Premium

सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, अजित पवार म्हणाले…

गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवारांचा एकेरी उल्लेख करताना दिसतात.

mungantiwar ajit pawar gopichand padalkar
सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख टीका, अजित पवार म्हणाले…

अलीकडे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला जात आहे. भाजपाचे नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

भाजपात ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. याला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “आमचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणतात, पण कुठे आहेत ते? सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग त्यांच्याकडे होता. मात्र, त्यांना तिथे महत्वं नव्हते.”

हेही वाचा : “देशात शरद पवारांची विश्वासार्हता राहिली नाही”, विजय शिवतारेंची सडकून टीका; म्हणाले, “अशा प्रवृत्तींना…”

“मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून…”

“ओबीसांचा पंतप्रधान झाल्याने यांच्या ( काँग्रेस-राष्ट्रवादी ) पोटात दुखत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत,” असं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे धृतराष्ट्र झालेत, त्यांना…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवरून शिंदे गटातील नेत्याचं टीकास्र

“त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती”

एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकरांनी सांगितलं, “गेल्यावर्षी जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार ४ वेळा मुख्यमंत्री, १२ वर्षे केंद्रात मंत्री होता, मागचं मला माहिती नाही. राज्यात १९९९ पासून २०१४ पर्यंत त्यांचं सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती,” असा आरोप गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केला आहे.

“सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून…”

याबद्दल प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, “संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही,” असे म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा नामोल्लेख करणं टाळलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 18:11 IST
Next Story
मंत्रिमंडळात खांदेपालट होऊन तरुण चेहऱ्यांना संधी? भरत गोगावले म्हणाले, “काही लोकांसंदर्भात…”