150 Days Salad Diet Challenge : फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर व दिग्दर्शक आहे. काही रिॲलिटी शोमध्ये सूत्रसंचालनदेखील करते. टीव्हीबरोबरच अनेकदा फराह खान तिच्या यूट्यूबवरील फूड ब्लॉगच्या व्हिडीओमुळे चर्चेत सुद्धा असते. अलीकडेच ती अभिनेता सोनू सूदच्या घरी गेली. तेव्हा अभिनेता सोनू सूदने ॲव्होकाडो टोस्ट बनवला होता. यादरम्यान फराह खानने दिग्दर्शित केलेल्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या सेटवरील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या. त्यातील एक गोष्ट तर अगदी थक्क करणारी होती.

ती म्हणजे अभिनेता सोनू सूद शुद्ध शाकाहारी आहे आणि त्याने १५० दिवसांच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या शूटिंगदरम्यान फक्त ‘सॅलड’ खाल्ले होते. तर द इंडियन एक्स्प्रेसने १५० दिवस सॅलड खाल्ल्याने शरीराचे काय होते हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली. सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा ​​यांच्या मते, १५० दिवसांसाठी फक्त सॅलडचा आहार घेतल्याने शरीरावर खोलवर परिणाम होऊ शकतात.

जर तुम्ही फायद्यांकडे लक्ष दिले तर नियमित सॅलडचे सेवन केल्याने व्हिटॅमिन, मिनरल, अँटिऑक्सिडंट आणि फायबरचे सेवन लक्षणीयरीत्या वाढते; ज्यामुळे हायड्रेशन, आतड्यांचे आरोग्य, चयापचय कार्य आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. हृदयरोग, कर्करोगांसह दीर्घकालीन आजारांचे धोके कमी होतात. सतत फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने आपले पचन सुधारते आणि शरीर तंदुरुस्त राहते आणि मन तृप्त राहते. त्याचबरोबर दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सॅलड दररोज खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे वय वाढल्यावर मेंदूची शक्ती कमी होण्याची गती कमी होते.

सॅलडवर टिकून राहणे म्हणजे जोखीम

पण, फक्त सॅलडवर टिकून राहणे कदाचित तुमच्या आरोग्यासाठी जोखीम सुद्धा निर्माण करू करते. सॅलडमध्ये ऊर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन बी१२, लोह, जस्त आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण कमी असते; जे स्नायूंची ताकद, रोगप्रतिकारक शक्ती, हार्मोनल संतुलन, शरीराची ऊर्जा शरीरात ठेवण्यास मदत करतात. विशेषतः अभिनयासारख्या शारीरिकदृष्ट्या कठीण कामांमध्ये; असे तज्ज्ञ म्हणाल्या आहेत.

फक्त कच्च्या भाज्या खाल्ल्याने पचनक्रियेत त्रास (पोट फुगणे किंवा शौच अनियमित होणे), अपुरे कॅलरीजचे सेवन (परिणामी थकवा आणि संभाव्य पोषक तत्वांची कमतरता), स्नायू कमी होणे किंवा अपुऱ्या प्रथिनांच्या सेवनामुळे शारीरिक कार्यक्षमता बिघडणे किंवा ताकद कमी होणे; आदी समस्या उद्भवू शकतात. सॅलड्स आहाराचा महत्वाचा भाग असला तरीही मेहनती कामांसाठी किंवा जीवनशैलीसाठी आणि योग्य पोषण मिळवण्यासाठी अन्नात विविधता असणे महत्वाचे आहे. जसे की, धान्ये, कडधान्ये, सुका मेवा, बिया आणि गरजेनुसार पूरक आहार.

संतुलित आहाराचा भाग म्हणून शाकाहारी सॅलड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण, फक्त सॅलडवरच १५० पेक्षा जास्त दिवस अवलंबून राहणे योग्य नाही. कारण त्यामुळे आरोग्य आणि शरीराची कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमी होऊ शकते ; असे तज्ज्ञ म्हणाल्या आहेत.