Chennai Super Kings vs Gujarat Titans Live, IPL 2023 Final Updates: आयपीएल २०२३च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह चेन्नईने सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. दोन्ही संघांनी पाच वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना चेन्नईचा संघ केवळ चार चेंडू खेळला. यानंतर मुसळधार पाऊस आला आणि सामना सुरू झाला तेव्हा चेन्नईसमोर १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य होते. चेन्नई संघाने शेवटच्या चेंडूवर पाच गडी गमावून लक्ष्य गाठले आणि पाचवा करंडक जिंकला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. ऋद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. शुबमनला सातव्या षटकात महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. त्याला २० चेंडूत ३९ धावा करता आल्या. यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. यानंतर ऋद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दीपक चाहरने धोनीच्या हाती झेलबाद केले. साहा ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावा करून बाद झाला.

यानंतर सुदर्शन आणि कर्णधार हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. सुदर्शनने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. आयपीएल २०२३ मधील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सुदर्शनचे शतक हुकले. २०व्या षटकात मथिशा पाथिरानाने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर राशिदला पाथिरानाने ऋतुराज गायकवाडला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. हार्दिकने १२ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. चेन्नईकडून पाथिरानाने २ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी दीपक चाहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तुषार देशपांडे चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकात ५६ धावा लुटल्या.

गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. यापूर्वी आयपीएल फायनलमध्ये २०० धावांचा पाठलाग फक्त एकदाच झाला होता. २०१४ साली कोलकाताने फायनलमध्ये पंजाबसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग कधीच केला गेला नाही. गुजरातकडून साई सुदर्शनने तुफानी खेळी केली. त्याचे शतक जरी हुकले असले तरी त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईला अंतिम सामन्यात अडचणीत आणले आहे. त्याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावा चोपल्या.

Live Updates

Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL Final Highlights Score Updates: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ फायनल हायलाइट्स मॅच अपडेट्स

18:08 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: कालच्या पावसानंतर कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी अनुकूल दिसत असली तरी त्यामुळे नवीन गोलंदाजांना काही प्रमाणात मदत झाली आहे. आयपीएलमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६८ आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १५५ आहे. दुसरीकडे, २०२३ मध्ये प्रथम फलंदाजी करताना सरासरी स्कोअर १८७ आहे. २०२३च्या मोसमात खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये बचाव आणि पाठलाग करणाऱ्या संघांनी प्रत्येकी तीन वेळा विजय मिळवला आहे.

18:03 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: हार्दिक २०१५ पासून एकही फायनल हरलेला नाही

गुजरातचा कर्णधार हार्दिक २०१५च्या IPL नंतर एकही फायनल हरलेला नाही. यादरम्यान त्याने पाच फायनल खेळल्या आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. २०१५, २०१७, २०१९आणि २०२० मध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये असताना अंतिम सामना खेळला आणि त्याचा संघ चॅम्पियन बनला. त्याच वेळी, २०२२ मध्ये गुजरातचा कर्णधार असताना हार्दिकने विजय मिळवला होता.

18:00 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: आकडेवारीनुसार चेन्नई आणि धोनी मध्ये कोण आहे सरस?

चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण चार सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने तीन आणि चेन्नईने केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्या मोसमात या दोघांमध्ये दोन सामने झाले, त्या दोन्हीमध्ये गुजरात संघाने बाजी मारली. त्याचबरोबर या मोसमात दोन सामने खेळले गेले. मोसमातील सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात हार्दिकच्या संघाने विजय मिळवला होता. त्याचवेळी क्वालिफायर-१ मध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

17:55 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: जर पाऊस थांबला नाही तर आज सुपर-ओव्हर सामन्याचा निकाल ठरू शकतो

पहिल्या दिवशी सुपर ओव्हरचा नियम नव्हता, पण राखीव दिवशी सुपर ओव्हरचा नियम जोडला जाईल. पाच षटकांचा सामना नसला तरीही, दोन्ही संघ सुपर ओव्हर खेळतील आणि सुपर ओव्हरमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल हे ठरवले जाईल. आज, पाच षटकांच्या सामन्याव्यतिरिक्त, सुपर ओव्हरसाठी देखील कट ऑफ वेळ असेल. आजही पावसामुळे सामना खेळला गेला नाही, तर साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वल असणारा संघ विजेता मानला जाईल. साखळी फेरीअखेर गुजरात २० गुणांसह अव्वल, तर चेन्नई १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. पावसामुळे सामना अजिबात झाला नाही तर गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन होईल.

17:52 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: येत्या काही तासांत अहमदाबादमध्ये पाऊस पडू शकतो

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर अहमदाबादमध्ये आकाश ढगाळ आहे. स्थानिक अहवालानुसार पुढील काही तासांत पाऊस पडू शकतो. साखळी फेरी आणि प्लेऑफसह, अंतिम फेरीपूर्वीचा एकच सामना पावसामुळे रद्द झाला. तो सामना चेन्नई आणि लखनऊ यांच्यात एकाना स्टेडियमवर होणार होता.

17:51 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: नियोजित वेळेवर सामना सुरू होऊ शकतो

पावसाने व्यत्यय आणलेल्या आयपीएल २०२३चा विजेतेपदाचा सामना आता राखीव दिवसात पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपदाचा सामना राखीव दिवसापर्यंत पोहोचला आहे. याआधी सर्व फायनलचे निकाल निर्धारित दिवशी २०-२० षटकांच्या पूर्ण सामन्यानंतर आले. वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, सामना त्याच्या नियोजित वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७.०० वाजता होईल.

17:38 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: पावसाच्या छायेत आयपीएल फायनल राखीव दिवशी होणार का?

आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, २८मे चा दिवस पावसाने वाहून गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला जात आहे. रविवारी पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसाच्या सावलीत आजही सामना होऊ शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

17:36 (IST) 29 May 2023
CSK vs GT IPL 2023 Final: चेन्नई आणि गुजरात यांच्यातील कालचा सामना पावसामुळे आज होणार आहे

रविवारी पावसामुळे नाणेफेक न होताच सामना दुसऱ्या दिवशी आज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सोमवारी दुपारपर्यंत अहमदाबाद मध्ये स्वच्छ व निरभ्र वातावरण राहील. सायंकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण होऊन सहा वाजण्याच्या सुमारास काही सरी बरसू शकतात. मात्र, त्याचा जोर अधिक नसेल. या पार्श्वभूमीवर सामना काहीसा उशिराने सुरू होईल, मात्र पूर्ण षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. सायंकाळी आठ-नऊ वाजण्याच्या सुमारासही वातावरण ढगाळच राहील. अशात पुन्हा पाऊस सुरू झाल्यास खेळाडू व प्रेक्षकांचा पुन्हा हिरमोड होऊ शकतो.

Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL Final Highlights Score Updates: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ फायनल हायलाइट्स मॅच अपडेट्स

चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा ५ विकेट्स राखून पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत १० धावांची गरज होती आणि रवींद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला चॅम्पियन बनवले.