Asia Cup 2025 IND vs OMAN Shubman Gill Cleamn Bowled: भारतीय संघ सुपर फोरपूर्वी ओमािनविरूद्ध गट टप्प्यातील अखेरचा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या फलंदाजांसाठी सुपर फोरपूर्वी हा सरावाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान भारताला सामन्याच्या सुरूवातीलाच गिलच्या रूपात पहिला धक्का बसला.
सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आशिया चषकातील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजीने सुरूवात केली नव्हती. त्यामुळं फलंदाजांना फलंदाजीचा सराव होणं महत्त्वाचं होतं. या सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली असून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाला संधी मिळाली.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा भारताकडून फलंदाजीला उतरले. पहिल्या षटकात गिलने चौकार लगावत भारताला सुरूवात करून दिली. यानंतर दुसऱ्या षटकात शुबमन गिल क्लीन बोल्ड झाला. फैजलच्या चेंडूवर गिल खाली वाकून ड्राईव्ह खेळण्यासाठी गेला पण चेंडू खेळायला चुकला आणि बॅट-पॅडच्या मधून जात ऑफ स्टंपला लागला व त्रिफळाचीत झाला. शुबमन गिल मागेही न पाहता थेट मैदानाबाहेर निघाला. याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
फैजल शाह हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. ज्या लाईन लेंग्थवर त्याने चेंडू टाकला होता आणि चेंडू पडताच सीम बदलून बाहेरच्या दिशेने गेला आणि थेट ऑफ स्टंपवर आदळला. त्यामुळे फैजलसाठी हा एक स्वप्नवत चेंडू होता. शुबमन गिलचा इंग्लंड दौऱ्यावर वादळी फॉर्म होता आणि तोच फॉर्म अद्याप कायम होता. पण फैजलने मात्र त्याला लवकर बाद केलं. ओमानचा संघ नवखा असल्याने फैजल शाहसाठी शुबमन गिलची विकेट मोठी गोष्ट असणार आहे.
ओमानविरूद्ध सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव