Boucher Pollard Argued With Umpire : रविवारी आयपीएल २०२४ मधील २९वा सामन्यात वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या हंगामात आतापर्यंत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मुंबई संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने या हंगामात ६ सामन्यांपैकी केवळ २ विजय नोंदवले आहेत. या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिड पंचाशी वाद घालताना दिसले.

लाइव्ह मॅचमध्ये झाला मोठा वाद –

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यादरम्यान झालेल्या वादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. लाइव्ह सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक मार्क बाउचर, फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड आणि क्रिकेटर टीम डेव्हिड यांनी चौथ्या पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाने अचानक प्रेक्षकांचे लक्ष वेधले. वास्तविक, हा संपूर्ण वाद टाइम आऊटवरुन झाला. मुंबई इंडियन्स संघाला त्यांच्या फलंदाजीदरम्यान १५व्या षटकानंतर टाइम आऊट घ्यायचा होता, परंतु चौथ्या पंचांनी त्यावेळी त्यांना तो घेऊ दिला नाही.

वादाचे खरे कारण आले समोर –

१५ व्या षटकानंतर, मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक मार्क बाउचर, फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड आणि क्रिकेटर टीम डेव्हिड मैदानात जाऊ लागले, परंतु चौथ्या पंचांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. संवादाच्या कमतरतेमुळे चौथ्या पंचांनी टाईम आऊटचे संकेत दिले नाहीत, असे क्रिकेटपटू टीम डेव्हिडनेही सूचित केले होते. चौथ्या पंचांनी बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिड यांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांना लगेच मैदानातून बाहेर जाण्यास सांगितले. या वेळी बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिड यांनी चौथ्या पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. शेवटी या तिघांनाही मैदानातून बाहेर जावे लागले.

हेही वाचा – MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

चेन्नईचा मुंबईवर २० धावांनी दणदणीत विजय –

कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांनंतर चेन्नईने मथीशा पाथिरानाच्या तुफानी गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळी देखील चेन्नईला विजयापासून रोखू शकली नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मथीशा पाथिराना (२८ धावांत ४ विकेट) याच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्स संघ ६ बाद १८६ धावाच करू शकला. रोहित शर्माने ६३ चेंडूत १०५ धावांची नाबाद खेळी केली. रोहित शर्माने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ११ चौकार मारले.