आतड्यांच्या आरोग्यासाठी तीन सर्वोत्तम औषधी वनस्पतींबाबत YouTube वर माहिती सांगताना हार्वर्ड-प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अन्न शिजविण्यासाठी ‘सर्वोत्तम तेलांची यादी दिली आहे. त्यांच्या मते, “सर्वोत्तम पर्यायांपैकी एक म्हणजे EVOO किंवा एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. त्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सच्या समृद्ध घटकांमुळे त्याला ते एक उत्कृष्ट तेल म्हणतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारून, हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. या तेलाचा स्मोक पॉइंट तुलनेने कमी असतो, ज्यामुळे ते हलक्या ते मध्यम आचेवर स्वयंपाक करण्यासाठी योग्य ठरते.”
दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना दिल्लीतल सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. विकास जिंदाल यांनी याबाबत सहमती दर्शविली आणि सांगितले,”ही शिफारस वैज्ञानिक पुराव्यांद्वारे सिद्ध झाली आहे.”
“एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, विशेषतः ओलिक अॅसिड (oleic acid) आणि त्यात पॉलीफेनॉल असतात. त्यातील वनस्पती-आधारित अँटिऑक्सिडंट्स आतड्यांमधील दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. ही संयुगे आतड्याच्या अस्तरांचे संरक्षण करतात, आतड्यांतील फायदेशीर जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि त्यामुळे आतड्यांशी संबंधित दाहक रोगां (IBD) सारख्या दीर्घकालीन पचनविकारांचा धोका कमी करतात,” असे डॉ. जिंदाल म्हणाले.
त्याशिवाय डॉ. जिंदाल म्हणाले की, मेडिटेरियन डाएट (Mediterranean diet) सह अनेक अभ्यासांमधून सातत्याने असे दिसून आले आहे , “ऑलिव्ह ऑइलचे नियमित सेवन पचनासंबंधीचे आरोग्य सुधारते, गट पेरमेबिलिटी (gut permeability) कमी होते, ज्याला लिकी गट (leaky gut) असेही म्हणतात आणि सूक्ष्मजीवांची विविधता (microbial diversity) वाढते.”
अॅव्होकॅडो तेलचा ‘स्मोक पॉईंट उच्च’ असतो, तळणे किंवा एअर फ्राय यांसारख्या उच्च उष्णतेच्या स्वयंपाक पद्धतींसाठी आदर्श ठरते. “अॅव्होकॅडो तेल हे त्याच्यातील उच्च मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स घटक आणि उच्च स्मोक पॉइंटसह कच्च्या आणि शिजवलेल्या दोन्ही पदार्थांसाठी योग्य आहे, जे आतड्यांसाठी समान फायदे देते,” असे डॉ. जिंदाल सांगतात.
ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे उच्च प्रमाण असलेले जवस तेल हा एक चांगला पर्याय आहे. “ओमेगा-३ मध्ये हृदय सशक्त करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जर तुम्ही मासे खात नसाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे,” असे त्यांनी सांगितले.
जवसाच्या तेलात वनस्पती-आधारित ओमेगा-३ फॅटी अॅसिड (ALA) जास्त प्रमाणात असते, जे दाहकता कमी करण्यासाठी आणि आतड्यांची नियमितता सुधारण्यासाठी ओळखले जाते. त्याबाबत डॉ. जिंदाल सहमत असले तरी ते म्हणाले, “ते तेल गरम करू नये आणि ते कच्चे सेवन करणे चांगले.”
”जेव्हा ही तेले सहज उपलब्ध नसतात, तेव्हा खोबरेल तेल आणि तूप हे दोन सर्वोत्तम पर्याय आहेत. कारण- त्याच सॅच्युरेडेट फॅट्स असूनही, ते आरोग्यासाठी फायदे देतात, अँटिऑक्सिडंट्स देतात आणि तुम्हाला तृप्त ठेवतात. पण, मध्यम प्रमाणातच त्याचे सेवन करा,” असे डॉ. सेठी म्हणाले.
संतृप्त फॅट्स जास्त असले तरी डॉ. जिंदाल यांनी सहमती दर्शवली,”ते उच्च तापमानात अधिक स्थिर असतात आणि मध्यम प्रमाणात पचनास मदत करू शकतात, विशेषतः तूप, ज्यामध्ये ब्यूटायरेट असते, एक शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड, जे आतड्याच्या पेशींना पोषण देते.”