सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मालमत्तेत पाच वर्षांनंतर जवळपास तिपटींनी वाढ होऊन ८ कोटी ६० लाखांची मालमत्ता तब्बल २३ कोटी ४७ लाखांची झाली आहे. मालमत्तेच्या वाढीतही कोटीच्या कोटी उड्डाणे शिंदे कुटुंबीयांनी मारल्याचे दिसून येते.
मागील २००९ साली शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना आपल्या कुटुंबीयांकडे ३ कोटी ३५ लाखांची जंगम मालमत्ता, तर ५ कोटी २५ लाख ५० हजारांची स्थावर अशी मिळून एकूण ८ कोटी ६० लाखांपर्यंत मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत केंद्रात प्रारंभी ऊर्जामंत्री व नंतर गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या शिंदे यांच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ होऊन ती २३ कोटी ४७ लाखांची झाली आहे. यात ८ कोटी ५७ लाख ९९ हजारांची जंगम मालमत्ता असून, १४ कोटी ८९ लाखांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहितेंच्या मालमत्तेत १० कोटींची वाढ
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मालमत्तेत मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १० कोटींची वाढ झाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांकडे सहा कोटी ६८ लाखांची मालमत्ता असल्याचे दर्शविले होते. परंतु पाच वर्षांनंतर सत्तेत नसतानादेखील मोहिते-पाटील कुटुंबीयांकडे ६ कोटी ७५ लाखांची जंगम तर १० कोटी २७ लाखांची स्थावर मालमत्ता दर्शविली आहे.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushilkumar asset raised three time more