वृत्तसंस्था, डॅलास
क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. मुंबईतील मैदानांवर क्रिकेटचे धडे गिरवलेल्या सौरभ नेत्रावळकरच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अमेरिकेने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवताना माजी विजेत्या पाकिस्तानला ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभूत केले. सह-यजमान असलेल्या अमेरिकेच्या संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी ‘सुपर एट’ म्हणजेच अव्वल आठ संघांची फेरी गाठण्यासाठी दावेदारी भक्कम केली.
एकीकडे गतउपविजेता पाकिस्तानचा संघ, दुसरीकडे क्रिकेट विश्वचषकात प्रथमच खेळणारा अमेरिकेचा संघ. या दोन संघांमध्ये साहजिकच पाकिस्तानचे पारडे जड मानले जात होते. पाकिस्तानचा संघ हा सामना सहजपणे जिंकून भारताविरुद्धच्या सामन्यासाठीची आपली सज्जता सिद्ध करेल अशीच सर्वांना अपेक्षा होती. मात्र, अमेरिकेच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत पाकिस्तानपेक्षा सरस कामगिरी करताना ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विश्वचषक स्पर्धांमध्ये तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघाकडून पराभूत होण्याची पाकिस्तानची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानला २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात आयर्लंड, तर २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेकडून पराभवाचा धक्का बसला होता.
अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार होण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. डॅलास येथे झालेल्या या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फिरकीपटू नोस्तुश केन्जिगे (३/३०) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज नेत्रावळकर (२/१८) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १५९ धावांवर रोखले. कर्णधार बाबर आझम (४३ चेंडूंत ४४), शादाब खान (२५ चेंडूंत ४०) आणि शाहीन शाह आफ्रिदी (१६ चेंडूंत नाबाद २३) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.
प्रत्युत्तरात अमेरिकेनेही २० षटकांत ३ बाद १५९ धावाच केल्या. अमेरिकेकडून कर्णधार मोनांक पटेल (३८ चेंडूंत ५०), आरोन जोन्स (२६ चेंडूंत नाबाद ३६) आणि आंद्रिस गौस (२६ चेंडूंत ३५) यांनी चांगली फलंदाजी केली. अमेरिकेला अखेरच्या काही षटकांत धावांचा वेग राखता न आल्याचा फटका बसला. जोन्स आणि नितीश कुमार (१४ चेंडूंत नाबाद १४) यांना मिळून १७व्या सहा, १८व्या षटकात सात, १९व्या षटकात सहा धावाच करता आल्या. त्यामुळे अमेरिकेला विजयासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची आवश्यकता होती. हॅरिस रौफने टाकलेल्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर केवळ तीन धावा निघाल्या. मात्र, चौथ्या चेंडूवर जोन्सने षटकार, तर अखेरच्या चेंडूवर नितीशने चौकार मारत अमेरिकेला बरोबरी करून दिली.
यानंतर झालेल्या ‘सुपर ओव्हर’मध्ये मोहम्मद आमीरचा स्वैर मारा आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला. अमेरिकेने १८ धावा केल्या, ज्यापैकी आठ धावा अतिरिक्त होत्या. त्यानंतर नेत्रावळकरने दडपणाखाली आपला खेळ उंचावला. त्याने इफ्तिखार अहमदला बाद करताना पाकिस्तानला केवळ १३ धावा करू दिल्या.
आम्हाला सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये जाऊ द्यायचा नव्हता. निर्धारित षटकांतच जिंकू असे आम्हाला वाटले होते. त्यानंतरही प्रेक्षकांमधून पाकिस्तानला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आमच्या पथ्यावर पडला. यामुळे सर्व दडपण पाकिस्तानवर आले. या एका षटकात १८ धावा केल्यामुळे आमची बाजू भक्कम झाली. पूर्ण सामन्यात गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. – मोनांक पटेल, अमेरिकेचा कर्णधार
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : २० षटकांत ७ बाद १५९ (बाबर आझम ४४, शादाब खान ४०, शाहीन शाह आफ्रिदी नाबाद २३; नोस्तुश केन्जिगे ३/३०, सौरभ नेत्रावळकर २/१८) पराभूत वि. अमेरिका : २० षटकांत ३ बाद १५९ (मोनांक पटेल ५०, आरोन जोन्स नाबाद ३६, आंद्रिस गौस ३५; मोहम्मद आमीर १/२५, नसीम शाह १/२६, हॅरिस रौफ १/३७)
रौफवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप अमेरिकेचा गोलंदाज रस्टी थेरॉनने केला आहे. थेरॉनला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालेलेला नाही. रौफने चेंडूला नखे मारली, त्यामुळे केवळ दोन षटके टाकून झालेला चेंडूही ‘रिव्हर्स स्विंग’ होत होता, असा आरोप थेरॉनने केला. याकडे दुर्लक्ष केल्याने थेरॉनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरही (आयसीसी) टीका केली.
● सुपर ओव्हर : अमेरिका १ बाद १८ वि. पाकिस्तान १ बाद १३.