सूर्यकुमार यादव सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही काळापासून त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना खूप प्रभावित केले आहे. त्याने भारतासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत. सूर्यकुमार यादव टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आले की, तुम्ही खेळलेली तुमची सर्वात आवडती खेळी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने आपल्या दोन शानदार खेळी सांगितल्या.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मुलाखतीत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ”मला वाटते की मी पदार्पण करताना अर्धशतक झळकावले होते. तो सामना आम्ही जिंकला होता. माझ्यासाठी ती सर्वोत्तम खेळी होती.” सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतासाठी पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले होते.
याशिवाय त्याने आयपीएलमध्ये खेळलेली एक खेळी या यादीत ठेवली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने आयपीएल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. तो म्हणाला, “२०१९ च्या क्वालिफायरचा पहिला सामना सीएसके आणि एमआय यांच्यात होता. १३०-१३५ या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होते. त्या सामन्यात मी नाबाद ७१ धावा केल्या होत्या आणि आम्ही सामना जिंकला. मला ती खेळी पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल.”
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला केवळ १३१ धावा करता आल्या होत्या. पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने लवकर ३ विकेट्स गमावल्या होत्या. ज्यामध्ये रोहित शर्मा (४), क्विंटन डी कॉक (८), इशान किशन (०) या फलंदाजांचा समावेश होता. पण त्यानंतर सूर्यकुमारने संघाच्या डावाची सूत्रं आपल्या हाती घेतली. तसेच शेवटपर्यंत खेळपट्टी उभे राहून संघाला विजय मिळवून दिला होता.