धरमशाला : अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक यंदा आपले अखेरचे ‘आयपीएल’ खेळणार आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामानंतर तो ‘आयपीएल’ला अलविदा करणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय निवृत्तीबाबतही कार्तिक लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळणाऱ्या कार्तिकने २००८ पासून ‘आयपीएल’च्या सर्व १६ हंगामांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
‘‘यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम ३८ वर्षीय कार्तिकचा अखेरचा असणार आहे. तो ‘आयपीएल’नंतर आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीबाबत निर्णय घेईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्राने सांगितले. ‘आयपीएल’मध्ये कार्तिकने सहा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून ‘आयपीएल’ कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या कार्तिकने २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे (आताचा पंजाब किंग्स) प्रतिनिधित्व केले. पुढे तो मुंबई इंडियन्स, पुन्हा दिल्ली, बंगळूरु, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पुन्हा बंगळूरु संघाकडून खेळला.
