Neeta Ambani Reaction on Shreyas Iyer Hitting: पंजाब किंग्सचा संघ ११ वर्षांच्या प्रयत्नांनंतर आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनल गाठली. श्रेयस अय्यरने या सामन्यात उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. श्रेयस अय्यरने या सामन्यात षटकारांची हॅटट्रिक लगावली. यादरम्यान मुंबईची मालकिण नीता अंबानी यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०३ धावा केल्या. जॉनी बेयरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्या महत्त्वपूर्ण खेळींच्या जोरावर ही धावसंख्या उभारली. आतापर्यंत १८ वर्षांच्या इतिहासात कोणताच संघ मुंबई इंडियन्ससमोर २०० अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठले नव्हते. पण पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने हे करून दाखवलं.

पंजाब किंग्स संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही आणि संघाचे सलामीवीर पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. जोश इंग्लिस आणि नेहाल वधेराच्या मदतीने श्रेयस अय्यरने २०४ धावांचं लक्ष्य एक षटक बाकी ठेवत गाठलं. श्रेयसने या सामन्यात ४१ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली.

श्रेयसने यापूर्वी १३व्या षटकात आपल्या षटकारांच्या आतिषबाजीने सर्वांनाच चकित केलं. अश्वनी कुमार आणि बुमराहने ११-१२ ही दोन सलग षटकं कमालीची टाकत पंजाबवर दबाव आणला यानंतर मुंबईच्या कोच आणि कर्णधाराने रीस टोप्लेला गोलंदाजी दिली. या षटकात श्रेयसने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर सलग ३ षटकार लगावत दबाव पुन्हा मुंबई इंडियन्सवर टाकला आणि इथून सामना फिरला.

श्रेयसची षटकारांची हॅटट्रिक पाहून मुंबई इंडियन्सची मालकिण नीता अंबानी यांनी तर डोक्याला हात लावून आपला चेहरा लपवत सीटवर मागे होऊन बसल्या. नीता अंबानींची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे पंजाबची मालकिण प्रीती झिंटा स्टेडियममध्ये नाचताना दिसली. या दोघींच्या प्रतिक्रियांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

दुसऱ्या क्वालिफारमधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर पंजाब किंग्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.