What foods to eat in Thyroid: सद्यःस्थितीत प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. सकस आहाराचा अभाव, व्यायामाकडे दुर्लक्ष, वाढती व्यसनाधीनता यामुळे कोणत्या ना कोणत्या आजाराची बाधा होत आहे. प्रत्येक घरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा थायरॉईडचे रुग्ण आढळणे सामान्य झाले आहे. थायरॉईडच्या समस्येमुळे वजन झपाट्याने वाढू लागते किंवा कमी होऊ लागते, त्यामुळे शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होतो. थायरॉइड गळ्यात असणारी एक ग्रंथी आहे जी मेटाबॉलिक प्रक्रियेला नियंत्रणात ठेवते. जर ही योग्य प्रकारे काम करत नसेल तर कित्येक समस्या निर्माण होऊ शकतात.

थायरॉईडची समस्या पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये आढळते. ही अनुवांशिक समस्या आहे, त्यामुळे घरात कोणाला थायरॉईड असेल तर मुलांमध्ये त्याचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. थायरॉईड ग्रंथी ही मानेच्या पुढच्या भागात असते आणि T3, T4 हे हार्मोन्स तयार करते. ही हार्मोन्स शरीरातील चयापचय (मेटाबॉलिझम), उर्जा निर्मिती, वजन आणि मानसिक आरोग्य यावर परिणाम करत असतात. थायरॉईडचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये हायपरथायरॉईडीझम, हायपोथायरॉईडीझम, थायरॉईडायटीस आणि हाशिमोटो थायरॉईडाइटिस यांचा समावेश होतो. थायरॉईडचा त्रास असलेल्या लोकांसाठी योग्य खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडासा निष्काळजीपणा ही समस्या वाढवू शकतो. मग अशात थॉयराईड ग्रस्त असणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. विशेषत: काय खावं आणि काय खाऊ नये, हे जाणून घेणे गरजेचं असतं. पोषणतज्ज्ञ आहारतज्ज्ञ डॉ. स्मृती झुनझुनवाला यांनी थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी कोणते पदार्थ खावीत याविषयी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

१. भोपळ्याच्या बिया

थायरॉईडच्या रुग्णांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांसाठी ते चांगले मानले जाते.

२. कढीपत्ता

तुम्ही ताजी कढीपत्ता सेवन करू शकता. कारण त्यात फायबर असते. ही हिरवी पाने थायरॉईडच्या रुग्णांनाही आराम देतात. त्यामुळे जेवणात आलेली कढीपत्याची पाने अजिबात ताटाबाहेर काढू नका. त्याचे सेवन करा.

३. फ्लेक्ससीड

थायरॉईडच्या रुग्णांसाठी फ्लेक्ससीड्समध्ये भरपूर पोषक घटक असतात. तुम्ही रोज जवसाच्या बियांचे सेवन करू शकता. त्यामुळे थायरॉईड नियंत्रण राहते.

४. राजगिरा

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी राजगिरा खाऊ शकता. राजगिरा (कम्बा) हे एक पौष्टिक अन्न आहे जे थायरॉईडच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात, जसे की लोह, झिंक, आणि सेलेनियम, जे थायरॉईडच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. 

५. मूग

मूगाची दाळ ही आयोडीन प्रदान करते आणि मूगाच्या दाळीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती पचण्यास हलकी असते. म्हणूनच थायरॉईड नियंत्रित राहण्यासाठी आहारात मूगाच्या दाळीचा समावेश करावा.

६.डाळींब

थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे, कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे असतात, जे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक आहेत.