IND vs ZIM ODI Series: १८ ऑगस्टपासून (गुरुवार) भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवले जाणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. ही तीन सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आशिया चषकासाठी रवाना होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झिम्बाब्वेमध्ये भारताने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकूण ४४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४३ सामने भारताने जिंकले आहेत तर, एक सामना अनिर्णित राहिला आहे. या आकडेवारीनुसार भारतीय संघाच्या तुलनेत झिम्बाब्वेचा संघ कमजोर मानला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यजमान संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

झिम्बाब्वेच्या संघाने २०१६ नंतर प्रथमच टी २० विश्वचषकात स्थान मिळवले आहे. त्यानंतर या संघाने बांगलादेशचा टी २० मालिकेत २-१ आणि एकदिवसीय मालिकेत २-१ अशा फरकाने पराभव केला आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत रायन बर्ल आणि सिंकदर रझा फॉर्ममध्ये आले. रझाने यावर्षी खेळलेल्या नऊ एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

दुसरीकडे, भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात दणदणीत यश मिळवले आहे. तर, दुखापतीतून सावरलेला कर्णधार केएल राहुल अनेक महिन्यांच्या अंतरानंतर पुनरागमन करत आहे. आगामी आशिया चषकाचा विचार करता या मालिकेतील प्रत्येक सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा – “मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना

‘अशी’ असेल खेळपट्टी

हरारे स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टीवर हाय-स्कोअरिंग सामने झालेले आहेत. झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील पहिल्या सामन्यासाठीही तेच अपेक्षित आहे. गोलंदाजांना आपल्या गतीमध्ये वारंवार बदल करून डावाच्या सुरुवातीलाच बळी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्याची जास्त शक्यता आहे.

झिम्बाब्वे संभाव्य संघ: तादिवानाशे मारुमणी, रायन बर्ल, इनोसंट काईया, वेस्ली मॅधवेर, सिकंदर रझा, रेगिस चकाब्वा (कर्णधार आणि यष्टीरक्षक), टोनी मुन्योंगा, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्याउची, तनाका चिवांगा.

भारत संभाव्य संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs zimbabwe 1st odi know the possible playing 11 and pitch report vkk