कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित राहिले आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी गेली सात आठ वर्ष तयारीत असलेल्या ग्रामीण भागातील बड्या नेत्यांचा हिरेमोड झाला आहे. बड्या घराण्यातील नेते आपल्या घरातील पत्नी, सून, मुलगीकडे अध्यक्षपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.  कोणत्या पक्षाचे अधिक सदस्य निवडून येणार यावर अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे अवलंबून असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी अंतर्गत संघर्ष रंगणार आहे. माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर , आमदार राहुल आवाडे, माजी आमदार बजरंग देसाई अशा मातब्बर नेत्यांनी घराण्याकडे अध्यक्षपदी यावे याची तयारी चालवली आहे.

 कोल्हापूर जिल्हा परिषदेत सुरुवातीपासून काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी असे दोन पक्ष झाल्यानंतर दोन्ही पक्षांतर्गत चुरस राहिली. गेल्यावेळी अध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित होते. येथे महाडिक परिवाराने यामध्ये लक्ष घातले आणि अखेरच्या क्षणी शौमिका महाडिक या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या निमित्ताने भाजपकडे प्रथम अध्यक्षपद आले.आता त्यांचा शिरोली मतदारसंघ सर्वसाधारण वा महिलासाठी आरक्षित राहिलेला नाही. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज मतदार संघात वा आमदार अमल महाडिक यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील सोयीचा मतदार त्यांच्यासाठी सोयीचा राहू शकतो. मात्र आता त्यांनी गोकुळ दूध संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा निवडणुकीत उतरणार का हा प्रश्न उरतो.

 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांच्या पत्नी रोहिणी आबिटकर यांना त्यांचा मतदार संघ अनुकूल झाला आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद मिळवण्याच्या आबिटकरांचा प्रयत्न राहील. आवाडे घराण्यातील राहुल आवाडे यांच्या रूपाने तिसऱ्यांदा आमदारकी आली आहे. गेल्यावेळी ते रेंदाळ या जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले होते. हा मतदारसंघ खुला झाला असून तेथे त्यांच्या पत्नी मौशमी आवाडे यांना इष्ट ठरू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मुश्रीफ, कोरेंचे प्रयत्न

 शैलजा सतीश पाटील, शितल मनोज फराकटे यांना निवडून आणून अध्यक्षपद अजित पवार राष्ट्रवादीकडे घेण्याचा सक्षम पर्याय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आहे. तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे, आमदार अशोक माने यांनीही काही जागा हेरून अध्यक्षपदावर लक्ष केंद्रित केले आहे.

सतेज पाटील सक्रिय

 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी काँग्रेसला अनुकूल असलेल्या मतदारसंघातून अधिकाधिक महिला सदस्य निवडून आणण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. पक्षाचे माजी आमदार बजरंग देसाई यांच्या सून रेश्मा राहुल देसाई यांना सोयीस्कर मतदारसंघ निर्माण झाला आहे. याशिवाय शिरोळमधून गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून काही जागांना काँग्रेसने विशेष महत्त्व दिले आहे.ही परिस्थिती पाहता जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या त ग्रामीण राजकारणाचा फड सुरशेरे रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

आमदार ठरवणार अध्यक्षपद

 जिल्ह्यात महायुतीचे सर्व दहा आमदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे पालकमंत्र्यांसह शिवसेनेकडे तीन आमदार आहेत. पाठिंबा दिलेल्या आमदारासह भाजपकडे तिघेजण विधानसभा सदस्य आहेत. जनसुराज्य शक्ती कडे दोन, राष्ट्रवादीचे एक असे आमदार संख्याबळ आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे आमदार किती सदस्य निवडून आणतात यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार याची समीकरण आकाराला येऊ शकते.