बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जनमानसांत असलेले कुतूहल ‘बाळकडू’ या चित्रपटातून उलगडेल की त्यांचे ज्वलंत विचार लोकांपर्यंत पोहोचतील, या प्रश्नावर दिग्दर्शक अतुल काळे म्हणाले की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांपासून ते शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर अशी अनेक मराठी माणसे आपल्या कर्तृत्वाने मराठीचे अटकेपार झेंडे लावताना मराठी माणूस पाहतो. या चित्रपटाद्वारे आपला लढा आपण देऊन केवळ रडत न बसता आपण कर्तृत्ववान बनले पाहिजे हाच बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मांडण्याचा प्रयत्न सिनेमॅटिक पद्धतीने ‘बाळकडू’ या चित्रपटातून केला आहे, असे दिग्दर्शक अतुल काळे यांनी सांगितले.
उगाचच केवळ दुसऱ्याला दोष देत, दूषणे देत राहण्यापेक्षा आपणच आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी संघर्ष करायला हवा, हेच आपल्या चित्रपटातील नायक सांगणार आहे. आतापर्यंत ‘चॉकलेट हिरो’ अशाच प्रकारच्या भूमिकांमधून अधिक दिसलेला अभिनेता उमेश कामत प्रथमच या चित्रपटाद्वारे एक संघर्ष करणारा, लढा देणारा नायक साकारत असून नेहा पेंडसे, शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, जयवंत वाडकर, प्रसाद ओक, आनंद इंगळे, टिकू तल्सानिया, महेश शेट्टी, भालचंद्र कदम यांसारख्या लोकप्रिय कलावंतांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चित्रपटाच्या माध्यमातून सांगणे हे निश्चितपणे एक आव्हान होते, असे काळे यांनी सांगितले.
बाळकृष्ण पाटील हा चित्रपटाचा नायक असून त्याचे बालपण लालबाग-परळ परिसरातील आहे आणि त्याच्या माध्यमातून चित्रपट उलगडणार आहे. चित्रपटाची गोष्ट किंवा महत्त्वाच्या गोष्टी उलगडण्यापेक्षा तो प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे हेच सयुक्तिक ठरेल, असे सांगत दिग्दर्शक काळे यांनी चित्रपटाविषयी सविस्तर सांगितले नाही. परंतु बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, त्यांचे दर्शन, त्यांचा आवाज या सिनेमाच्या माध्यमातून नक्की दिसेल एवढेच ते म्हणाले.
‘मी येतोय’, ‘रडायचं नाही, लढायचं’ यांसारख्या कॅचलाइन जाहिरातींमधून दिसत असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी औत्सुक्य निर्माण झाले असून त्याबाबत काळे म्हणाले की, प्रभावी संवाद हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. पटकथा-संवाद लेखन गाजलेले लेखकद्वय गणेश पंडित आणि अंबर हडप यांनी केले असून अजित-समीर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील पोवाडा हा उत्तम झाला असून तो लोकप्रिय होईल, असा विश्वास चित्रपटकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सुनील नांदगावकर
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2015 रोजी प्रकाशित
बाळासाहेबांचे ‘बाळकडू’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्या पश्चात लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने चित्रपटाचे माध्यम निवडण्यात आले असून ‘बाळकडू’ या चित्रपटाची निर्मिती रॉयल मराठा...
First published on: 16-01-2015 at 01:14 IST
TOPICSबाळासाहेब ठाकरेBalasaheb ThackerayबॉलिवूडBollywoodमनोरंजनManoranjanमनोरंजनEntertainmentमराठी चित्रपटMarathi Movie
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie balkadu