Ajit Pawar on Sachin Ghaywal Gun License : पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन याला शस्त्रपरवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याचं उघड झालं आहे. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही घायवळला शस्त्रपरवाना देण्यासाठी योगेश कदमांचा पोलिसांवर दबाव होता अशी टीका विरोधकांनी केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “योगेश कदम यांनी शिफारस केली असली तरी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्याला शस्त्रपरवाना दिला नाही.”
अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की सचिन घायवळला शस्त्रपरवाना नेमका कोणी दिला. उपमुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मी स्वतः पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांना सांगितलं की कोणीही, कुठल्याही पक्षाचा, गटाचा, कुठल्याही नेत्याच्या जवळचा असेल, त्याचे कुठल्याही मोठ्या व्यक्तीबरोबर फोटो असले तरी ते बघू नका. ज्याची चूक असेल, ज्याने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, नियम मोडले असतील त्याच्यावर कारवाई करा.”
शिफारसीनंतरही आयुक्तांनी घायवळला परवाना दिला नाही : अजित पवार
अजित पवार म्हणाले, “सचिन घायवळला शस्त्रपरवाना देण्यासंदर्भात काहींनी शिफारस केली असली तरी पोलीस आयुक्तांनी त्याला परवाना दिला नाही. स्वतः पोलीस आयुक्तांनीच ही गोष्ट मला सांगितली. मी त्यांना सांगितलं आहे की पुणे असो वा महाराष्ट्र, सगळीकडे कायदा व सुव्यवस्था राखणं ही सरकारची आणि तुम्हा पोलिसांची जबाबदारी आहे.
“मी या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा विषय काढला. त्यावेळी मुख्यमत्र्यांनी सांगितलं की आपण ‘अजिबात कोणाची फिकीर करायची नाही.’ एकंदरीतच या प्रकरणी चौकशी करून दोषींवर पुढची कारवाई केली जाईल.”
नीलेश घायवळच्या पासपोर्टप्रकरणी चौकशीचे आदेश
“नीलेष घायवळला पासपोर्ट कोणी दिला, त्याला मदत कोणी केली याबाबतही चौकशी करायला सांगतिलं आहे. तसेच सचिन घायवळला शस्त्रपरवाना देण्यासंदर्भात शिफारस होती तरी पोलीस आयुक्तांनी त्याला परवाना दिला नाही, असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे.”
शिफारसीनंतरही योग्यता तपासणं पोलिसांचं काम : उपमुख्यमंत्री
दरम्यान, योगेश कदम यांनी परवाना दिल्याचं बोललं जात आहे. यावर अजित पवार म्हणाले, “त्यांनी शिफारस केली परंतु, पोलीस आयुक्तांनी परवाना दिला नाही, असं आयुक्तांनीच मला सांगितलं. तसेच परवाना देण्यासाठी कोणाचा दबाव होता का याबाबत चौकशी केली जाईल. कोणी शिफारस केली असली तरी परवाना देण्याआधी सगळ्या गोष्टींची शहानिशा करणं हे पोलिसांचं काम आहे. सदर व्यक्ती शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेची आहे का हे तपासणं पोलिसांचं काम आहे. तसं काही आढळल्यास ती गोष्ट शिफारस करणाऱ्या नेत्याच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.”