Urinary Tract Infection In Monsoon : पावसाळ्यात अनेकांना यूटीआयचा त्रास जाणवतो, कारण पावसात वातावरण एकदम दमट असते; ज्यात सूक्ष्मजंतू, जीवाणू, बुरशी वेगाने वाढू लागतात. याशिवाय साचलेल्या पाण्यात डास, माश्या आणि इतर रोगवाहक जीवाणूंना प्रजननासाठी जागा तयार होतात. या सर्व दूषित वातावरणामुळे अनेकांना योनी मार्गातील जंतू संसर्गाचा (UTIs) त्रास जाणवतो. यावर उपचार करण्यासाठी आपण अनेक गोळ्या, औषधे घेतो. पण, आजार नेमका काय आहे, याची लक्षणे काय? तसेच उपचार कशा पद्धतीने केले पाहिजेत? यावर मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन, जनरल आणि क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. अनुपमा सरदाना यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीवरून जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूटीआय म्हणजे काय?

पावसाळ्यात बॅक्टेरिया मूत्र मार्गात प्रवेश करतात आणि वाढू लागतात, ज्यामुळे यूटीआयचा संसर्ग होतो. बॅक्टेरिया मूत्रमार्गाच्या उघड्या जागेतून प्रवेश करतात. यानंतर मूत्रमार्गाच्या आतील वरच्या दिशेने जातात आणि संक्रमण करतात, काहीवेळा गंभीर प्रकरणांमध्ये संसर्ग मूत्रपिंडापर्यंत जाऊ शकतो आणि उपचार न केल्यास त्याचे नुकसान होऊ शकते.

पावसाळ्यात यूटीआयचा संसर्ग का वाढतो?

पावसाळ्यात एकाच वेळी उष्ण आणि दमट वातावरण असते. काही लोकांना अनेकदा जास्त घाम येतो, असे असूनही ते कमी पाणी पितात. या दोन्ही गोष्टी काहीवेळा निर्जलीकरणास कारणीभूत ठरतात. यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे बॅक्टेरिया मूत्रमार्गात जास्त काळ राहतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त पाऊस आणि घाम यामुळे अंगावरील कपडे ओलसर राहतात. अशावेळी जननेंद्रियाच्या आसपास बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे यूटीआयचा धोका वाढतो.

पावसाळ्यात स्वच्छतेचा अभाव आणि दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असते. जर योग्य स्वच्छता राखली नाही तर दूषित पाण्यामुळे मूत्रमार्गात रोगजंतूंचा प्रसार होतो. तसेच विविध आजारांमुळे पावसाळ्यात अनेकदा डॉक्टरांचे उपचार घ्यावे लागतात. या काळात रुग्णालयांमध्येही यूटीआय संक्रमित रुग्णांची संख्या अधिक असते.

पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रास का होतो?

यामागचे कारण म्हणजे स्त्रियांचे मूत्रमार्ग गुदद्वाराच्या उघडण्याच्या अगदी जवळ असते आणि त्यामुळे योग्य स्वच्छता न पाळल्यास जंतू आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीवांना मूत्रमार्गावर परिणाम करणे सोपे होते. दुसरे म्हणजे, स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग पुरुषांपेक्षा लहान असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढते.

यूटीआयची लक्षणे काय आहेत?

लघवी करताना वेदना आणि जळजळ, वारंवार लघवी झाल्यासारखे वाटणे, गडद किंवा दुर्गंधीयुक्त लघवी होणे, थकवा, ओटीपोटात तीव्र वेदना, ताप, मळमळ आणि उलट्या.

यूटीआयवर उपचार कसे करावे?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच यूटीआयवर उपचार करा, कारण तुमचे डॉक्टर लघवीतील इन्फेक्शनच्या आधारे तुम्हाला औषधं, गोळ्यांची शिफारस करतील.

डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा आणि औषध, गोळ्यांचा कोर्स पूर्ण घ्या. तुम्हाला बरे वाटले तरी औषध, गोळ्या घेणे मध्येच बंद करू नका. कारण औषध, गोळ्यांचा कोर्स पूर्ण न केल्यास त्रास पुन्हा वाढू शकतो. अशा परिस्थितीत उपचार करणे अधिक आव्हानात्मक होऊ शकते.

यूटीआय संक्रमण कसे टाळायचे?

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा, जेणेकरून तुमचे शरीर जीवाणू, विषाणूंचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकेल. स्वच्छता राखा, स्वच्छ पाणी प्या, कोरडे स्वच्छ कपडे परिधान करा. तसेच पावसामुळे ओले झालेले कपडे ताबडतोब बदला, जेणे करून तुम्हाला यूटीआयचा त्रास जाणवणार नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon health tips why do utis spiral during the monsson here all you need to know sjr