आजकाल घरातील प्रत्येक व्यक्ती किंवा मित्राचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस यानिमित्त केक हमखास आवडीने खाल्ला जातो. अनेकदा गोड पदार्थ म्हणून लोक पेस्ट्री खाताना दिसतात. परंतु, त्यामध्ये साखरेचे प्रमाण किती आहे हे आपण लक्षात घेत नाही. पॅक केलेल्या ब्रेड, चिप्स, नूडल्स, चीज व बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे याची यादी तुम्ही पाहिली असेल. आज आपण केक आणि पेस्ट्री यांसारख्या बेकरी उत्पादनांमध्ये असलेले साखरेचे प्रमाण शोधणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केक पेस्ट्रीमध्ये साखर किती प्रमाणात असते?

नवी दिल्लीच्या न्यू फ्रेंडस कॉलनीमधील आर्टेमिस लाइटच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट संगीता तिवारी सांगतात, “केक पेस्ट्रीसारखे बेकरीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सामान्यत: त्यांना चांगली चव येण्यासाठी भरपूर साखर वापरली जाते.” “मिश्रित साखरेचे अचूक प्रमाण आणि भाजलेल्या वस्तूंच्या प्रकारानुसार रेसिपी बदलू शकते. परंतु, सहसा त्यात खूप जास्त प्रमाणात साखर वापरली जाते. उदाहरणार्थ- केकचा तुकडा किंवा एका पेस्ट्रीत सुमारे १० ते ३० ग्रॅम किंवा त्याहून अधिक साखर असू शकते,” तिवारी म्हणाले.

हेही वाचा – आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…

धोका काय आहे?
दररोज जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. यांनी सांगितले, “प्रक्रिया केलेल्या बेक्ड (Baked) उत्पादनांमधून जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने गंभीर आरोग्य धोके उदभवतात. जसे की मधुमेह, लठ्ठपणा, दातांच्या समस्या, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार आणि पोषक घटकांची कमतरता. अनेक नकारात्मक परिणामांपैकी एक म्हणजे वजन वाढणे आणि लठ्ठपणा. शर्करायुक्त पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते; परंतु पोषक घटकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तृप्तता किंवा पौष्टिक मूल्य मिळत नाही; पण जास्त कॅलरीजचे सेवन होऊ शकते. त्यामुळे अखेरीस वजन वाढते आणि लठ्ठपणाशी संबंधित परिस्थिती जसे की टाईप-२ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो,”

जास्त प्रमाणात साखरेचे वारंवार सेवन केल्याने तुमची चयापचय क्रियादेखील बिघडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “त्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार (insulin resistance) होऊ शकतो, जिथे तुमच्या पेशी इन्सुलिन हार्मोनला कमी प्रतिसाद देतात. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. कालांतराने हे टाईप २ मधुमेहापर्यंत वाढू शकते. एक गंभीर चयापचय विकार; जो रक्तातील साखरेची उच्च पातळी दर्शवितो,” असे तिवारी यांनी सांगितले.

तसेच, जास्त साखरेच्या सेवनामुळे इतर विविध आरोग्य समस्याही उदभवतात; जसे की दातांना कीड लागणे, जळजळ व विशिष्ट कर्करोगाचा धोका वाढतो. “तुमच्या मनस्थिती आणि उर्जेच्या पातळीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परिणामी दिवसभर उर्जेच्या पातळीमध्ये चढ-उतार होऊ शकतात” असेही तिवारी यांनी नमूद केले.

“प्रक्रिया केलेल्या केक, कुकीज व पेस्ट्रीमध्ये केवळ साखरच नाही, तर ट्रान्स फॅट्स आणि अस्वास्थ्यकर तेलदेखील सहसा आढळते; ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढते आणि शरीरात जळजळ होऊन हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका वाढतो,” असे सुषमा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – कलिंगड आणि टरबूज; मधुमेहींसाठी कोणते फळ खाणे आहे सुरक्षित? तज्ज्ञांचे काय आहे मत…

काय करायचे?

बेकरी उत्पादनांमध्ये असलेल्या अतिरिक्त साखरेचा हानिकारक प्रभाव कमी करण्यासाठी आपण ते किती प्रमाणात खात आहोत याकडे लक्ष देणे आणि आरोग्यदायी पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.
साखरेचे प्रमाण कमी असलेले गोड पदार्थ निवडा किंवा फळे किंवा मध यांसारख्या नैसर्गिक घटकांनी तयार केलेले गोड पदार्थ शोधा. तसेच, बेकरी उत्पादने व पेस्ट्री यांचे सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करा आणि दररोज त्यांचे सेवन टाळा.
उत्पादनावरील पोषण लेबल (nutrition labels) वाचण्याची सवय लावा; जेणेकरून तुम्ही आवश्यक माहिती घेऊन तुम्हाला योग्य त्या पदार्थांची निवड करू शकाल आणि जास्त प्रमाणात साखर असलेली उत्पादने टाळू शकता.

बेकरी उत्पादने आणि पेस्ट्री चवदार असल्या तरी त्यामध्ये सामान्यत: जास्त प्रमाणात साखरेचा समावेश असतो. त्यामुळे जास्त प्रमाणात बेकरी उत्पादने आणि पेस्ट्रीचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तिवारी सांगतात, “तुम्ही किती प्रमाणात साखरेचे सेवन करीत आहात याकडे लक्ष द्या, आरोग्यदायी पर्यायांची निवड करा आणि मर्यादित प्रमाणातच त्यांचे सेवन करा. त्यामुळे आरोग्यविषयक धोका टाळण्यास मदत होऊ शकते आणि एकूणच आरोग्याला चालना देऊ शकता.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why you should limit your consumption of bakery items like cakes pastries snk
First published on: 01-05-2024 at 13:23 IST