Shubman Gill Record: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात वेस्टइंडिज संघाचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाणेफेक गमावताच भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या मोठ्या विक्रमात कपिल देव यांना टाकलं मागे

गिलकडे इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या दौऱ्यावर भारतीय संघाने ५ कसोटी सामने खेळले होते. या पाचही सामन्यांमध्ये शुबमन गिलने नाणेफेक गमावले होते. आता वेस्टइंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही गिलने नाणेफेक गमावलं आहे. यासह गिलच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सलग ६ सामन्यांमध्ये नाणेफेक गमावणारा कर्णधार ठरला आहे. या विक्रमात त्याने कपिल देव यांना मागे टाकलं आहे.

याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सलग ५ सामन्यांमध्ये नाणेफेक गमावलं होतं. १९८३ मध्ये कपिल देव यांनी कर्णधार म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यावेळी सलग ५ सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक गमावलं होतं. गिलने आता हा विक्रम मोडून काढला आहे. यासह त्याने टॉम लेथमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. लेथमने देखील सलग ६ सामन्यांमध्ये नाणेफेक गमावलं होतं.

जर पुढील २ सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक गमावलं तर त्याच्या नावे सर्वात मोठा लाजिरवाणा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. सर्वाधिक ८ वेळेस नाणेफेक गमावण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या बेवन काँगडनच्या नावावर आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज</p>

वेस्टइंडिज- तेजनारायण चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, अलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, जोहान लेन, जेडेन सील्स