Punjab Kings vs Mumbai Indians, IPL 2025: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला टॉप २ मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. टॉप ४ मध्ये असलेले ३ संघ पराभूत झाल्यानंतर, मुंबई इंडियन्सकडे गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, मुंबई इंडियन्सने पंजाबविरूद्ध झालेला महत्वाचा सामना गमावला आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर १८४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबने एकतर्फी विजयाची नोंद केली. हा सामना पंजाबने ७ गडी राखून जिंकत, गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. काय आहेत मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवाची प्रमुख कारणं? जाणून घ्या.

फलंदाजांची फ्लॉप कामगिरी

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. मुंबईकडे मोठी धावसंख्या उभारून पंजाबवर दबाव आणण्याची संधी होती. मुंबईला रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने ४५ धावांची भागीदारी करून दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला.

सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचं तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन झालं. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. सूर्याने ५७ धावांची खेळी केली. तो शेवटपर्यंत उभा राहिला. मात्र, इतर फलंदाजांकडून त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. तिलक वर्मा १, हार्दिक पांड्या २६, विल जॅक्स १७ धावांवर माघारी परतले. त्यामुळे २०० धावांचा पल्ला गाठण्याची संधी असलेल्या मुंबई इंडियन्सला १८४ धावा करता आल्या. जर मुंबईने २० धावा आणखी केल्या असत्या, तर या सामन्यावर मुंबईची पकड आणखी मजबूत झाली असती.

गोलंदाजांचा फ्लॉप शो आणि हार्दिकने घेतलेला निर्णय

मुंबई इंडियन्स संघाला १८५ धावांचा बचाव करायचा होता. हा सामना शेवटपर्यंत गेला, तर मुंबईचा पराभव निश्चित होता. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी विकेट्स घेण्यावर अधिक भर दिला. पहिले षटक बोल्टने टाकल्यानंतर, दुसरे षटक दीपक चाहरने निर्धाव टाकले. त्यानंतर चौथे षटक टाकण्यासाठी हार्दिकने दीपक चाहरला गोलंदाजीसाठी बोलावलं. या षटकात त्याने १६ धावा खर्च केल्या. दीपक चाहर पूर्णपणे फिट दिसत नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा ६ वे षटक टाकण्याची जबाबदारी हार्दिकने दीपक चाहरकडे सोपवली. या षटकात त्याने १२ धावा खर्च केल्या.

चाहरने या २ षटकात २८ धावा खर्च केल्या. जर तो पूर्णपणे फिट नव्हता, तर हार्दिक त्याच्या जागी अश्वनी कुमारला गोलंदाजीसाठी बोलवू शकला असता, पण असं झालं नाही. त्यामुळे मुंबईचा संघ मागे पडला. मुंबईचे गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा एकतर्फी पराभव झाला.