खासगी अॅप आधारित वाहतूक सेवेचा वापर करताना अनेकविध अनुभव येतात. हे अनुभव कधी कधी फार भयानक ठरतात. मुंबईतील लेखक धवल कुलकर्णी यांनाही असाच अनुभव आला. त्यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट करून सरकारलाही जाब विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखक धवल कुलकर्णी त्यांच्या मुलीला घेण्यासाठी शनिवारी पुण्यात गेले होते. पुण्यातून मुंबईत परतण्यासाठी त्यांनी रेल्वेने येण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु, तिकिट प्रतिक्षा यादीत असल्याने त्यांनी रस्तेमार्गे मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी उबर सेवेचा लाभ घेतला. त्यांनी निवडलेल्या उबर चालकाला ४.९३ रेटिंग होते. परंतु, त्याच्याकडून मिळालेली वागणूक आणि त्याच्यामुळे झालेला अपघात यामुळे कुलकर्णी कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

धवल कुलकर्णी म्हणाले की, माझ्या मुलीला मोशन सिकनेसची लक्षणे दिसल्याने आम्ही एका केमिस्टजवळ गाडी थांबवून गोळ्या घेतल्या. परंतु, नंतर चालक गाडी चालवताना फोनवर बोलत होता. मात्र, या वादात न पडता त्यांनी शांत राहणं स्वीकारलं. आम्ही त्यानंतर एक्स्प्रेस वेवर आलो. तिथे पोहोचल्यानंतर चालक जांभई देण्यास लागला. तसंच, त्याने गाडीही वेगाने चालवायला सुरुवात केली. इतर लेनमध्ये शिरण्याचाही प्रयत्न करू लागला. त्याला झोप लागू नये म्हणून मी त्याच्याशी संवाद साधू लागलो. तो सकाळीच एका ग्राहकाला पुण्यात सोडून आला, त्यामुळे त्याला जांभई येत होती. तसंच, गाडीत एसी सुरू असल्याने जांभई येत असल्याचं त्याने सांगितलं. “मी त्याला गाडी थांबवून चेहऱ्यावर पाणी शिंपडायला सांगितलं. त्याने गाडी थांबवून चेहऱ्यावर पाणी शिंपडून पुन्हा आम्ही मार्गाला लागलो”, असंही कुलकर्णी म्हणाले.

“चालकाला झोप लागू नये म्हणून मी त्याच्याशी संवाद सुरू ठेवला. आम्ही घाट उतरून खोपोलीला पोहोचल्यावर काही वेळातच कॅरेजवेच्या मधोमध ट्रकचा मोठा आवाज झाला. आमची गाडी ट्रकच्या मागच्या टोकाला जाऊन धडकली. अपघाताची चाहूल लागल्याने एअरबॅग सक्रिय झाले. परंतु, मला धक्का बसला होता आणि प्रचंड वेदना होत होत्या. माझ्या मुलीला पाहण्यासाठी मी मागे पाहिलं असता ती घाबरलेली पण शांत होती. चालकही ठीक होता”, असंही धवल कुलकर्णी म्हणाले.

अपघात झाल्यानंतर चालकाने तत्काळ घटनास्थळावरून पलायन केले. आम्ही गाडीतून बाहेर पडलो आणि रस्त्याच्या कडेला जायला निघालो. माझ्या मुलीच्या उजव्या पायाला जखम झाली होती. तिने पाहिले की मलाही प्रचंड वेदना होत आहेत. परंतु तरीही मी घाबरेन म्हणून ती शांत राहिली. अपघात होताच महाराष्ट्र सुरक्षा दलाचा एक हवालदार घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर एक टोइंग व्हॅन आणि दोन आरटीओ अधिकारी आले. नुकसानीची पाहणी करून तिघे निघून गेले. मला असह्य वेदना होत असल्याचंही त्यांनी पाहिलं. परंतु, त्यांनी प्रथमोपचाराचीही सुविधा दिली नाही”, असा आरोप कुलकर्णी यांनी आरोप केला.

कुलकर्णी म्हणाले की, जेव्हा त्यांनी उबरला कॉल केला तेव्हा त्यांच्यासाठी दुसऱ्या कॅबची व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. “मला एक मजकूर संदेश आला की टॅक्सी आली आहे. मी ड्रायव्हरला अनेक वेळा कॉल केला, तरीही त्याने माझे कॉल घेण्यास नकार दिला”, असा आरोपही धवल कुलकर्णी यांनी केला.

याप्रकरणी त्यांनी थेट वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला. दोन सदस्यीय पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. अखेरीस, धवल कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले. तिथं त्यांनी एक्स रे तपासणी केली. आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग पोलीस, आरटीओ अधिकारी आणि उबेरने सहाय्य केलं नसल्याचा आरोप धवल कुलकर्णी यांनी केला आहे. ही पोस्ट त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबेर यांना टॅग केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the accident on the pune highway the uber driver fled a writer from mumbai shared that shocking incident sgk