राहाता : महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत, ते मदत जाहीर करतील. कारण महाराष्ट्राच्या जनतेने शेतकऱ्यांचे हित जोपासणारं सरकार निवडून दिलेले आहे, असे आश्वासन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी दिले. पंतप्रधान मोदींच्या वतीने आपण हे आश्वासन दिल्याचे शहा यांनी सांगितले. हंगाम संपल्यानंतर बंद राहत असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांनी बहुउद्देशीय उपपदार्थ निर्मितीसाठी विस्तारीकरण करावे, त्यासाठी राष्ट्रीय सहकारी मंडळाकडून (एनसीडीसी) कर्ज उपलब्ध करण्याची घोषणाही शहा यांनी यावेळी केली. प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात आले. यावेळी लोणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात केंद्रीय मंत्री शहा बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मेळाव्याचे आयोजक पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा, त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील, असे स्पष्ट करून अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीने ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले. या २०२५-२६ वर्षांसाठी केंद्र सरकारने शेअर्सच्या माध्यमातून ३ हजार १३२ कोटी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. त्यामधील १ हजार ६३१ कोटी रुपये एप्रिलमध्ये दिले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारही उपाययोजना करीत आहे. २ हजार २१५ कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. त्यामध्ये १० हजार रुपयांची प्रत्येकी रोख मदत आणि २५ किलो धान्य महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. कर्जाची वसुलीही थांबवली आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये फडणवीस, शिंदे, पवार हे त्रिमूर्ती असून, तिघांपैकी कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. मला लोणीत कार्यक्रमाला बोलवलं आणि या तिघांनी विचारले की, केंद्र सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल? तिघांबरोबर काल, शनिवारी रात्रीच महत्त्वाची बैठक झाली. तेव्हा मी पंतप्रधान मोदींच्या वतीने त्यांना आश्वासन दिले की, केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत, ते मदत जाहीर करतील, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. साखर कारखाने चांगली वाटचाल करीत असल्याने १० लाख टन साखर उत्पादन, ५ टक्के इथेनॉल व पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल वाढले आहे. हे केवळ मोदींमुळे शक्य झाल्याचे शहा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पद्मश्री आणि पद्मभूषण यांच्या पुतळ्याचे अनावरण म्हणजे एक प्रकारचे पद्मस्मरण असल्याचे सांगून सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवून शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण करण्याचे काम केले. याच विचाराने बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार मोठा केला. पाण्याची चळवळ सुरू करून, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न दाखविले, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे यांच्यावर दिली आहे. येणाऱ्या ५ ते ७ वर्षांत उल्हास खोऱ्यातील ५४ टिएमसी पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळवून दुष्काळाला भूतकाळ बनविण्याचे काम सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे भाषण झाले. प्रस्ताविक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. डॉ. सुजय विखे यांनी आभार मानले.

शरद पवार यांच्यावर टीका

अजित पवार यांनी आपल्या भाषणात अमित शहा यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे. अगदी १ हजार ८००, २ हजार रुपयांपर्यंत साखरचे भाव असायचे. पण एमएसपीनुसार दर मिळायला लागल्यापासून कितीही झाले तरी ३ हजार १०० च्या आत साखर विकता येत नाही. अमित शहा यांच्यामुळे साखर उद्योगाला बळ मिळाले.