IPL 2025 Playoffs Scenario: आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. भारत – पाकिस्तान यांच्यातील संघर्षमय वातावरणामुळे ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेतील अवघे काही सामने शिल्लक आहेत. ४ संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ अजूनही ठरलेले नाहीत. दरम्यान आजचा दिवस प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
आज आयपीएल २०२५ स्पर्धेत डबल हेडरचा थरार रंगणार आहे. हे दोन्ही सामने प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ पंजाब किंग्जचा सामना करणार आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. जर पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्लीचा पराभव केला, तर गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ एकाच दिवशी प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.
पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सने बाजी मारली तर कसं असेल समीकरण?
यासह जर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघाने बाजी मारली तर ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. याउलट पंजाब आणि दिल्लीने बाजी मारली, तर प्ले ऑफमध्ये जाण्याचं समीकरण आणखी गुंतागुंतीचं होईल. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणारे संघ कोणते असतील हे जाणून घेण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल.
आज रंगणार डबल हेडरचा थरार
आयपीएल पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना जयपूरमध्ये रंगणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दिल्लीत रंगणार आहे.
मुंबई- दिल्लीचं टेन्शन वाढणार
आज होणाऱ्या सामन्यांनंतर जर ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले, तर २ संघांना मोठा धक्का बसू शकतो. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना देखील प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. तर गुजरात, आरसीबी आणि पंजाबचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. तर चौथ्या स्थानी जाण्यासाठी मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.