Constipation Remedies: सध्या सोशल मीडियावर एक विचित्र पण मजेशीर उपाय खूप व्हायरल होत आहे – जेव्हा तुम्ही शौचालयावर बसता, तेव्हा जोरात फुंकर मारणे, फुगवल्यासारखा आवाज करणे किंवा जोरात श्वास सोडणे, यामुळे बद्धकोष्ठतेपासून (म्हणजे पोट साफ न होणं) आराम मिळतो, असं म्हटलं जातं. पण, खरंच यामुळे फायदा होतो का?
डॉ. जयंत ठाकुरिया (डायरेक्टर – इंटर्नल मेडिसिन आणि संधिवाततज्ज्ञ, यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फरीदाबाद) यांच्या मते, हा उपाय फुप्फुसाच्या खाली असलेल्या डायाफ्राम आणि पोटाचे स्नायू वापरून केला जातो, यामुळे पचनतंत्राला चालना मिळू शकते.
डॉ. ठाकुरिया सांगतात, “फुंकर मारण्यासारख्या कृतीमुळे पोटात दबाव तयार होतो आणि त्यामुळे शौचाला जाण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.”
जरी यामुळे थोडा आराम मिळू शकतो, तरीही हा उपाय बद्धकोष्ठतेवर खऱ्या अर्थाने वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेला नाही. “बहुतेक वेळा बद्धकोष्ठता ही जीवनशैलीतील सवयींमुळे किंवा काही आरोग्याच्या समस्यांमुळे होते आणि त्यासाठी योग्य उपचार गरजेचे असतात,” असं ते सांगतात.
बद्धकोष्ठतेवर काय उपाय करता येतील? (Constipation Cause and Remedies)
तुम्ही जर बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल, तर डॉ. ठाकुरिया यांनी सुचवलेले काही खात्रीशीर उपाय पुढीलप्रमाणे आहेत :
१. फायबरचं प्रमाण वाढवा
“फळं, भाज्या, कडधान्यं आणि धान्य (जसं की गहू, बाजरी) यामध्ये फायबर भरपूर असते. हे अन्न खाल्ल्यामुळे पोटातील मल जाडसर आणि मऊ होतो, ज्यामुळे शौच करायला सोपं जातं,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात. पचनतंत्र नीट चालण्यासाठी फायबर खूप महत्त्वाचं आहे.
२. भरपूर पाणी प्या
शरीरात पाण्याची कमतरता ही मल कठीण होण्याचं एक मुख्य कारण असतं. “पुरेसं पाणी प्यायल्यामुळे मल मऊ होतो आणि शौचास जायलाही सोपं जातं,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात. रोज कमीत कमी ८–१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमचं काम शारीरिक श्रमाचं असेल तर आणखी पाणी प्या.
३. शारीरिक हालचाल करा
“व्यायाम केल्याने आतड्यांचे स्नायू सक्रिय होतात,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात. चालणे, धावणे किंवा योगासन करणं यामुळे शौच नियमित होण्यास मदत होते.
४. कोमट द्रवपदार्थ प्या
“सकाळी दिवसाची सुरुवात कोमट पाणी किंवा हर्बल चहा पिऊन केल्यास पचनतंत्र सुरू होण्यास मदत होते,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात. हा साधा उपाय सौम्य बद्धकोष्ठतेवर उपयोगी ठरू शकतो.
५. पोटावर मसाज करा
पोटावर घड्याळाच्या दिशेने (उजवीकडून डावीकडे) हळूवार मसाज केल्याने मोठ्या आतड्यांतील हालचाल सुधारते. “हा उपाय कोमट पाणी पिणं किंवा व्यायाम यासोबत केल्यास आणखी फायदा होतो,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात.
६. प्रोबायोटिक्स वापरा
प्रोबायोटिक्स म्हणजे दही किंवा केफिरसारख्या पदार्थांमध्ये असणाऱ्या जीवाणूंचं प्रमाण. “हे पचन सुधारायला आणि शौच नियमित ठेवायला मदत करतात, विशेषतः ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात.
७. शौचाच्या वेळी बसण्याची योग्य स्थिती
शौच करताना शरीराची स्थिती थोडी बदलून स्क्वॉटिंग पद्धत अवलंबल्यास मोठं आतडं सरळ होतं आणि शौच सुलभ होते. “पायाखाली एक लहान स्टूल ठेवून बसल्यास खूप फरक पडतो,” असं ते सांगतात.
जोरात फुंकर मारण्यासारखे उपाय थोड्या वेळासाठी आराम देऊ शकतात; पण जर बद्धकोष्ठता वारंवार होत असेल, किंवा खूप त्रासदायक असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. “अशी सतत होणारी बद्धकोष्ठता ही काही गंभीर समस्या जसं की इरिटेबल बाउल सिंड्रोम, हायपोथायरॉईडिझम किंवा आतड्यांच्या रचनेतील अडचणी यांचे लक्षण असू शकते,” असं डॉ. ठाकुरिया सांगतात. आहार आणि जीवनशैलीत बदल करूनही फरक न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.