कोल्हापूर : ऊसदरासाठी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर तसेच पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर या खासगी कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. तर ऊसदर आंदोलनाचे लोण कागल तालुक्यात पोहोचले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या तालुक्यातील ऊसतोडणी बंद पाडल्या. गत हंगामातील उसाला २०० रुपये आणि चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल ३८०० रुपये प्रतिटन विनाकपात मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश संघटनेसह इतर सर्वच संघटनांकडून आंदोलन सुरू आहे.
अशातच आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना कारखाना समर्थकांनी मारहाण केली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याठिकाणी आंदोलक, शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. ऊसतोडणी व वाहतूक संदर्भात कोणत्याच प्रकारची चर्चा न करता साखर कारखानदारांकडून सुरू असलेली अरेरावी, मुजोरी हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबाबत तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कागलमध्ये वाहने अडवली. दरम्यान, ऊस दरासाठी गेल्या आठवड्यापासून शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यात ऊसतोडी रोखण्यात आल्या. आज कागल तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले. उसाची वाहने रोखण्यात आली. वाहनधारकांना पुन्हा ऊसतोड वाहतूक करू नका असे आवाहन करण्यात आले.
दालमिया शुगरवर मोर्चा
आसुर्ले येथील दालमिया शुगर या कारखान्याने शेतकऱ्यांना योग्य दर दिला नसल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यावर आज मोर्चा काढला. दालमिया, बिद्री , कुंभी या साखर कारखान्यांनी ———एक रक्कम एफआरपी मध्ये मोडतोड केली आहे. हे तीन कारखाने लेखी दर देत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
