‘निवडणूक निकाल’ नामे महाकथनाचा आकार त्यातल्या उपकथांमधून आणखी निराळा दिसू लागतो आणि यापैकी काही बोधकथा तर स्पष्टच वाचता येतात. कोणतीही बोधकथा काही अमक्याच कोणासाठी नसते, त्यामुळे बोध घ्यायलाच हवा अशी सक्तीही नसते हे खरं; पण बोध घेतला तर बरं..

कोणत्याही निवडणुकीत कोण जिंकलं कोण हरलं या आणि इतक्याच माहितीतनं निकालाची खरी संपूर्ण कथा समोर येऊ शकत नाही. हार-जीत इतक्याच नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कथेत अनेक लहानमोठ्या उपकथा असतात. या सर्व उपकथा नाही- ते शक्यही नाही- तरी जमेल तितक्या समजून घेतल्या तर ‘निवडणूक निकाल’ नामे महाकथनाचा आकार वेगळाच दिसू लागतो. त्याचा नवाच अर्थ समोर येतो. आणि मुख्य म्हणजे आपल्या सुलभीकरणाच्या सोयीस्कर सांस्कृतिक सवयीत जे काही हातातनं सुटून गेलेलं असतं… ते आपल्याला गवसतं. हा लेख अशाच काही लघु, खरं तर बोधकथांचं संकलन…

  • ‘भारत आदिवासी पार्टी’ अशा नावाचा काही पक्ष आहे हे राजकारणाकडे प्राधान्याने माध्यमी नजरेतनंच पाहण्याची सवय झालेल्यांस ठाऊक असण्याची फारशी शक्यता नाही. तसंच चार महानगरं आणि दहापाच शहरं यांच्या पलीकडे राजकारणात काय झालं, यातही अनेकांना रस असायची शक्यता नाही. आणि त्यात बांसवाडा लोकसभा मतदारसंघ हा तर निमशहरीदेखील नाही. राजस्थानातला हा डुंगरपूर परिसरातला भाग एरवीही कोणाच्या लक्षात यावा असा नाही. या लोकसभा मतदारसंघातला चौरासी हा एक विधानसभा मतदारसंघ.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: विनम्रतेची शाळा…

‘‘काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर तुमची संपत्ती ‘जादा बच्चेवालोंमे बाट देगी.’’ हे या निवडणूक प्रचारातला निम्नतम-स्तर दाखवणारं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, ते याच मतदारसंघातल्या सभेत. गेल्या महिन्यात ४ मे या दिवशी मोदी या मतदारसंघात होते. या निवडणुकीच्या धार्मिक ध्रुवीकरणाची ही सुरुवात होती. पंतप्रधानांनी ती या मतदारसंघात केली.

या मतदारसंघात ‘भारत आदिवासी पार्टी’ नामक पक्षाच्या राजकुमार रोत नामे उमेदवाराने पंतप्रधानांनी ज्याचा पुरस्कार केला त्या तगड्या, बहुपक्षीय अनुभव गाठीशी असलेल्या महेंद्रजित सिंह मालवीय यांस धूळ चारली. धार्मिक ध्रुवीकरणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अत्यंत दुर्लक्षित प्रांतातल्या तितक्याच दुर्लक्षित आदिवासी तरुणाचा विजय ही या निवडणूक निकाल महाकथेतली अत्यंत झळाळती, पण तरीही दुर्लक्षित लघुकथा. ती लक्षात घेतली की निवडणूक निकालाची गहराई अधिक जाणवेल.

तात्पर्य : लोकशाहीत बहुजनांनी दुर्लक्षिलेलाही महाजनास धडा शिकवू शकतो. सबब बहुजनांनी आपल्या बहुजन असण्याची मिजास करू नये.

  • भाजप हा निवडणुकीतला मुख्य नायक आणि चित्रपटातल्या नायकाच्या आसपास कसे घोंघावणारे छोटेमोठे उपनायक असतात, तसे राजकारणातले उपनायक म्हणजे आघाडीतले पक्ष असा सर्वसाधारण समज. नायक अचाट असतो. तो काहीही करू शकतो. त्याप्रमाणे निवडणुकीच्या खेळात हा नायकच सर्व काही करणार, असा ‘‘…अमुक है तो मुमकिन है’’ असं म्हणणाऱ्या बावळटांचा समज. म्हणजे ‘‘खरं तर भाजप एकहातीच सरकार बनवू शकतो, पण आघाडीधर्म म्हणून इतरांना आम्ही बरोबर घेतोय…’’असा उपकाराच्या भावनेचा सूर अनेकांच्या मुखातून नाही तर व्हॉट्सअॅप फॉर्वर्डांतून निघायचा. या अशा अंधभक्तांना निकालातून वास्तव दिसेल.

ते असं की, सर्वाधिक जागा गमावणारा पक्ष या वेळी भाजप ठरलाय. त्या पक्षानं स्वत:चे सर्वाधिक खासदार गमावलेत. म्हणजे हात द्यायला आघाडीचे घटक पक्ष नसते तर स्वबळाविषयी भ्रम असणाऱ्या भाजपचे प्राण नाकातोंडात पाणी जाऊन कंठाशी येते. अगदी महाराष्ट्रातही भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं यशाचं प्रमाण अधिक आहे! राजकीय वास्तव यापेक्षाही अधिक कटू असतं.

हेही वाचा : गावात राहावे कोण्या बळे?

तात्पर्य : ‘एकही सबपे भारी’ हे लोकशाहीत टिकत नाही. सबब कितीही खरं असलं तरी कोणी कधीही असं सांगू नये.

  • वाराणसी मतदारसंघाकडे नजर टाकली तर हे लक्षात येईल. हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ. म्हणजे त्याचा शाही दर्जा खाशा स्वारीच्या निकालालाही खास दर्जा देणार. त्यात या निवडणुकीत पंतप्रधान दोन महत्त्वाचे विक्रम मोडू पाहत होते. एक म्हणजे, भाजप खासदारांचं नाही तरी निदान आघाडीचं संख्याबळ तरी ‘चारसो पार’ न्यायचं; आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सलग तीन वेळा पंतप्रधानपदी आरूढ होण्याचा विक्रम मोडायचा. यातला दुसरा विक्रम खरं तर मोदी यांच्याच पक्षाच्या अटलबिहारी वाजपेयी यांनी आधीच मोडलेला आहे. वाजपेयी १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीन वेळा पंतप्रधानपदी निवडले गेले. तरीही मोदी हा विक्रम मोडणार असे भाजपवाले सांगत होते. ते ठीक. पण हे उच्चांक वगैरे साधण्याच्या नादात खुद्द मोदी यांच्या नावावर एक नीचांक या निवडणुकीने नोंदला.

इतिहासात अत्यल्प मताधिक्य घेणारे ते पहिले पंतप्रधान! म्हणजे पंतप्रधान जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा त्याचा विजय पाचेक लाखांनी होतो वा व्हायला हवा अशी लोकांची अपेक्षा असते. या वेळी तर भाजपचे शिवराज सिंग चौहान हेही साडेसात लाखांची आघाडी घेत विजयी झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत यांनाही अडीच लाखांची आघाडी मिळाली. त्या तुलनेत पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी विजय जेमतेम दीडेक लाखांचा आहे. हा केवळ संख्येनंच नाही तर टक्केवारीतही अत्यल्प म्हणावा लागेल. आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढवणाऱ्या काही पंतप्रधानांची विजयी टक्केवारी अशी : राजीव गांधी यांचं १९८४ सालचं मताधिक्य ७२.१८ टक्के, राजीव गांधी (१९८९) ५०.२२ टक्के, नरसिंह राव (१९९६) ३०.९७ टक्के, अटलबिहारी वाजपेयी (१९९९) १६.४ टक्के, अटलबिहारी वाजपेयी (२००४) ३७.७४, नरेंद्र मोदी (२०१४) ४५.२२ आणि नरेंद्र मोदी (२०२४) फक्त १३.४९ टक्के.

तात्पर्य : सामर्थ्य संदेश देण्यासाठी लोकशाहीत पराजयच व्हावा लागतो असं नाही. विजयाचा आकारही त्यासाठी पुरेसा असतो! सबब सामर्थ्याच्या अभिमानापेक्षा नम्रता अधिक सामर्थ्यवान असते.

  • महाराष्ट्रात भाजप पहिली काही पावलं टाकत होता त्यावेळी पक्षाचे एक संघटन-सचिव होते. वसंतराव भागवत. त्यांनी आजच्या भाजपचा पाया रचताना त्या पक्षाला ‘माधवं’ सूत्राचं महत्त्व पटवून दिलं. काँग्रेसच्या अल्पसंख्याक-मराठा समाजाच्या पाठिंब्यासमोर आव्हान निर्माण करायचं असेल तर भाजपनं ‘माळी-धनगर-वंजारी’ यांना जवळ करत आपल्यामागे ‘ओबीसी’ची भिंत उभी करावी, हा त्यांचा सल्ला. तो भाजपनं तंतोतंत पाळला. प्रमोद महाजन हे या वसंतरावांचे शिष्योत्तम. महाजनांमुळे त्या वेळी भागवतांशीही दादरच्या ‘चंचल स्मृती’मध्ये गप्पा मारलेल्या होत्या. ‘‘महाराष्ट्र दोघांना सर्वाधिक कळतो- शरद पवार आणि मी’’ असं ते गमतीनं म्हणायचे. यात त्यांनीच नंतर आपला शिष्योत्तम प्रमोद महाजन यांची भर घातली. तर नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, उमा भारती, कल्याण सिंग असे एकापेक्षा एक तगडं ‘ओबीसी’ नेतृत्व भाजपनं पुढे आणलं त्याचं श्रेय भागवतांना जातं.

हेही वाचा : विरूप अवस्थांतरणाची गोष्ट

या निवडणूक निकालानं भागवतांच्या आत्म्याला क्लेश होतील!

कारण बऱ्याच कष्टानं कमावलेल्या ‘ओबीसी’नी भाजपकडे या वेळी काही प्रमाणात का असेना; पण पाठ फिरवली. हे केवळ महाराष्ट्रातच घडलं असं नाही, तर सत्तेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या उत्तर प्रदेशातही हेच झालं. यादवेतर ओबीसी, जाटवेतर दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागास यांच्या जोरावर भाजपने २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका खिशात टाकल्या. या वेळी ते जमलं नाही. इटवाह, फिरोजाबाद, मैनपुरी, कनौज या ‘यादव’ भूमीच्या बरोबर बुंदेलखंड, मध्य आणि पूर्वांचल उत्तर प्रदेश अशा जातीपातींच्या प्रांतातल्या कुर्मी, मौर्य, शाक्य, कुशवाह, राजभर, निषाद याच्या बरोबरीनं दलित गणल्या जाणाऱ्या जाटव, पासी, वाल्मीकी, परीट यांनीही या वेळी आपली ताकद ‘इंडिया’ला दिली. भाजपला नाही.

जात हे आपलं, त्वचेच्या रंगाइतकं नाकारता न येणारं वास्तव आहे. पण गंमत अशी की, ‘हल्ली हे जातीपातीचं राजकारण फार वाढलंय’ हे मत एका विशिष्ट सुरांत दिवाणखान्यातल्या चर्चांत एक वर्ग वारंवार फेकत असतो. हा वर्ग जातीपातीच्या राजकारणावर नाक मुरडू शकतो. कारण त्याला ते परवडतं. आणि त्यांना ते परवडू शकतं त्याचं कारण त्यांच्या जातीत असतं.

तात्पर्य : नवे जोडण्याच्या नादात आपल्यासमवेत होते ते जुने कधी तोडू नयेत. कोणाची गरज कधी लागेल हे सांगता येत नाही.

  • या जातीपातीच्या राजकारणास नाक मुरडणाऱ्या वर्गाच्या जिव्हारी सर्वाधिक लागलाय तो एक पराभव. अयोध्येतला.

एवढं भव्य राम मंदिर उभारलं… एवढा सोहळा झाला… एवढे आम्ही आनंदलो… आणि अयोध्येत मोदीजींचा पराभव कसा शक्य आहे… असा सात्त्विक प्रश्न एका वर्गाला पडलाय.

त्यांनी या मंदिराच्या निमित्तानं उद्ध्वस्त केले गेलेले स्थानिक दुकानदार, व्यावसायिक, सुंदर रस्त्यात डोळ्याला खुपतील म्हणून घरं पाडले गेलेले हजारो नागरिक आणि मंदिर उभं राहिल्यावर येणाऱ्या ‘व्हीआयपी’मुळे संचारबंदीची कोंडी सहन करणारे लक्षावधी यांनी व्यक्त केलेल्या वेदना पाहिल्या तर ‘अयोध्येतही का’ या प्रश्नाचं उत्तर मिळेल. दुसरं असं की, अयोध्या हा मतदारसंघ नाही. तो आहे फैजाबाद. अयोध्या त्यातलं एक गाव. प्रभु रामचंद्रांचं मंदिर उभं राहिल्यावरही पराभव का झाला, हा प्रश्न पडणाऱ्यांनी भाजपच्या पराभवाचं भाकीत जवळपास सहा महिन्यांपूर्वी वर्तवणाऱ्या सुमन गुप्ता या पत्रकार काय लिहीत होत्या हे वाचायला हवं. ही महिला पत्रकार अयोध्या-फैजाबादमधून बातमीदारी करते. पत्रकारितेतले पुरुषोत्तम अधिकाधिक लाळघोटे कोण या स्पर्धेत असताना ही बाई- हिंदू असूनही- भाजपसाठी उत्तर प्रदेश भारी पडेल हे सांगते, ही दिल्ली-मुंबईच्या पलीकडे कसा खरा भारत आहे हे दाखवून देते. निकालानंतर त्यांची एका वेबसाइटनं मुलाखत घेतली. मंदिरानंतरही का… या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर प्रभु रामचंद्रांना निवडणूक एजंट बनवणाऱ्यांचं काय चुकलं ते दाखवून देतं. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही ‘पर्यटक’ आणि ‘श्रध्दालु’ यात गल्लत करतायत. मंदिर उभं राहिल्यावर रीघ लागलीये ती पर्यटकांची. पूर्वी उत्तर प्रदेशातून कुठूनही खिशात १०-२० रुपये असलेला कोणीही सहज ‘रामल्ल्ला’च्या दर्शनासाठी येऊ शकायचा. आता हे सगळं पंचतारांकित पर्यटन झालंय, ज्याचा फायदा स्थानिकांपेक्षा बाहेरच्या (पक्षी : गुजराथी) व्यापारी वर्गालाच अधिक मिळतोय…’’

आता कोणी तरी सांगतंय म्हणून आपल्या विवेकाला तिलांजली देत, अचंबित व्हायलाच हवं असं आधीच ठरवून अयोध्येला धावत जाणाऱ्या धर्म-पर्यटकांना हा मुद्दा कसा कळणार? माझा एक उत्तर प्रदेशी व्यवसाय मित्र या मुद्द्यांवर म्हणाला, ‘‘राजकीय नव्हता तेव्हा राम ‘जय सियाराम’ होता… त्याला राजकारणानं ‘जय श्रीराम’वर आणून टाकलंय.’’ कोणताही नेता कितीही ताकदवान, सामर्थ्यवान, दैवी वगैरे असो… लोकशाहीत जनतेच्या विचारशक्तीवर फार काळ नियंत्रण ठेवू शकत नाही.

तात्पर्य : नागरिकांच्या श्रद्धास्थानांना क्षुद्र राजकारणात कधीही ओढू नये.

हेही वाचा : गरम होतेय…

  • या निवडणुकीनं फक्त सत्ताधारी पक्षालाच घायाळ केलं असं नाही. आणखी एक घटकाला मतदारांनी फार मोठ्या प्रमाणावर जायबंदी केलंय. हा घटक म्हणजे माध्यमं.

नागरिकांच्या विचारशक्तीवर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना प्रश्न विचारणं हे माध्यमांचं काम. ही त्यांची जबाबदारी. गेल्या दशकभरात माध्यमं ती विसरलीयेत. ऐन निवडणुकांत पंतप्रधानांना… ‘‘आता तुम्ही काय २०२९ चीच तयारी करत असाल,’’ असं विचारून त्यावर खूश होत हसणाऱ्या पंतप्रधानांच्या समवेत हसण्यात धन्यता मानण्याइतकी ती केविलवाणी, लांगूलचालनी झालेली आहेत. स्वत:च्या कर्मानं स्वत:चं मूल्य कमी करून घेण्याची हौस आणि ती पुरवण्याची अचाट क्षमता असलेल्या माध्यमांना या निवडणुकीनं त्यांची जागा दाखवून दिली. इतका लाळघोटेपणा, इतकं लांगूलचालन वगैरे करूनही मतदारांनी त्यांना हवं तेच केलं. पारंपरिक माध्यमांच्या- त्यातही इलेक्ट्रॉनिक अधिक- सत्ताशरणतेला समाज आणि काही जागरूक माध्यमकर्मी यांनी या निवडणुकांत एक नवाच पर्याय दिला.

यूट्यूब. ही २०२४ ची लोकसभा निवडणूक यूट्यूबची आहे. अनेक पत्रकारांनी एकट्यांनी वा एकत्रपणे आपल्या स्वत:च्या अत्यल्प भांडवलाच्या यूट्यूब वाहिनी सुरू केल्या आणि जे काही म्हणायचं, दाखवायचं ते बिनधास्तपणे म्हणत/ दाखवत गेले. वास्तविक काही राजकारण्यांनी पत्रकार असल्याचा आव आणणाऱ्या काही बुजगावण्यांना यूट्यूब वाहिन्या आधीच काढून दिलेल्या होत्या. पण हे पोटार्थी यूट्यूबर अन्य पत्रकारांवर दुगाण्या झाडणं आणि आपल्या धन्याची सतत कौडकौतुकं करणं इतकंच करत राहिले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांतल्या बेमानी पत्रकारांची यूट्यूबी आवृत्ती ठरले. आणि त्याच वेळी व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या खऱ्या पत्रकारांच्या यूट्यूब वाहिन्या सुरू झाल्यानं बेमानांच्या मागे गेलेले भक्तगण सोडले तर अन्य प्रेक्षक या खऱ्या यूट्यूब वाहिन्यांना मिळाले. निवडणुकीत अंतिमत: परिणामकारक ठरले ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांतली बेमानी चाकरी सोडून यूट्यूबवर स्वत:ची वाहिनी सुरू करणारे.

माहिती ही पाण्यासारखी असते. तिला जेव्हा वाहायचं असतं तेव्हा ती स्वत:च मार्ग काढते. यूट्यूब हा असा नवा मार्ग. गेली म्हणजे २०१९ची निवडणूक ही ‘व्हॉट्सअॅप’ची होती. हे नवं विद्यापीठ खुलं झाल्यावर त्याच्या स्नातकांनी काय धुमाकूळ घातला हे आपण पाहतोच आहोत. आताची निवडणूक त्या मार्गानं गेली नाही. उलट व्हॉट्सअॅप विद्यापीठानं केलेल्या पापाला यूट्यूब हा उतारा ठरला.

तात्पर्य : मीडिया मॅनेज करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो मॅनेज होऊ शकत नाही. मीडियावाले मार्ग काढतात. सबब अशा प्रयत्नांत शहाण्यांनी वेळ घालवू नये.

हेही वाचा : ‘कडकलक्ष्मी’चे आसूड…

  • निवडणुकांच्या निमित्तानं, निकालानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया, मुलाखती येत असतात. त्यातली व्यक्तिश: मला आवडलेली ही एक. ती कोणा विजयी राजकीय नेत्याची नाही. पराभूताचीही नाही. ती आहे विजयी ठरलेल्या नेत्याच्या दोन मुलींची.

हा विजयी नेता किशोरीलाल शर्मा. अमेठीतून ते जिंकले. त्यांनी हरवलं जवळपास विदुषीपदापर्यंत पोहोचलेल्या स्मृती इराणी यांना. बाईंचं वक्तृत्व म्हणजे काय आग्यावेताळ असतो हे आता समस्त देशाला ठाऊक झालंय. या निवडणुकीत त्याला जागत त्यांनी या किशोरीलाल यांची संभावना गांधी परिवाराचा ‘चपरासी’, ‘प्यून’, ‘कळसुत्री बाहुला’ वगैरे वगैरे जितक्या तुच्छतादर्शक शब्दांत करता येईल तितकी केली. या मतदारसंघात स्मृतीबाईंनी गत निवडणुकीत राहुल गांधी यांना हरवलेलं. त्या तुलनेत यावेळचे किशोरीलाल म्हणजे किस झाडकी पत्ती…! बाई सुसाट सुटल्या.

त्यांना निकालानंच थांबवलं. कोणा आतापावेतो अज्ञात किशोरीलालनं त्यांना हरवलं. माध्यमकर्मी गेले शर्मांच्या घरी. ‘आपको क्या लगता है’ विचारायला. समोर या मुली भेटल्या. त्यांना आठवण करून दिली गेली… स्मृती इराणी तुमच्या वडिलांना असं असं म्हणाल्या होत्या. तुम्हाला काय वाटतं…?
या मुली म्हणाल्या, ‘‘ते आम्ही कशाला सांगायचं? निकालाचे आकडेच काय ते सांगतील.’’
नंतर या मुलींनी स्मृतीबाईंच्या अभिनय कौशल्याची तारीफ केली. त्यावर प्रश्नकर्त्यानं त्या दोघींना विचारलं… म्हणजे त्यांनी आता पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळावं, असं तुम्ही सुचवताय का? या माध्यमकर्मीला वाटलं त्या ‘हो’ म्हणतील आणि वर चमचमीतपणे स्मृतीबाईंवर काहीबाही टीका करतील. बातमी मिळेल, पण झालं उलटंच.
त्या दोघी संयत, शांतपणे म्हणाल्या, ‘‘ते आम्ही कसं काय सुचवणार? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे… त्यावर काही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही…!’’
या उत्तरानं तो माध्यमकर्मी खजिल झाला बहुधा.

तात्पर्य : जेआरडी म्हणाले होते तसं- ‘क्लास इज परमनंट… सायकल ( हारजितीचं चक्र) इज टेंपररी.

एक निवडणूक म्हणजे बोधकथांची नवी आवृत्ती असते. त्यातल्या या काही… काही बोध घ्यायची इच्छा असलेल्यांसाठी…!
girish.kuber@expressindia.com
@girishkuber