राहाता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचा लाभ मिळणार असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ७ व्या हप्त्याचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी ही अर्थसाहाय्य योजना सुरू केली आहे. सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत समावेश आहे, त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असल्याचे विखे यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य सरकार प्रतिवर्षी आणखी ६ हजार रुपये अनुदान देऊन दरवर्षी १२ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना दिला जातो. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण ६ हप्ते देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याचे विखे म्हणाले.
अकोले तालुक्यातील ३४ हजार ८५७ शेतकऱ्यांना ६ कोटी ९७ लाख, जामखेड २९ हजार २७ शेतकऱ्यांना ५ कोटी ८० लाख, कर्जत ४३ हजार ५५९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७१ लाख, कोपरगाव २९ हजार ५८६ शेतकऱ्यांना ५ कोटी ९१ लाख, अहिल्यानगर ३० हजार ९३६ शेतकऱ्यांना ६ कोटी १८ लाख, नेवासा ५४ हजार २०२ शेतकऱ्यांना १० कोटी ८४ लाख, पारनेर ५० हजार २७१ शेतकऱ्यांना १० कोटी ५ लाख, पाथर्डी ३९ हजार ८३५ शेतकऱ्यांना ७ कोटी ९६ लाख, राहाता २४ हजार ७१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८१ लाख, राहुरी ३८ हजार ५२७ शेतकऱ्यांना ७ कोटी ७० लाख, संगमनेर ५९ हजार ५२ शेतकऱ्यांना ११ कोटी ७१ लाख, शेवगाव ४१ हजार ८३८ शेतकऱ्यांना ८ कोटी ३६ लाख, श्रीगोंदा ५० हजार ४७३ शेतकऱ्यांना १० कोटी ९ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३२५ शेतकऱ्यांना ४ कोटी ४६ लाख रुपये तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे त्यांनी सांगितले.