शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका करत आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटावरील शाब्दिक हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहेत. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, एक मंत्री महोदय आहेत, ज्यांचं नावं फुलावरून आहे, तरीदेखील ते काट्यासारखे वागत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत येत्या २६ आणि २७ जुलै या दोन दिवशी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा टिझर प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “खेकडा हा अत्यंत गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीळ झालेली असते, त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरण फुटलंच नसतं,

गुलाबराव पाटील यांच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, काल-परवा तुम्ही विधानसभेत पाहिलं असेल. त्यांची हुकूमशाही पद्धत पाहिली असेल. एक मंत्री महोदय, ज्यांचं नाव फुलावारून आहे, तरीदेखील ते काट्यासारखं वागत आहेत. परवा अधिवेशनात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे बोलत होत्या, प्रश्न विचारत होत्या, तेव्हा हे मंत्री त्यांच्यावर भडकले. तुम्ही बाहेरचे प्रश्न विचारताय असं म्हणाले, खरंतर, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. परंतु मंत्री महोदयांचा अभ्यास कच्चा होता. म्हणून त्यांनी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा >> “अरे घरी बसून काय…”, शिंदे गटातील आमदारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, “फक्त अडीच तास…”

आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनात बोरामणी आणि होटगी विमानतळ, तसेच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. परंतु विमानतळाना केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी नाकारली, तर चिमणीबाबत मला माहिती नाही, असं उत्तर गुलाबराव पाटील यांनी चर्चेवेळी दिलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray says gulabrao patil name is like flower but acts like thorn asc