Sanju Samson CSK Ravindra Jadeja RR IPL 2026: आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याची अंतिम तारीख ही १५ नोव्हेंबर देण्यात आली आहे. यापूर्वी ट्रेड विंडोचा पर्याय खुला असून संघांमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण होऊ शकते. यादरम्यानच एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये मोठा ऐतिहासिक ट्रेड होण्याची चर्चा आहे. या संघांतील दोन दिग्गज खेळाडूंमध्ये ट्रेड होणार आहे.

चेन्नई व राजस्थान या संघांमध्ये रवींद्र जडेजा संजू सॅमसन या खेळाडूंमध्ये ट्रेड होणार आहे. पण चेन्नई सुपर किंग्स संघ संजू सॅमसनच्या बदल्यात दोन खेळाडू देणार आहे. संजू सॅमसन हा ट्रेडच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या बदल्यात सीएसकेचा रवींद्र जडेजा आणि सॅम करन किंवा मथीशा पथिराना यांची देवाणघेवाण करू शकते. अर्थात, दोन आयपीएल फ्रँचायझींमधील हा सर्वात मोठा ट्रेड करार होऊ शकतो, पण अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

द इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, या करारावर अद्याप स्वाक्षरी झालेली नसली तरी चर्चेचा अंतिम टप्पा सुरू आहे. जडेजाबरोबर दुसरा कोणता खेळाडू राजस्थानकडे जाणार हे निश्चित झाल्यानंतर, १५ नोव्हेंबरच्या रिटेन्शन डेडलाइनपूर्वी हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मागील आयपीएल हंगाम संपल्यानंतरपासूनच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, अशा चर्चा जोर धरून आहेत. अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट सुरु असताना सॅमसनने चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाशीही चर्चा केली होती. ४४ वर्षांच्या एम.एस. धोनीच्या उत्तराधिकारी म्हणून त्याला संघात सामील करण्याची संघाची इच्छा आहे. आता सॅमसनच्या चेन्नईत येण्याच्या हालचाली आणि रिटेन्शनची अंतिम तारीख जवळ येत असल्याने, माजी भारतीय कर्णधार धोनी पुढे काय निर्णय घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितलं होतं की, “आम्हाला अजूनही आशा आहे की धोनी पुढील हंगामात खेळेल.” पण, सॅमसन संघात आल्यास मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

द इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, चर्चा पुढे नेण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या वरिष्ठ मंडळींनी एम.एस. धोनी, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सविस्तर बैठक घेतली. धोनी स्वतः रवींद्र जडेजाशी संवाद साधण्यात त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी सहभागी झाला होता आणि जडेजानेही राजस्थानकडे जाण्यासाठी तयारी दर्शवल्यानंतरच चर्चेचं पुढील पाऊल उचलण्यात आलं, अशी माहिती मिळाली.

संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही मागील वर्षी त्यांच्या संबंधित संघांनी १८ कोटी रकमेवर रिटेन केलं होतं. मात्र, राजस्थान रॉयल्सने करारात आणखी एक खेळाडू समाविष्ट करण्याची मागणी केली असल्याचं कळतं. या संदर्भात शिवम दुबेचं नाव चर्चेत आलं होतं, पण चेन्नईने ती मागणी नाकारली. त्यानंतर सॅम करनचा पर्याय मांडण्यात आला आणि मथीशा पथिरानाच्या तुलनेत करनचं नाव पुढे नेण्यात आलं.