भाजपात प्रवेश करण्याची तयारी सुरू आहे. भाजप या माध्यमातून तिसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.