Fruits With The Most Protein : आहारात प्रथिनांचा समावेश असावा असे अनेकदा आपल्याला सांगितले जाते, त्यामुळे प्रथिने हा आपल्या शारीसाठी उपयुक्त असा महत्त्वाचा घटक असतो. पण, जर आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने घेतली नाहीत तर त्यामुळे शरीर, हाडे कमकुवत होऊ शकतात; म्हणून मग आपण आहारात प्रथिनांचा समावेश करण्यासाठी योग्य पदार्थ शोधण्याच्या मागे लागतो आणि आहारात किती प्रोटीन आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
याबद्दल पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी अलीकडेच अशी माहिती शेअर केली, जी कदाचित कोणालाच माहिती नसेल; तर ४ ग्रॅम प्रथिने असलेले एकमेव फळ पेरूबद्दल माहिती देत तज्ज्ञ म्हणतात, यामध्ये “१ कप पेरू = ४ ग्रॅम प्रथिने (जवळजवळ अर्ध्या उकडलेल्या अंड्यासारखेच)” असतात. प्रथिनांच्याही पलीकडे, पेरू हा मधुमेह असलेल्यांसाठी फायदेशीर तर फळाची पाने उकळवून त्याचा चहा पिणे आरोग्यसाठी चांगले ठरू शकते.
पेरूमध्ये प्रथिने असतात का?
तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सचे डायबेटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय नेगलूर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार पेरूमध्ये प्रति कप सुमारे ४ ग्रॅम प्रथिने असतात. पण हे एकमेव फळ नाही, ज्यामध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. तर पेरूबरोबरच ॲवोकॅडो, फणसामध्येदेखील काही प्रमाणात प्रथिने असतात. पेरूला खास बनवणारी गोष्ट म्हणजे प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स यांचे अद्वितीय मिश्रण या एकाच फळात आहे; म्हणूनच मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हे फळ भरपूर फायदेशीर ठरते.
पेरू या फळात असणाऱ्या कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि लोडमुळे (load) रक्तातील साखर हळूहळू वाढते. त्यातील फायबरचे प्रमाण कार्बोहायड्रेटचे शोषणदेखील कमी करते; जे जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध घालण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, पेरूमधील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात; जो मधुमेहाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होण्यामागील एक लपलेलं कारण ठरू शकतो, असे डॉक्टर विजय नेगलूर म्हणाले आहेत.
मग तुम्ही काय लक्षात ठेवावे?
सगळ्यात पहिले तर संयम राखणे महत्त्वाचे आहे. दिवसातून एक मध्यम आकाराचा पेरू खाल्ला तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डॉक्टर नेगलूर यांच्या मते, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जास्त पिकलेले पेरू खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे, कारण पेरू गोड असतात; यामुळे केव्हा केव्हा साखरेची पातळी लवकर वाढू शकते. जर तुम्ही नियमितपणे पेरूच्या पानांच्या चहाचे सेवन करणार असाल तर तुमच्या डॉक्टरांना कळवा, जेणेकरून ते तुमच्या औषधांचे निरीक्षण करू शकतील आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करू शकतील…
मधुमेह असणाऱ्यांनी फळांचे सेवन करताना काय लक्षात ठेवले पाहिजे?
फळ खाण्याची वेळ आणि प्रमाण याकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे. फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खा. एकाच वेळी सर्व फळे खाण्याऐवजी फळे जेवणादरम्यान खाण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की, आरोग्यासाठी पेरू उत्तम असला तरी तुमचे लक्ष संतुलित आहार, व्यायाम आणि तुमच्या उपचार पद्धतीचे पालन आदी अनेक गोष्टींवर अवलंबून असले पाहिजे, असे डॉक्टर म्हणतात.