कोल्हापूर : रत्नागिरी -नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक रस्त्याचे चौपट मोबदला मिळण्यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.
भूमी संपादनासाठी चौपट मोबदल्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी सुरू करू दिली जाणार नाही, असा निर्धार करीत शेतक-यांनी मोजणीस ठाम विरोध केला आहे. हातकंणगले व शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख उपाध्यक्ष कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन स्थळी खासदार, आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
रत्नागिरी नागपूर महामार्गातील चोकाक ते अंकली या रस्त्याच्या भूसंपादनासाठी सोमवारपासून मोजणी करण्यात येणार असल्याच्या नोटिसा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाकडून बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी आजपासून मोजणी सुरू होणार असल्याने त्यास विरोध करण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकऱ्यांनी दोन्ही तालुक्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये विक्रम पाटील ,अमित पाटील ,अभिजीत इंगवले , सुधाकर पाटील , अविनाश कोडोले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.” सहा महिन्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौपट मोबदला देण्याचा निर्णय केला म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,आमदार अशोकराव माने यांनी जाहीर सत्कार केला होता त्याच काय झालं ? ” असा संतप्त सवाल शेतक-यांनी उपस्थित केला.
हे आंदोलन फक्त बाधित शेतकऱ्यांचे नाही तर महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गातील कृष्णा नदीवरील होणा-या पुलामुळे उमळवाड , कोथळी , सांगली शहर , धामणी , समडोळी कवठेपिराण , सांगलवाडी , हरिपूर , दानोळी , कवठेसार , हिंगणगांव , कुंभोज, दुधगांव, सावळवाडी ,माळवाडी ,किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार होणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे.
या प्रश्नासाठी मार्च महिन्यामध्येही कोल्हापूर सांगली मार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती.शिरोळ तालुक्यातील जैनापुर येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बाह्यवळण महामार्गावर होणारा मार्ग कसा करावा या मागण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी उपोषणाला बसले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. तेव्हा पोलिसाकडून घरात घुसून कार्यकर्ते ताब्यात घेतले होते.शेतकरी रानात वैरणीसाठी गेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक बैठक झाली होती. त्यामध्ये भूमिसंपदानासाठी चौपट मोबदला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याची कार्यवाही न होता पुन्हा मोजणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे.
