नांदेड : बारामतीजवळच्या माळेगाव साखर कारखान्यामध्ये आम्ही उसाला प्रतिटन ३४५० रुपये भाव दिला. जे आम्ही करू शकतो, ते इथले लोक का करू शकत नाहीत, त्यांना काय अडचण आहे, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये उपस्थित करत भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील इतर कारखानदारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
उमरी आणि देगलूर येथील पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी पवार शनिवारी सकाळपासून सायंकाळर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये होते. जिल्ह्याचे प्रमुख नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या येळेगाव आणि डोंगरकडा येथील प्रकल्पांमध्ये यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला. त्याआधी सप्टेंबर महिन्यात या कारखान्याची वार्षिक सभा संपन्न झाली होती.
लातूरच्या मांजरा कारखान्याने यंदाचा किमान भाव प्रतिटन ३१५० रुपये राहील, असे त्याआधी जाहीर केले होते. तो संदर्भ देत चिखलीकर यांनी ‘भाऊराव चव्हाण’ने प्रतिटन ३१५१ रुपये भाव द्यावा, अशी मागणी केली होती. पण या साखर कारखान्याने भाव न जाहीर करताच यंदाचा हंगाम सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासमोर बोलताना आमदार चिखलीकर यांनी उमरी येथे खा. चव्हाण यांना ऊस दरावरून पुन्हा एकदा डिवचले. ६० कोटींमध्ये उभारलेला कारखाना ४०० कोटींच्या तोट्यात कसा गेला, असा सवालही त्यांनी केला होता. चिखलीकरांनी आपल्या भाषणात उसाचा भाव काढला, त्यामुळे आमच्या कारखान्याने दिलेला दर मला सांगावा लागत असल्याचे नमूद करून इथल्या लोकांना ते का जमू शकत नाही, असा सवाल पवार यांनी केला. हा संदर्भ वगळता त्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांवर कोणतेही भाष्य केले नाही.
दरम्यान, अजित पवार यांनी आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजचे तुणतुणे उमरी येथील सभेमध्ये वाजवले, तरी ते भाषणाला उभे राहताच उपस्थितांतील काहींनी कर्जमाफीचा ढोल वाजवत पवारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यावर पवार यांनी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा तसेच वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केला, तरी कर्जमाफी कधी होणार, असा सवाल उपस्थित केला गेला.
उमरी येथील कार्यक्रम तसेच गोरठेकर यांच्या वाड्यावरील भोजन आटोपल्यानंतर अजित पवार हेलिकॉप्टरने देगलूर येथे रवाना झाले. उमरीमध्ये गैरहजर असलेले ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर देगलूरच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित होेते. या सभेत पवार यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे बराच व्यत्यय निर्माण झाला. मंडपावर प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले होेते, तरी अनेकांना डोक्यावर खुर्च्या धरून पावसापासून बचाव करावा लागला. एकंदर वातावरणाचा अंदाज घेऊन पवार यांनी भाषण आटोपते घेतले.
