PBKS vs MI Qualifier 2 Suryakumar Yadav : आयपीएल २०२५ मध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य दाखवले आहे. सूर्यकुमार यादव हा रविवारी (१ जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा एकदा दमदार खेळी केली आणि यासह तो एका आयपीएल हंगामात ७०० धावा करणारा पहिला नॉन-ओपनर फलंदाज बनला आहे.
आयपीएल २०२५ हंगामामध्ये ७०० धावा पूर्ण करण्यासाठी सूर्याला २७ धावांची आवश्यकता होती आणि त्याने एमआयच्या डावाच्या १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कायल जेमिसनला चौकार मारून हे लक्ष्य गाठले.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या नॉन-ओपनर्सच्या यादीमध्ये सूर्याच्या नंतर एबी डिव्हेलियर्स आणि ऋषभ पंत यांचा क्रमांक आहे. डिव्हिलीयर्सने २०१६ च्या हंगामात आरसीबीकडून खेळताना ६८७ धावा केल्या होत्या तर पंतने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ६८४ धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या एका हंगामात नॉन-ओपनरने केलेल्या सर्वाधिक धावा
- ७१७ – सूर्यकुमार यादव (२०२५)
- ६८७ – एबी डिव्हिलियर्स (२०१६)
- ६८४ – ऋषभ पंत (२०१८)
- ६२२ – केन विल्यमसन (२०१८)
- ६०५ – सूर्यकुमार यादव (२०२३)
सूर्याने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात २६ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने चार चौकार आणि तीन षटकार देखील लगावले. मात्र १४व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर युजवेंद्र चहलने याने त्याला बाद केले. सूर्याने चहलला षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण नेहल वधेराने त्याचा सीमारेषेजवळ कॅच घेतला. पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना सूर्याने तिलक वर्मा (२९ चेंडूत ४४ धावा) बरोबर मिळून तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात ७०० धावा करणारा सूर्या हा पहिलाच फलंदाज आहे.
मुंबई इंडियन्सकडून एका IPL हंगामात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- ७१७ – सूर्यकुमार यादव (२०२५)
- ६१८ – सचिन तेंडुलकर (२०१०)
- ६०५ – सूर्यकुमार यादव (२०२३)
- ५५३ – सचिन तेंडुलकर (२०११)
- ५४० – लेंडल सिमन्स (२०१५)
- ५३८ – रोहित शर्मा (२०१३)
- ५२९ – क्विंटन डी कॉक (२०१९)
- ५१६ – इशान किशन (२०२०)
- ५१४ – सनथ जयसूर्या (२०१४)
- ५१२ – सूर्यकुमार यादव (२०१८)
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत खेळलेल्या सर्व १६ सामन्यांमध्ये किमान २५ धावा केल्या आहेत.