Coconut Oil For Good Cholesterol: अचानक येणारा हृदयविकाराचा झटका ते वारंवार बीपी- कोलेस्ट्रॉल वाढणे यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. भारतीयांच्या आहारात कितीही टाळलं तरी तेलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अलीकडे शेंगदाण्याच्या तेलाला किंवा त्याहूनही अधिक कोलेस्ट्रॉल युक्त तेलांना पर्याय म्हणून नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. ऑलिव्ह ऑइलच्या तुलनेत स्वस्त असल्याने हा पर्याय प्रसिद्ध झाला आहे. तसेच कोकण- मालवण पट्ट्यात तर फार पूर्वीपासून खोबरेल तेलाचा वापर सामान्यतः केला जातो. पण हे खोबरेल तेल हृदयासाठी चांगले आहे की नाही? याविषयी आपण आज तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेणार आहोत. यासाठी इंडियन एक्सप्रेसने डॉ रंजन शेट्टी, HOD आणि सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांच्याशी संवाद साधला आहे. त्यानुसार नेमकं काय खरं, काय खोटं, हे पाहूया ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. शेट्टी सांगतात की, “खरं तर, कोणत्याही वनस्पतीच्या तेलात कोलेस्ट्रॉल नसते. अनुवांशिक घटक व जीवनशैलीनुसार आपले शरीर स्वतः कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण करत असते. पण तुमच्या शरीरात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलची पातळी आहारामुळे वाढू नये यासाठी तुम्ही कोणते तेल वापरता हे महत्त्वाचे असते.

नारळाच्या तेलात मध्यम साखळीतील फॅटी ऍसिडस्चे प्रमाण जास्त असते, जे फॅट टिश्यूमध्ये सहज साठवले जाऊ शकत नाही. यामध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्सचे असतात. साधारणपणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी याप्रकारचे फॅट्स टाळणे आवश्यक असते पण खोबरेल तेलात लॉरिक ऍसिड असल्याने हे फॅट्स सुद्धा शरीराच्या ऊर्जानिर्मितीसाठी वापरले जातात आणि साठून राहिलेल्या चरबीमध्ये रूपांतरित होत नाहीत. याच कारणाने वजन कमी करण्यासाठी सुद्धा खोबरेल तेलाची मदत होऊ शकते.

आता खोबरेल तेल वापरल्याने फायदा होऊ शकतो हे जरी आपण पाहिले असेल तरी तुम्ही किती प्रमाणात तेलाचे सेवन करता हा ही मुद्दा महत्त्वाचा आहे. कोलेस्ट्रॉल व वजन कमी कारण्यासाठी कार्ब्स हा तुमचा शत्रू सिद्ध होऊ शकतो. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपण आहारात पोर्शन कंट्रोलला आणि कॅलरी बर्निंगला महत्त्व देणं गरजेचे आहे.

नारळाचे तेल कोलेस्ट्रॉल वाढवते का? (Can Coconut Oil Boost Cholesterol)

यापूर्वी प्राण्यांवर झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, आठ आठवडे उंदरांच्या आहारात खोबरेल तेल कमी प्रमाणात घेतल्याने त्याचा लठ्ठपणा वाढू लागतो. या तेलामुळे उंदरांच्या शरीरातील लेप्टिन आणि इन्सुलिन, भूक, चरबी आणि साखर यांचे नियमन करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दोन हार्मोन्सच्या वापराची क्षमता विस्कळीत झाली होती. पण उंदरावरील प्रयोगातील प्रमाण व पद्धत मानवापेक्षा वेगळी असल्याने त्याचा प्रभाव वेगळा असू शकतो. नारळाच्या तेलात चांगले (उच्च घनतेचे लिपोप्रोटीन किंवा एचडीएल) आणि वाईट कोलेस्टेरॉल (कमी घनतेचे लिपोप्रोटीन किंवा एलडीएल) या दोन्हीची पातळी अन्य वनस्पती-आधारित तेलांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

खोबरेल तेलात ९० टक्क्यांहून अधिक सॅच्युरेटेड फॅट्स असतात जे, लोण्यापेक्षा ६० टक्के जास्त आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि इतर गटांनी नेहमीच सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन मर्यादित ठेवण्याची आणि मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

२०१६ आणि २०२० मधील अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, खोबरेल तेलामुळे एचडीएलमध्ये वाढ होत असली तरी, एलडीएलमध्येही वाढ झाली आहे. ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल, करडई आणि कॉर्न ऑइल यांसारख्या अनसॅच्युरेटेड तेलांच्या तुलनेत, खोबरेल तेल तुमचे एचडीएल, एलडीएल आणि एकूण कोलेस्ट्रॉल वाढवते. यासंदर्भात आणखी ठोस पुरावे समोर येण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे.

खोबरेल तेलाचे सेवन किती व कसे करावे? (How Much Coconut Oil Should be Taken)

जे लोक खूप उच्च तापमानात शिजवतात त्यांच्यासाठी, नारळ तेल हे एक चांगले माध्यम आहे कारण त्याचा स्मोकिंग पॉईंट खूप जास्त आहे, ज्या तापमानात तेल विषारी पदार्थांमध्ये मोडते.

हे ही वाचा<< ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

खोबरेल तेल हे साधारण एक ते दोन चमचे (दररोज 28 ग्रॅम) पेक्षा कमी वापरल्यास त्रास होण्याची शक्यता कमी असते. विशेषतः उच्च तापमानात अन्न शिजवताना खोबरेल तेलाचा वापर करता येतो कारण खोबरेल तेलाचा स्मोकिंग पॉईंट उच्च असतो. परंतु ऑलिव्ह, अॅव्होकॅडो आणि कॅनोला तेल हृदयासाठी सर्वात सुरक्षित मानले जातात. तुमच्या आहारात नट, बिया, मासे आणि एवोकॅडो यांसारख्या आरोग्यदायी फॅट्सचा समावेश करणे हे सर्वात उत्तम ठरेल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can coconut oil boost good cholesterol and boost your heart health how much oil should be eaten daily health expert news svs