Shubman Gill Statement On ODI Captaincy: भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. बीसीसीआयने भारतीय कर्णधार रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकलं आहे. तर ही जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटसह गिल वनडेतही भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. याआधी झालेल्या २०२३ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान भारताला २०२७ चा वनडे वर्ल्डकप जिंकून देणं हेच लक्ष्य असल्याचं गिलने सांगितलं.
शनिवारी (४ ऑक्टोबर) शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने वेस्टइंडिजचा अडीच दिवसांत पराभव केला. हा सामना झाल्यानंतर बीसीसीआयकडून भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी गिलकडे सोपवण्यात आली. दरम्यान कर्णधार बनताच त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला गिल?
शुबमन गिलने बीसीसीआय मिडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आपल्या देशाचं नेतृत्व करणं, ज्या देशाने खूप काही मिळवलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप अभिमान वाटतोय मला खात्री आहे की, आम्ही चांगली कामगिरी करू.” रोहित शर्माने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी गिलकडे सोपवण्यात आली होती. तसेच शुबमन गिल हा टी -२० संघाचा उपकर्णधार देखील आहे. आता तो वनडे संघाचं नेतृत्व करताना दिसेल.
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला वाटतं वनडे वर्ल्डकप स्पर्धेआधी आम्हाला २० वनडे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. आमचं सर्वात मोठं लक्ष्य वनडे वर्ल्डकप जिंकणं असणार आहे. आमचे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.”
वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार) रोहित शर्मा, विराट कोहली , श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल.