वृत्तसंस्था, पर्थ
रोहित शर्मा आणि विराट कोहली या माजी कर्णधारांचे बहुचर्चित आंतरराष्ट्रीय पुनरागमन अपयशी ठरले. हे दोघे मिळून केवळ २२ चेंडूच खेळपट्टीवर टिकू शकले. त्यातच अन्य फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केल्यामुळे पावसाच्या व्यत्ययात संपन्न झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार सात गडी राखून सरशी साधताना तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ शहर उष्ण हवामानासाठी ओळखले जाते. मात्र, रविवारी याच शहरात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने सातत्याने व्यत्यय आणला. चार वेळा खेळ थांबवावा लागला. यात बराच वेळ वाया गेल्याने अखेर सामना २६-२६ षटकांचा करण्यात आला. यात भारताने प्रथम ९ बाद १३६ अशी धावसंख्या उभारली. पंचांनी षटके कमी करण्यापूर्वीच भारताने चार गडी गमावले होते. त्यामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर १३१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. कर्णधार मिचेल मार्श (५२ चेंडूंत नाबाद ४६) आणि जोश फिलिपे (२९ चेंडूंत ३७) यांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांतच हे आव्हान पार करताना मालिकेची विजयी सुरुवात केली.
त्याआधी, ऑप्टस स्टेडियमची अतिरिक्त उसळी असणारी खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण याचा विचार करून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्शने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सर्वाच्या नजरा रोहित आणि विराट या तारांकितांच्या पुनरागमनाकडे होत्या. हे दोघेही पाच महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळत होते. भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित मैदानात उतरताच स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. बऱ्याच महिन्यांनी स्पर्धात्मक सामना खेळत असल्याने रोहित सुरुवातीला चाचपडताना दिसला. विशेषत: जोश हेझलवूडने आखूड टप्प्यावर चेंडू टाकत रोहितची कसोटी पाहिली. रोहितने एक चौकार लगावला, पण चाहत्यांचा आनंद तेवढय़ापुरताच मर्यादित राहिला. हेझलवूडच्या एका उसळलेल्या चेंडूने रोहितच्या बॅटची कड घेतली आणि दुसऱ्या स्लीपवर उभ्या मॅथ्यू रेनशॉने त्याचा झेल टिपला. रोहितला १४ चेंडू खेळून केवळ ८ धावा करता आल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोहलीलाही लय सापडली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याला एका जागीच जखडून ठेवले. कोहलीने बॅटही बदलून पाहिली, पण त्याला धाव करता आलीच नाही. अखेर उजव्या यष्टीबाहेरील चेंडूशी छेडछाड करताना तो स्टार्कच्या गोलंदाजीवरच बाद झाला. आठ चेंडू खेळून कोहलीला खातेही उघडता आले नाही. ‘पॉइंट’वर उभ्या कूपर कॉनलीने सूर मारून त्याचा अप्रतिम झेल पकडला. नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल (१०) आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर (११) डाव्या यष्टीवरील चेंडू मागील दिशेला मारताना बाद झाले. नेथन एलिसच्या गोलंदाजीवर गिलचा, तर हेझलवूडच्या गोलंदाजीवर श्रेयसचा झेल यष्टिरक्षक जोश इंग्लिसनेच टिपला. भारताच्या डावात चौथ्यांदा पावसाने व्यत्यय आणल्यानंतर पंचांनी सामना २६-२६ षटकांचा करण्याचे ठरवले. भारताची त्यावेळी १६.४ षटकांत बाद ५२ अशी स्थिती होती.
त्यानंतर केएल राहुल (३१ चेंडूंत ३८), अक्षर पटेल (३८ चेंडूंत ३१) आणि पदार्पणवीर नितीश कुमार रेड्डी (११ चेंडूंत नाबाद १९) यांनी आक्रमक शैलीत खेळताना भारताला ९ बाद १३६ धावांपर्यंत पोहोचवले.
सुधारित १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड (८) आणि मॅथ्यू शॉर्ट (८) यांना झटपट गमावले. अर्शदीप सिंगने हेड, तर अक्षरने शॉर्टला बाद करत भारताच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, मार्श आणि फिलिपे यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ५५ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेले. मग मार्शने रेनशॉच्या (२४ चेंडूंत नाबाद २१) साथीने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २६ षटकांत ९ बाद १३६ (केएल राहुल ३८, अक्षर पटेल ३१; जोश हेझलवूड २/२०, मिचेल ओव्हेन २/२०, मॅथ्यू कुनमन २/२६) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : २१.१ षटकांत ३ बाद १३१ (मिचेल मार्श नाबाद ४६, जोश फिलिपे ३७; वॉशिंग्टन सुंदर १/१४, अक्षर पटेल १/१९)
सामनावीर : मिचेल मार्श
५आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा हा ५००वा सामना होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला. याआधी सचिन तेंडुलकर (६६४), विराट कोहली (५५१), महेंद्रसिंह धोनी (५३५) आणि राहुल द्रविड (५०४) यांनी अशी कामगिरी केली आहे.
१ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय सामन्यात कोहली प्रथमच खातेही न उघडता बाद झाला. याआधी ऑस्ट्रेलियात खेळलेल्या २९ एकदिवसीय डावांत त्याने पाच शतके आणि सहा अर्धशतकांसह १३२७ धावा केल्या होत्या.
१८ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे अव्वल तीन फलंदाज १८ धावांतच तंबूत परतले. २०१९ सालच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर भारताचे अव्वल तीन फलंदाज इतक्या कमी धावांत गारद होण्याची ही पहिली वेळ ठरली. त्यावेळी भारताने पहिले तीन फलंदाज तीन धावांत गमावले होते.
‘पॉवर-प्ले’मध्ये तीन फलंदाज गमावल्यानंतर पुनरागमन करणे अवघड जाते. आम्हाला या सामन्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. केवळ १३१ धावा वाचवतानाही आम्ही ऑस्ट्रेलियाला झुंज दिली ही आमच्यासाठी सकारात्मक बाब होती. – शुभमन गिल, भारताचा कर्णधार.