एके काळी मुंबईत ‘खाणे आणि गाणे’ हे मुंबईकरांचे श्रेयस आणि प्रेयस होते. त्या वेळची मुंबईही कुलाब्याच्या दांडय़ापासून सुरू होऊन माहीम आणि शीव किल्ल्यापर्यंत संपत होती. या एवढय़ाशा मुंबईत डोक्यावर अठरा पगडय़ा घातलेल्या अठरापगड जमाती वावरतही होत्या. लग्न समारंभावेळी शेटी यांच्या हंडय़ाझुंबरांच्या महालात किंवा गणेशोत्सवात गिरगावातील अनेक गल्ल्यांमध्ये रंगणाऱ्या मैफिली ऐकायला मुंबईकर रसिक कानात पंचप्राण आणून तयार असे. त्याचबरोबर कुलकण्र्याच्या हॉटेलात भजी खाल्ल्यावर वडा चापायला तंगडतोड करत दुसऱ्या टोकाला जाणारे मुंबईकर खव्वये ही मुंबईची शान होती. हळूहळू मुंबई आपली शीव ओलांडून पार मुलुंड-दहिसपर्यंत पोहोचली आणि ही खाद्य संस्कृतीही विस्तारली. मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांना आता नॅशनल पार्कपासून ते जुहू भागातील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यापर्यंत अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पण या स्थळांभोवती विकसित झालेल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येतो, हे खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. पण त्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यायला लागतील, हे नक्की!
मुंबई म्हटल्यावर सर्वात पहिले डोळ्यांसमोर येते ती मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसची, म्हणजेच पूर्वाश्रमीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसची देखणी इमारत. अनेक चित्रपटांमधून मुंबईची प्रतिमा या इमारतीने लोकांसमोर मांडली आहे. ही पुरातन वास्तू व्यवस्थित पाहण्यासाठी एक अख्खा दिवस पुरत नाही. निओ ग्यॉथिक शैलीतील या इमारतीवरील प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आकार पाहणे खरोखरच थक्क करणारे आहे. भारतीय रेल्वेचा पाया रचणाऱ्या तत्कालीन ब्रिटिश आणि भारतीयांचे चेहरेही या इमारतीवर कोरले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील अठरापगड जमातींच्या पगडय़ाही या इमारतीवर ठळक दिसतात.
या इमारतीच्या आसपास खाद्यपदार्थाची मैफील सजली आहे. मग तुम्ही सामिष असा वा निरामिष! आता या दोन शब्दांचा अर्थ माहीत नसेल, तर मग बोलणेच खुंटले! मांसाहाराचे भोक्ते असलेल्या खवय्यांना या इमारतीच्या बाजूने मशीद बंदरच्या दिशेने चालत राहिल्यास अगदी थोडय़ाच वेळात एक स्वर्ग दिसेल. रूढार्थाने पोलीस कॅण्टीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हॉटेलात खिमा पाव आणि समुद्री पुलाव हे पदार्थ अप्रतिम मिळतात. त्याशिवाय इथे इतर मासेही उत्तम बनवले जातात. समुद्री पुलावात तर अक्षरश: अख्खी समुद्रसृष्टी पानात येते. यात चिंबोऱ्यांपासून कोलंबीपर्यंत सगळेच मासे गुण्यागोविंदाने भाताच्या पोटात नांदत असतात. त्या दिवशी ताजे पकडलेले मासे तुमच्यासमोर एका प्लेटमध्ये घेऊन येऊन त्या माशांमधून निवड करण्याचे स्वातंत्र्यही या हॉटेलात मिळते. इथला खिमा खाऊन खवय्यांचे उस्ताद असलेल्या पु. ल. देशपांडे यांनीही तृप्तीची ढेकर दिली होती, असे म्हणतात.
माशांवर ताव मारायचा असेल तर बोरा बाजार लेनमध्येच संदीप गोमांतक हे उत्तम हॉटेल गाठायला हरकत नाही. संदीप गोमांतक या हॉटेलमध्ये कोलंबीपासून तिसऱ्यांपर्यंत सगळे मासे मिळतात. भाग्यवान असाल, तर पानात गाबोळी पडण्याची शक्यता आहेच. गोवे आणि मालवण यांच्यातील सीमारेषेवरील माशांची चव आणि त्याबरोबर तांदळाच्या लुसलुशीत भाकऱ्या. माशांमुळे पोटात कालवाकालव होऊ नये, म्हणून सोलकडी. हा बेत कोणत्याही खवय्याच्या तोंडाला पाणी सोडणाराच आहे.
शाकाहारींसाठी पोलीस कॅण्टीनजवळची किंवा आणखी चांगली खूण सांगायची, तर लोकमान्य टिळक यांचे निधन झाले, त्या सरदार गृहाजवळची एक उत्तम जागा आहे. जागेचे नाव बादशाह! नावावरून डोळ्यासमोर चिकन बिर्याणी वगैरे येत असली, तरी हे हॉटेल पूर्णपणे शाकाहारी आहे. या हॉटेलात पावभाजी अप्रतिम मिळते. त्याचप्रमाणे या हॉटेलमधलं फ्रुट सॅलडही खवय्यांच्या पसतीला उतरले आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीसमोर बोराबाजाराच्या रस्त्यावर पंचम पुरीवाला आपले बस्तान मांडून बसला आहे. त्याच्याकडील पुरी-भाजी केवळ भुकेला म्हणूनच नाही, तर जिभेचे चोचले पुरवायलाही उत्तम. महापालिकेच्या इमारतीसमोर आराम नावाच्या मराठमोळ्या पदार्थाच्या उपाहारगृहात झणझणीत मिसळीपासून खरवसापर्यंत (उच्चारी खर्वस) अनेक पदार्थ उत्तम मिळतात. तर या हॉटेलच्या बाजूच्याच गल्लीत मुंबईतील अत्यंत जुना विठ्ठल भेळवालाही ठाण मांडून आहे. या भेळवाल्याकडील चाट पदार्थाच्या चवीत वर्षांनुवर्षे काहीच फरक पडला नसल्याचे बुजुर्ग सांगतात.
पण भेळ खावी ती गिरगाव चौपाटीवर, मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून! तारापोरवाला मत्स्यालय आणि गिरगाव चौपाटी हीदेखील मुंबईत फिरायला येणाऱ्यांची आवडती पर्यटन स्थळे. तारापोरवाला मत्स्यालय सकाळच्या वेळेत उरकून घेतलेले चांगले. पण चौपाटीवर मात्र संध्याकाळीच रेंगाळण्यात मजा. या चौपाटीवर एकमेकींना लागून असलेल्या अनेक चाट आणि पावभाजीच्या गाडय़ा गंधावाटे मुंबईकरांच्या पोटाचा ठाव घेत असतात. चौपाटीवर भेळ विकणाऱ्या भैय्याच्या हाताला काय चव येते, कुणास ठाऊक! पण त्या भेळेची लज्जतच वेगळी. एखाद्या घराण्याचा एखादा राग एका ठरावीक गायकाची ओळख बनतो. तो राग इतर कोणीही कितीही छान आळवला, तरी त्या गायकाची सर येत नाही. चौपाटीवरच्या भेळेचेही तस्सेच आहे. ती चौपाटीवरच्या भय्याकडूनच घ्यावी आणि समुद्राच्या लाटांच्या साक्षीने वाळूत बसून खावी. तीदेखील कागदावर घेतल्यास उत्तम!
संध्याकाळच्या वेळी जुहूच्या परिसरात किंवा दादर परिसरात असाल, तरी खाण्यापिण्याची चैन आहे, हे नक्की. जुहू परिसरातही जुहू चौपाटी असल्याने तिथेही चाट पदार्थाची रेलचेल आहेच. पण त्याबरोबरच पार्ले स्थानकाकडे जाताना मिठीबाई कॉलेजसमोर खाऊ गल्लीत पोटपूजा करायला काहीच हरकत नाही. पाली हिलला जाऊन चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची घरे पाहण्याची इच्छा असेल, तर वांद्रे स्थानकावरून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे निघाल्यावर अनेक उत्तम हॉटेले आहेत. तिथेही कबाब आणि बिर्याणीवर ताव मारता येतो. सूर्यास्तावेळी हाजीअली भागात असाल, तर मग तिकडे हाजीअली जुस सेंटरमध्ये फ्रुट क्रीमचा आस्वाद घ्यायलाच हवा. सीताफळ, आंबा, ड्रायफ्रुट, स्ट्रॉबेरी अशा विविध फ्लेवर्समध्ये मिळणाऱ्या फ्रुट क्रीममुळे
गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आलात, तर बडेमियाँ, बगदादी, ऑलिंपिया, कॅफे लिओपोल्ड अशी अनेक खाण्याची ठिकाणे आहेत. ऑलिंपियामधील खिमा आणि भेजा मसाला खाल्लाच पाहिजे. मस्त झणझणीत रश्श्यासह येणारा भेजा मसाला आणि त्याबरोबर पाव किंवा लागलीच तर चपाती (पोळी) हे समीकरण अत्यंत उत्तम जमलेले आहे. ऑलिंपिया हॉटेलही काहीसे जुन्या धाटणीचे आहे. त्याउलट म्हणजे बडेमियाँ! असे म्हणतात की, ताज हॉटेलमध्ये राहणारे विदेशी पर्यटक या बडेमियाँकडे खायला येतात. बडेमियाँची खासियत म्हणजे बटर चिकन, चिकन भुना आणि चिकन खिमा. या तीन पदार्थाची लज्जत इथे काही औरच. शुक्रवारी किंवा शनिवारी रात्री आलात, तर मर्सिडिज, बीएमडब्लू अशा वेगवेगळ्या भारी गाडय़ांची बॉनेट उघडून त्याखाली एक बाटली उभी ठेवून त्या बॉनेटचेच टेबल बनवून बडेमियाँकडील पदार्थाचा आस्वाद घेणारे खवय्ये नक्कीच दिसतील. हे पदार्थ रूमाली रोटीबरोबर खाताना आणखीनच चविष्ट लागतात. बडेमियाँचा हा आब, तर त्याच्या बाजूला असलेल्या बगदादीमध्येही अस्सल मोगलाई पदार्थाची रेलचेल असते. इथली खासियत म्हणजे मोठय़ा थाळ्याच्या आकाराची रोटी. ही रोटी अत्यंत लुसलुशीत असल्याने जेवणात बहार आणते. त्याशिवाय बगदादीकडील बिर्याणीसुद्धा खाणाऱ्यांची दाद घेऊन जाते. बगदादीकडे बिर्याणी खावी आणि समोरच्या पानवाल्याकडे पान जमवावे. ही अगदी सर्वसामान्य हॉटेले असली, तरी त्याशिवाय फोर्टात अनेक वेगवेगळी हॉटेले आहेत. पण ही हॉटेले खिशाचा तळ रिकामी करणारी आहेत, हा इशारा तेवढा लक्षात ठेवा.
रात्रीच्या वेळी दादर वगैरे परिसरात चुकून असलात, तर दादर पश्चिमेकडील कबूतरखान्याजवळील एका गल्लीत भेजा मसाल्याची गाडी लावणाऱ्या नाम्याशेट भेजावालाकडील भेजा मसाला चुकवू नका. नाम्याशेट भेजावाला म्हणजे मुंबईतील एक संस्थान आहे. रात्री दहानंतर गाडी लावणाऱ्या नाम्याकडे मोजके, म्हणजे ३०-४० भेजेच मिळतात. त्यामुळे जास्त उशिरा जाऊन चालत नाही. नाम्याशेटकडे भेजा मसाल्याबरोबरच अंडा राइसही खूप चांगला मिळतो.
ही झाली, मुंबई पर्यटनाबरोबच करायची खाद्यभ्रमंती. पण त्याशिवायही या मुंबईच्या उदरात अशा अनेक जागा दडल्या आहेत जिथे फक्त ‘उदरम् भरणम्’ एवढा एकच हेतू न ठेवता पंचेंद्रियांना खूश करणारे जिन्नस मिळतात. त्यात दादरच्या आस्वाद हॉटेलमधील मराठमोळे पदार्थ, मोहम्मद अली रोडवरील सुलेमान मिठाईवाल्याकडील मालपोवा-रबडी, फिरनी असे पदार्थ, इथेच मिळणारी नल्ली निहारी, शालीमार हॉटेलमधील रान बिर्याणी, मालाड स्थानकाबाहेरील फरसाणवाल्यांचे ठेले आणि तिथे मिळणारे विविध पदार्थ, गिरगावातील खिचाँ पापड, १०५ वेगवेगळ्या प्रकारचे ज्युस पाजणारी गिरगावातील ज्युस सेंटर, विक्रोळीच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कोथिंबीर वडीपाव.. ही यादी खूप मोठी आणि मुंबईसारखीच कॉस्मॉपॉलिटन आहे. हे विविध पदार्थ चाखण्यासाठी मोठी सुटी, खूप भूक आणि खिशात थोडे जास्त पैसे ठेवून मुंबईत यायला हवे.
रोहन टिल्लू – response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2015 रोजी प्रकाशित
पर्यटन विशेष : खाणाऱ्यांची मुंबई
मुंबईची खाद्यसंस्कृती इंद्रधनुष्याएवढी रंगीत आहे. कुलकण्र्याच्या भजीपासून ते पिकेट रोडवरच्या कोंबडीपर्यंत आणि इराण्याच्या बनमस्क्यापासून हाजीअलीच्या फ्रूट क्रीमपर्यंत ही खाद्यसंस्कृती विविधांगी पसरली आहे.

First published on: 21-08-2015 at 01:16 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel and tourism special